लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या सुरू आहे. पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रचाराने वेग घेतला असून आज महाविकास आघाडीची पालघरमध्ये भारती कामडी यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “महायुतीचे इंजिन हे थापांचं इंजिन असून त्यांच्या इंजिनला कितीही डब्बे जोडले तरी ते पुढे सरकत नाही”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“कधी नाही तेवढा महाराष्ट्र आज संतप्त आहे. कोणत्याही परिस्थितीत इंडिया आघाडीचे सरकार हा महाराष्ट्र आणणार म्हणजे आणणार आहे. आम्हाला काहीजण प्रश्न विचारत आहेत की, १० वर्ष तुम्ही भाजपाबरोबर होतात. मात्र, कोणी कोणाच्या पाठीत वार केला हे सर्व जनतेला माहिती आहे. आम्हाला तेव्हा आशा होती की, नरेंद्र मोदी काहीतरी चांगलं काम करून दाखवतील. आता त्यांचे नेते म्हणत आहेत की, ट्रीपल इंजिन, ट्रीपल इंजिन. त्यांना अजून किती इंजिन लागतात काय माहित. ते फक्त डब्बे जोडत आहेत, पण इंजिन पुढे सरकतच नाही”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

हेही वाचा : ‘मराठा बांधवांच्या रोषामुळे बीडची प्रचारसभा टाळली?’ देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“गेल्या १० वर्षात ते फक्त थापाच टाकत आहेत. वाफाचं इंजिन होतं, तसं यांचं फक्त थापांचं इंजिन आहे. मात्र, आता तुम्ही कितीही डब्बे लावले तरी जनतेने ठरवलेले आहे की देशातलं मुख्य इंजिनच बदलून टाकायचं. तुम्ही जी बुलेट ट्रेन आणत आहात, त्यापेक्षा जास्त स्पीडने तुमचं इंजिन गुजरातला पाठवणार आहोत”, अशा खोचक शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मला काहीवेळा यांची कीव येते. या लोकांना कितीवेळा बोलायचं, पण तरीही हे सुधरत नाहीत. भारतीय जनता पक्षांचे लोक बेअकली आहेत. ज्यांना अक्कल असते त्यांना एकदा सांगितलेलं कळतं. मात्र, यांना कळतच नाही म्हणून हे बेअकली आहेत. मी अमित शाहांना सांगतो की, तुम्हाला जरा थोडी अक्कल असेल तर तुम्ही व्यासपीठावर माझ्या समोर या. मग मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या”, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“नरेंद्र मोदी तुम्ही ज्यांकडे मतांची भीक मागता त्यांचा कधी विचार केला का? दोन कोटी रोजगार देणार होतात त्याचं काय झालं? आता नरेंद्र मोदी यांचंही कंत्राट रद्द का करु नये, हा प्रश्न जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्र मोदी ४ जूनला निवृत्त होत आहेत”, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.