प्रज्ञा तळेगावकर
कॉर्पोरेट कंपन्या आणि त्यातील संस्कृती ही चकचकीत, परीट घडीची. त्यांचे कपडे, बूट, वागण्या-बोलण्याचे नियम यांच्याविषयी अशा कंपन्यांमध्ये काम करणारे आणि त्यांचा मानव संसाधन विभाग सजग असताे. मात्र, आता एका संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांना दर सोमवारी इस्त्री न केलेले कपडे वापरण्याची सूचना केली आहे. ही संस्था कोणती आणि अशी अनोखी सूचना करण्यामागे त्यांचा हेतू कोणता हे जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या संस्थेची सूचना?

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) या भारतातील प्रमुख संशोधन संस्थेने आपल्या नुकत्याच केलेल्या ‘रिंकल्स अच्छे है’ (Wrinkles Acche Hai – WAH) या उपक्रमात दर सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना सुरकुत्या असलेले कपडे म्हणजेच इस्त्री न केलेले कपडे घालण्यास सांगितले आहे. ही सूचना काही प्रमाणात ‘कॅज्युअल फ्रायडे’सारखी आहे. ज्यात कर्मचाऱ्यांच्या उत्साहाची पातळी राखून कामाच्या ठिकाणी मनोबल वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. ज्यात शुक्रवारी खास कार्यालयीन पोषाख परिधान करणे अनिवार्य नसते.  

हेही वाचा >>>बँक ऑफ बडोदाच्या मोबाइल ॲपवरील बंधने मागे; RBI ने का केली होती कारवाई?

‘सीएसआयआर’ची भूमिका कोणती? 

पर्यावरणाचे रक्षण करणे आणि हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करणे ही या उपक्रमामागील ‘सीएसआयआर’ची भूमिका असल्याचे ‘सीएसआयआर’च्या सचिव आणि पहिल्या महिला महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ही मोहीम ऊर्जा बचत करण्याच्या ‘सीएसआयआर’च्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. १ ते १५ मे दरम्यान ‘सीएसआयआर’च्या ‘स्वच्छता पंधरवडा’चा एक भाग म्हणून ‘रिंकल्स अच्छे हैं’ ही मोहीम सुरू करण्यात आली असून ती जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान प्रायोगिक चाचणी म्हणून लागू केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘सीएसआयआर’च्या ‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमाचे उद्दिष्ट देशभरातील ‘सीएसआयआर’च्या प्रयोगशाळांमधील विजेचा वापर कमी करणे आणि कामाच्या ठिकाणी वीज खर्च १० टक्क्यांनी कमी करणे हे आहे.

या उपक्रमातून पर्यावरणाचे रक्षण कसे?

‘सीएसआयआर’चा ‘रिंकल्स अच्छे है’ उपक्रम हा हवामान बदलाविरुद्ध प्रतीकात्मक लढा आहे; ऊर्जा बचत करण्यासाठी हातभार लावणे, हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. कपड्यांच्या प्रत्येक सेटला (दोन कपड्यांना) इस्त्री केल्याने जवळपास २०० ग्रॅम कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित होतो. आवड्यातील एक दिवस बिना इस्त्राचे कपडे घातल्यास एक व्यक्ती २०० ग्रॅम कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखू शकते. कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणे हे ‘रिंकल्स अच्छे है’चे उद्दिष्ट आहे. जर लाखो लोकांनी असे केले तर आपण मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन वाचवू, असे ‘सीएसआयआर’ला वाटते. 

हेही वाचा >>>स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

किती कर्ब उत्सर्जन रोखले जाऊ शकते? 

सध्या दर सोमवारी ६,२५,००० लोक यात सहभागी होत आहेत. त्यातून ते दर सोमवारी सुमारे १,२५,००० किलो कार्बन उत्सर्जन टाळले जाते. या वर्षाच्या अखेरीस एक कोटीहून अधिक लोक या ‘रिंकल्स अच्छे है’ सोमवारच्या उपक्रमात सामील होतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

कर्ब उत्सर्जनाचे तोटे कोणते?

कार्बन डाय ऑक्साइडच्या उत्सर्जनात वाढ झाल्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान सतत वाढत राहते, ज्यामुळे जागतिक हवामान बदल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनांची एक जटिल साखळी निर्माण होते . जागतिक हवामान बदलामुळे केवळ तापमानातच वाढ होत नाही, तर हवामानाचे स्वरूप आणि पृथ्वीवरील सामान्य हवामानदेखील बदलते आहे. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How effective is csir unique advice on saving electricity print exp amy
Show comments