तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे दोन दिवस राहिले आहेत. विधानसभा निवडणुकांसाठीचे चार राज्यांतील मतदान पार पडल्यानतंर सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा तेलंगणाकडे वळविला. सोमवारी (२७ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणामध्ये घेतलेल्या जाहीर सभेत तेलंगणामधील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समितीवर (BRS) जोरदार टीका केली. बीआरएसच्या कचाट्यातून तेलंगणाला मुक्त करणे ही आमच्या पक्षाची जबाबदारी आहे, याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला. तसेच बीआरएसने युती करण्यासाठी भाजपासमोर हात पुढे केला होता; मात्र आम्ही त्यांच्याशी युती केली नाही, हेदेखील त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी केसीआर या नावाने लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले. बीआरएस आणि भाजपा यांची हातमिळवणी झाली असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत होता. या आरोपाचे खंडन करण्यासाठी भाजपाने बीआरएसच्या विरोधात जोरदार प्रचार केला. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी बीआरएसच्या नेत्यांविरोधातील कारवाईला स्थगिती दिली असल्यामुळे बीआरएस आणि भाजपा यांची हातमिळवणी झाल्याबद्दलच्या आरोपाला आणखी खतपाणी घातले गेले.

हे वाचा >> अपक्ष ‘शिरीषा’चा तेलंगणा विधानसभेसाठी अनोखा प्रचार; म्हशीच्या व्हिडीओपासून झाली राजकारणाची सुरुवात

भाजपा मागच्या काही काळापासून दक्षिणेतील राज्यांमध्ये शक्तिशाली पक्ष म्हणून पुढे आलेला नाही. त्यामुळे तेलंगणाच्या निवडणुकीत बीआरएस आणि भाजपा यांनी संधान बांधून काँग्रेसला बाजूला ठेवण्याची योजना आखल्याचे नरेटिव्ह लोकांमध्ये जाऊ नये, याचा पुरेपूर प्रयत्न भाजपाने केला. भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसचा उल्लेख टाळून, बीआरएसच्या विरोधात केलेला प्रचार हा त्यांची मते भाजपाच्या बाजूला वळविण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तेलंगणाध्ये निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, काँग्रेसने आक्रमक प्रचार केल्यामुळे त्यांना गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.

बीआरएसच्या काही नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नुकतेच आलमपूरचे विद्यमान आमदार व्ही. एम. अब्राहम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाने भाजपाला राज्यात तिसऱ्या स्थानावर ढकलले असल्याचा आभास मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने यशस्वीरीत्या निर्माण केल्याचेही बोलले जात आहे. राज्य भाजपामधील एका नेत्याने सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या काही दिवसांत बीआरएस आणि केसीआर यांच्याविरोधातील टीकेला आणखी धार आणली. या टीकेमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण व्हावा आणि शेवटच्या दोन दिवसांत त्यांनी पक्षासाठी झोकून देऊन काम करावे, असा यामागील हेतू आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घेतलेल्या सभेत म्हटले की, केसीआरने राज्यात केलेल्या सर्व घोटाळ्यांची चौकशी भाजपा सरकारकडून केली जाईल. ज्यांनी तेलंगणामधील गरीब आणि युवकांना दगा दिला, त्यांना सोडले जाणार नाही.

हे ही वाचा >> तेलंगणा जिंकण्यासाठी काँग्रेसची डाव्यांशी हातमिळवणी, बीआरएसला फटका बसणार?

ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारून द्वितीय क्रमाकांवर झेप घेतली होती. तेव्हा डिसेंबर २०२० सालीच केसीआर यांना भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (NDA) येण्याची इच्छा होती. तसे त्यांनी मला बोलूनही दाखविले; पण मुख्यमंत्री केसीआर यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारच्या जाहीर सभेत हाच आरोप पुन्हा एकदा केला. ते म्हणाले, “भाजपाची ताकद वाढत आहे, हे केसीआर यांना कळले होते. अनेक दिवसांपासून ते भाजपाशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकदा ते दिल्लीत येऊन मला भेटले आणि एनडीएमध्ये सहभागी होण्याची इच्छा बोलून दाखविली. पण, भाजपा तेलंगणामधील जनतेच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय घेणार नाही. भाजपाच्या नकारामुळे बीआरएस पक्ष गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळेच माझ्यावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. बीआरएसला माहीत आहे की, मी त्यांना भाजपाच्या आसपासही भटकू देणार नाही. हे मोदीचे आश्वासन आहे.”

भाजपाचा उद्देश काय?

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला आणखी एका दक्षिणेतील राज्यात सत्ता मिळविण्यापासून भाजपाला रोखायचे आहे. त्यामुळेच तेलंगणामध्ये एक बळकट राजकीय पक्ष म्हणून पुढे येण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. भाजपा नेत्याने सांगितले की, कर्नाटकमध्ये काँग्रेसने विजय प्राप्त केल्यानंतर इतर कोणकोणत्या राज्यात काँग्रेस पुढे जात आहे, यावर भाजपा नजर ठेवून आहे.

आणखी वाचा >> राहुल गांधी ते नरेंद्र मोदी, जनतेला आकर्षित करण्यासाठी बड्या नेत्यांची तेलंगणावारी!

प्रादेशिक पक्षांना त्यांच्या राज्यातील निवडणुकांमध्ये ठसा उमटविण्यात अपयश यावे, हा भाजपाच्या रणनीतीचा भाग असल्याचे सांगितले जाते. भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीपेक्षा लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यात भाजपाला अधिक रस आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister modi strongly criticizes cm kcr what is bjps strategy in telangana kvg
Show comments