भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, ही चर्चा आता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढविणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कापण्यात आला आहे. १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. ही सर्व पार्श्वभूमी पाहता निकम यांना उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
उज्ज्वल निकम यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर.

दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका जाहीर केली. विरोधकांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपाच्या गोटातही उमेदवार ठरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. अखेर आज उज्ज्वल निकम यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. निकम यांच्या नावाच्या घोषणेमुळे पूनम महाजन की आशिष शेलार? यापैकी कोण? ही चर्चाही संपुष्टात आली आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा संमिश्र लोकवस्तीचा परिसर आहे. याठिकाणी मुस्लिम व ख्रिश्चन मतदारांची संख्या पाच ते सहा लाख एवढी आहे. तर विलेपार्ले, चांदिवली, कुर्ल्यातील काही भाग, कालिना, वांद्रे सरकारी कॉलनी आदी भागात मराठी, उत्तर भारतीय व अन्य मतदार आहेत. या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे ‘ मातोश्री ‘ निवासस्थान असून ठाकरे गटाचीही ताकद मोठी आहे.

पूनम महाजन यांना उमेदवारी का नाही दिली?

खासदार पूनम महाजन या २०१९ मध्ये एक लाख ३७ हजार मतांनी निवडून आल्या होत्या. पण या विजयात ठाकरे गटाचीही किमान दीड-दोन लाख मते आहेत. महाजन यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांच्या तक्रारी, मतदारांशी पुरेसा संपर्क नसणे, आदी बाबींमुळे भाजपने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली नाही.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना भाजप नेत्यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारणातच रहायचे असल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे अन्य नावांबरोबरच भाजपने निकम यांच्याबाबतही विचार केला गेला, असे सांगितले जाते.

संपूर्ण ताकदीनिशी आव्हान पेलणार – निकम

“भाजपाने मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा आभारी आहे. मला कल्पना आहे की, राजकारण माझ्यासाठी नवीन क्षेत्र आहे. पण माझे प्रामाणिक प्रयत्न असतील की, जे देशद्रोही तत्त्व आहेत, त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करेन. भाजपाने जी जबाबदारी टाकली आहे, ती पूर्ण करण्याचा मी ताकदीनिशी प्रयत्न करेन”, अशी प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ujjawal nikam bjp lok sabha candidate from mumbai north central drops sitting mp poonam mahajan kvg