करोनाचा अधिकतर धोका असलेले ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले रुग्ण यांच्यासाठी तिसऱ्या टप्प्याअंतर्गत लसीकरण सोमवारपासून सुरू झाले आहे. परंतु यासाठी नोंदणी करणे बंधनकारक केले असून याबाबत अनेक संभ्रम आहेत. या पूर्ण प्रक्रियेची योग्य माहिती समजून घेऊया.

गेल्या वर्षी याच महिन्यापासून करोना संसर्गाने थैमान घालायला सुरुवात केली. नवीन असलेल्या विषाणूचा प्रसार, प्रतिबंध, उपाययोजना यांबाबत सारेच चाचपडत असताना ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या सहव्याधीचे रुग्ण यांना करोना विषाणू विळख्यात जायबंदी होत असल्याचे प्रामुख्याने निदर्शनास आले. तेव्हा जोखमीच्या गटातील या व्यक्तींना सावधानतेचा इशारा देत काळजी घेण्याचे आवाहन केले गेले. त्यामुळे करोनाबाधित होण्याच्या भीतीने अनेक ज्येष्ठांनी, सहव्याधीच्या रुग्णांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले. जवळचे नातेवाईक गमावल्याचा मानसिक आघात झेपवत स्वत:चे या विषाणूपासून रक्षण करण्याची यांची धडपड गेले वर्षभर सुरू आहे. आरोग्य आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनंतर सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधीच्या रुग्णांसाठी लसीकरण सुरू केले आणि सर्वत्र लस घेण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. परंतु लस नेमकी कशी घ्यायची यासाठी काय करावे याची माहिती योग्य रीतीने जनसामान्यांपर्यत पोहोचलेली नाही.

नोंदणी स्वत: लस घेणाऱ्यांनीच करणे आवश्यक आहे का?

नोंदणी करणे क्लिष्ट वाटत असल्यास तुमच्या वतीने कोणीही, कोणत्याही ठिकाणाहून नोंदणी करू शकतात. त्यामुळे नोंदणी करण्यात अडचण येत असल्यास इतरांची मदत घेतल्यास सोयीस्कर होईल.

नोंदणीचे टप्पे

या संकेतस्थळावर मोबाइल क्रमांक देणे अनिवार्य आहे. मोबाइलवर आलेला ओटीपी नमूद केल्यानंतर मोबाइल क्रमांक नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचाच आहे का याची पडताळणी केली जाते. पुढच्या टप्प्यात आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, पॅनकार्ड, सेवानिवृत्ती वेतन पासबुक किंवा पारपत्र (पासपोर्ट) यांपैकी एका ओळखपत्राची माहिती देणे आवश्यक आहे. ओळखपत्राचा क्रमांक आणि ओळखपत्रात नमूद केलेल्या पद्धतीत नाव लिहावे. जन्माचे वर्ष (उदा. १९५७) लिहून पुढे जावे.

पुढच्या टप्प्यात तुमच्या खात्याच्या माहितीमध्ये नाव, लिंग, जन्म वर्ष, फोटो आयडी, आयडी क्रमांक आणि लस घेण्याची वेळ घेतली आहे का (स्टेटस) याची माहिती दिसते. याच्या बाजूलाच छोटेसे कॅलेंडरचे सांकेतिक चिन्ह दिसते. या चिन्हावर क्लिक केल्यावर लस घेण्याची वेळ(अपॉईंटमेंट) घेण्याचा पर्याय दिसतो. यात लस घेण्याचे केंद्र निवडण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका, पिनकोड यांची माहिती भरावी. त्यानुसार उपलब्ध केंद्रांची माहिती दिसते. या केंद्रावर क्लिक केल्यानंतर वेळ आणि दिवसाची निवड करावी. संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर लशीची नोंदणी पूर्ण झाल्याचा संदेश दिसतो.

नोंदणी न करताही लस घेण्यास जाता येते का?

राज्यात काही सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये नोंदणी करून लस देण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे. तेव्हा आपल्या भागातील अशा रुग्णालयांची माहिती घेऊन तेथे थेट गेल्यास नोंदणी करून लस दिली जाते.

लस मोफत उपलब्ध आहे का?

सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये एका मात्रेची २५० रुपये याप्रमाणे ५०० रुपये आकारले जातात.

लस घेण्यासाठी जाताना कोणती कागदपत्रे न्यावीत?

नोंदणीच्या वेळेस माहिती दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड न्यावे. तसेच ४५ वर्षांवरील सहव्याधीचे रुग्ण असल्यास उपचार घेत असलेल्या डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि आजारासंबंधीचे वैद्यकीय अहवाल किंवा कागदपत्रे नेणे आवश्यक आहे.

लस निवडीचा पर्याय आहे का?

कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणती लस घ्यावी याच्या निवडीची मुभा नाही. निवडलेल्या केंद्रावर उपलब्ध असलेलीच लस मिळू शकेल.

दुसरी मात्रा कशी मिळेल?

पहिली लस घेतलेल्या केंद्राकडूनच दुसरी लस घेण्यासाठीचा संदेश येईल. तुम्ही त्या वेळेस दुसऱ्या राज्यात किंवा अन्य तालुक्यात असल्यास जवळील केंद्रात जाऊन लस घेण्याचा पर्यायही निवडण्याची मुभा असेल.

लस घेण्याची वेळ बदलता येते का?

लस घेण्यासाठी निवडलेला दिवस किंवा वेळ बदलण्याची मुभा आहे. फक्त त्या दिवशीच्या आदल्या दिवसापर्यंतच हा पर्याय उपलब्ध असेल.

लस घेताना काय माहिती देणे गरजेचे आहे?

लस घेण्यापूर्वी संबंधितांना कोणत्या औषधांची किंवा इतर अ‍ॅलर्जी आहे का, इम्युनोसप्रेस औषधे किंवा गोठलेले रक्त पातळ होण्यासाठी औषधे घेत आहेत का किंवा त्या वेळेस ताप किंवा अन्य काही त्रास होत आहे का याची योग्य माहिती देणे आवश्यक आहे.

लस कोणासाठी?

लस ही फक्त ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठीच सध्या खुली केली आहे. त्यामुळे या अटी-शर्तीमध्ये बसणाऱ्यांनाच ती घेता येणार आहे.

  • ४५ वर्षांवरील सहव्याधींमध्ये पुढील रुग्णांचा समावेश आहे
  • गेल्या वर्षभरात हृदयविकार(हार्ट फ्येल्युअर) झालेले
  • हृदयविकारामुळे केलेले प्रत्यारोपण किंवा एलवॅड
  • जन्मजात हृदयविकार
  • रक्तपुरवठा सुरळीत न झाल्याने हृदयविकार झालेले आणि उच्च रक्तदाब, मधुमेह असलेले
  • उच्च रक्तदाब, मधुमेहाचे रुग्ण
  • फुप्फुसाचा विकार असलेले
  • पक्षाघात झालेले आणि उच्च रक्तदाब, मधुमेहाचे रुग्ण
  • १ जुलै २०२० नंतर निदान झालेले कर्करोगाचे रुग्ण तसेच कर्करोगाचे उपचार घेत असलेले रुग्ण
  • एचआयव्ही रुग्ण
  • मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण केलेले किंवा प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण
  • डायलिसिसवर असलेले मूत्रपिंड विकाराचे रुग्ण
  • बरा न होणारा सिरॉसिस
  • मागील दोन वर्षांत तीव्र श्वसनाचा आजार असल्यास
  • ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोमाचे रुग्ण
  • बराच काळ इम्युनोसप्रेस औषध घेत असलेले रुग्ण
  • मतिमंदत्व आलेले, अ‍ॅसिड हल्ल्यामुळे श्वसनव्यवस्थेवर परिणाम झालेले, आधाराशिवाय किंवा मदतीशिवाय काहीच करू  न शकणाऱ्या अपंग व्यक्ती, कर्णबधिर, अंधत्व यांसह एकापेक्षा अधिक प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्ती
  • सिकल सेल, बोन मॅरो फ्येल्युअर, तीव्र प्रमाणात रक्तक्षय, गंभीर स्वरूपाचा थॅलेसेमिया

लस घेण्यासाठी काय करावे?

लस घेण्यासाठी आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी ऑनलाइन पद्धतीने selfregistration.cowin.gov.in किंवा http://www.covin.gov.in येथे करता येते. (नोंदणीसाठी ही दोन संकेतस्थळे उपलब्ध असून कोणतेही अ‍ॅप नाही. त्यामुळे नागरिकांनी कोविन अ‍ॅप  आणि कोविन संकेतस्थळ यात गल्लत करू नये.)

संकलन- शैलजा तिवले