काही दिवासांपूर्वीच पाकिस्तानचे नेते फवाद हुसैन यांनी राहुल गांधी यांचं कौतुक करणारी पोस्ट एक्स या समाजमाध्यमावर केली होती. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून काँग्रेस आणि राहुल गांधी यांना लक्ष्यही करण्यात आलं होतं. दरम्यान, यावरून आता पंतप्रधान मोदी यांनीही काँग्रेसवर खोचक टीका केली आहे. इकडे काँग्रेस मरत असताना तिकडे पाकिस्तान यांच्यासाठी रडतोय, असे ते म्हणाले. गुजरातच्या आणंद येथील सभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

“देशात सध्या काँग्रेस कमजोर स्थितीत आहे, सुक्ष्मदर्शक यंत्राने बघितलं तरी काँग्रेस दिसणार नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र, आश्चर्याची बाबत म्हणजे इकडे काँग्रेस मरत असताना तिकडे पाकिस्तान रडत आहे. पाकिस्तानचे नेते काँग्रेससाठी दुवा करत आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तान उतावळा झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला पाकिस्तानबद्दल आपुलकी आहे, हे सर्वांना माहिती आहे”, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

हेही वाचा – “धर्माच्या आधारावर आरक्षण आम्हाला मान्य नाही”; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मोदींनी स्वत:..”

पुढे बोलताना त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही लक्ष्य केलं. “आपण लव जिहाद, भू जिहाद याबाबत ऐकलं आहे. मात्र, आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनी व्होट जिहाद करण्याचे आदेश दिले आहेत. हे लोक मुस्लिमांना एकत्र येऊन भाजपाविरोधात वोट जिहाद करण्यास सांगत आहेत”, असा आरोप त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केला.

यावेळी बोलताना काँग्रेस धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याच्या तयारीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. “काँग्रेसने यापूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता, या निवडणुकीनंतर ते सत्तेत आल्यास पुन्हा ते धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न करतील, हे खोट असेल तर काँग्रेसने लिखीतमध्ये द्यावं, की ते मागच्यादाराने मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही”, असं ते म्हणाले.