महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षांपासून एक अतृप्त आत्मा भटकतोय, अशी अप्रत्यक्ष टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली होती. यावरून आता शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे. अतृप्त आत्मा हा ५० वर्ष नाही, तर ५६ वर्ष झाली महाराष्ट्रात भटकतो आहे, पण त्याला मोदींसारखी व्यक्ती मिळाली नाही, असे ते म्हणाले. बुधवारी श्रीगोंदा येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

पंतप्रधान मोदी यांनी मागील काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक प्रचारसभा घेतल्या. यादरम्यान त्यांनी माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली. मुळात त्यांना आमच्याविषयी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्यावर टीका टिप्पणी करतो, माझ्या दृष्टीने तो आमचा बहुमान आहे. पण त्यांना दुसरं कोणी दिसत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

हेही वाचा – Video : “अदाणी-अंबानी पैसे देतात, हे तुम्हाला कसं माहिती?” पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आरोपाला राहुल गांधींचं प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींना लगावला टोला

पुढे बोलताना त्यांनी भटकती आत्माच्या टीकेवरून पंतप्रधान मोदींना पुन्हा लक्ष्य केलं. पतंप्रधान मोदी पुण्यात आले. तिथे बोलताना महाराष्ट्रामध्ये गेली ५० वर्षे एक अतृप्त आत्मा भटकतो आहे, असं त्यांनी म्हटलं. मात्र, मला त्यांना सांगायचं आहे, की हा आत्मा ५० वर्ष नाही, ५६ वर्ष झाली महाराष्ट्रात भटकतो आहे. मला विधानसभेत येऊन ५६ वर्षे झाली आहेत. त्यामुळे हा आत्मा ५६ वर्षे महाराष्ट्रात फिरतोय. या ५६ वर्षांत त्याला मोदींसारखी कोणी व्यक्ती भेटली नाही, असा टोला त्यांनी लगावला.

पुढे बोलताना, आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या, आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले, आम्ही राजीव गांधी पाहिले, आम्ही नरसिंह राव पहिले, अनेकांबरोबर काम केलं. त्यांची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोणीतरी आत्मा आहे, त्याची चिंता मोदींना वाटते आहे. तो आत्मा महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला, या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल, त्यासाठी तो महाराष्ट्रात हिंडतोय, असेही ते म्हणाले.