“मी प्रचारात उतरले नाही म्हणून मी नाराज असल्याच्या चर्चा उद्भवल्या. पण मी नाराज बिलकूल नाही. तिकीट कापल्यामुळे मला खंत वाटली, पण मी पक्षाविरोधात जाणार नाही. माझ्या वडिलांनी १९८५ पासून जिल्ह्यात शिवसेनेचे काम सुरू केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेसाठी अहोरात्र काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी राजश्री पाटील यांच्या प्रचारात उतरणार आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात यश पडावे आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी मी हातभार लावणार आहे”, अशी भूमिका भावना गवळी यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचेही भावना गवळी यांच्याप्रमाणे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी देत हेमंत पाटील यांची समजूत काढली गेली. राजश्री पाटील यांचे माहेर यवतमाळमध्ये असल्यामुळे त्यांना याठिकाणी उमेदवारी दिली असल्याचे बोलले जाते. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर सभा घेतली. मात्र या सभेला भावना गवळी अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे तर्क-वितर्क लढविले जात होते. मात्र आता भावना गवळी यांनीच त्यावर पडदा टाकला आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा नेतृत्व केल्यानंतरही शिवसेनेच्या शिंदे गटाने उमेदवारी नाकारल्याने विद्यमान खासदार भावना गवळी प्रचंड नाराज आहेत. त्या कोणालाही भेटल्या नाहीत. मात्र दोन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गवळी यांच्याशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळविल्याची चर्चा आहे.

लोकसभेच्या रिंगणात उमेदवारांची उणीदुणी; जनतेचे मनोरंजन! उमेदवारांनी विकासावर बोलण्याची मतदारांची अपेक्षा

आजच्या पत्रकार परिषदेत भावना गवळी म्हणाल्या, १९९९ पासून यवतमाळ-वाशिमचे प्रतिनिधित्व करत आहे. वाशिमची निर्मिती झाल्यापासून जिल्ह्याच्या विकासासाठी मी प्रयत्न करत आले आहे. वाशिममध्ये रेल्वेचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, असे सांगून गेल्या काही वर्षांमध्ये यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामांची उजळणी भावना गवळी यांनी केली. खासदारांनी काम केले नाही, म्हणून मला उमेदवारी नाकारली, असे काही लोक बोलत आहेत. त्यामुळे मी मागच्या २५ वर्षांत केलेल्या कामांचा इथे लेखाजोखा देत आहे.

खासदार भावना गवळींच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष, तब्बल पंचवीस वर्षानंतर…

‘मै मेरी झाशी नही दूंगी’, असे म्हणत भावना गवळी यांनी उमेदवारीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढत दिली. मात्र त्यांना अपयश आले. विदर्भातील शिवसेनेच्या ताकदवान नेत्यांमध्ये खासदार भावना गवळी यांचा समावेश होतो. २०१९ मध्ये सलग पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकून भावना गवळी यांनी आपला राजकीय दबदबा सिद्ध केला होता. तर २०२४ च्या त्या संभाव्य उमेदवार म्हणून सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याआधीच त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भावना गवळी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील राजकारणात समर्थपणे पाय रोवून उभ्या आहेत. मात्र एकदाही पराभूत न झालेल्या खासदार भावना गवळी यांना भाजप व पक्षातील अंतर्गत विरोधामुळे उमेदवारी नाकरण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde faction mp bhavana gawali express her views on denied ticket from yavatmal washim lok sabha seat kvg
Show comments