संदीप कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पराभूत व्हावे लागल्याने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी गमवावी लागली. या मालिकेनंतर भारतीय संघ व्यवस्थापनेसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारतामध्येच या वर्षी विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने संघ व्यवस्थापनाला काही गोष्टी गांभीर्याने घ्याव्या लागतील. भारतीय संघाची विश्वचषक स्पर्धेची तयारी कशी सुरू आहे, भारतासमोर कोणती आव्हाने आहेत, याचा घेतलेला हा आढावा.

सलामीला भारताकडे कोणकोणते पर्याय?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघेही सलामीला आले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनला संधी देण्यात आली होती. त्या लढतीत इशानला केवळ तीनच धावा करता आल्या. यानंतर रोहित संघात आल्याने साहजिकच त्याला बाहेर बसावे लागले. मात्र, या वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा पाहता इशानला संघात स्थान मिळेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याची दावेदारी प्रबळही दिसत आहे. विश्वचषक स्पर्धेआधी त्याला पुरेशी संधी मिळणे गरजेचे आहे, जेणेकरून तो स्वत:ला सिद्ध करू शकेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहितला १३ व ३० अशा धावा करता आल्या. दुसरीकडे, शुभमनलाही या मालिकेत म्हणावा तसा सूर गवसला नाही. त्याला २०, ०, ३७ अशा खेळी करता आल्या. शुभमनची लय पाहता त्याच्याकडून संघाला अपेक्षा आहेत. या तिघांशिवाय सलामीला तसे फारसे पर्याय दिसत नाही. मात्र, आगामी काळात होणाऱ्या सामन्यांमध्ये या तिघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल.

मधल्या फळीची मदार कोणावर?

भारताच्या मध्यक्रमात विराट कोहली, के. एल. राहुल आणि सूर्यकुमार यादवसारखे फलंदाज आहेत. भारताच्या दिग्गज फलंदाजांमध्ये विराट गणला जातो. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत विराटच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ०,३१, ५४ अशी कामगिरी केली. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विराट मैदानात असेपर्यंत भारत सामना जिंकेल असे दिसत होते. मात्र, तो बाद झाल्यानंतर सामन्याचे चित्र पालटले. त्यामुळे भारताला प्रत्येक वेळी विराटवर अवलंबून राहण्याची सवय मोडावी लागेल. के. एल. राहुलवर कसोटी मालिकेतील खराब कामगिरीमुळे टीका झाली होती आणि अखेरच्या दोन कसोटींत त्याला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळाले नाही. पंतला दुखापत झाल्याने भारताने यष्टीरक्षणाची जबाबदारीही एकदिवसीय सामन्यात राहुलवर दिली, जेणेकरून संघाला अतिरिक्त खेळाडू खेळवण्यास मिळेल. पहिल्या सामन्यात ७५ धावांच्या निर्णायक खेळीच्या बळावर त्याने भारताला विजय मिळवून दिला. मात्र, त्यानंतरच्या सामन्यांत ९, ३२ अशी कामगिरी त्याने केली. भारताकडून या मालिकेत सर्वोत्तम ११६ धावा त्याने केल्या. त्यामुळे आगामी काळातही संघ व्यवस्थापन त्याची ही भूमिका कायम ठेवण्याची शक्यता आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज अशी ओळख असणाऱ्या सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निराशा केली. त्याला तिन्ही सामन्यांत भोपळाही फोडता आला नाही. त्याची कामगिरी निराशाजनक असली तरीही, श्रेयस अय्यर जायबंदी असल्याने सूर्यकुमारला संघ व्यवस्थापन आणखी संधी देऊ शकते.

भारतासाठी विश्वचषक स्पर्धेत अष्टपैलू निर्णायक का ठरतील?

हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांच्या रूपाने भारतीय संघात चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मात्र, हार्दिकची संमिश्र कामगिरी राहिली. पहिल्या सामन्यात त्याच्या नेतृत्वाखाली भारताने विजय नोंदवला. त्यामुळे त्याने फलंदाजीत २५ धावा करता एक बळी मिळवला. दुसऱ्या सामन्यात त्याला छाप पाडता आली नाही. तिसऱ्या लढतीत ४० धावा करताना गोलंदाजीत तीन बळी त्याने मिळवले. तरीही भारताने सामना गमावला. मात्र, विश्वचषकाच्या दृष्टीने हार्दिक हा महत्त्वाचा खेळाडू आहे. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर जडेजा चांगल्या लयीत असला तरीही, एकदिवसीय मालिकेत त्याला चुणूक दाखवता आली नाही. पहिल्या लढतीत त्याने नाबाद ४५ धावा केल्या, तर गोलंदाजीत २ बळी मिळवले. उर्वरित सामन्यांमध्ये त्याने निराशा केली. कसोटी मालिकेत आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या अक्षरला दुसऱ्या व तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली. दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद २९ धावांची खेळी केली, तर तिसऱ्या लढतीत त्याने गोलंदाजीत दोन बळी मिळवले. हार्दिक, रवींद्र व अक्षर भारताच्या विश्वचषक मोहिमेतील महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यामुळे आगामी काळात या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्व जण लक्ष ठेवून असतील.

कुलदीप व चहल फिरकी जोडीचे भवितव्य काय?

कुलदीप यादव व युजवेंद्र चहल ही फिरकी जोडी अनेक फलंदाजांची चिंता वाढवायची. मात्र, गेल्या काही काळापासून ही फिरकी जोडी एकत्र खेळताना दिसत नाही. दोघांपैकी एक गोलंदाज सामन्यात खेळतो. कुलदीपने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चार बळी मिळवताना आपली उपयुक्तता सिद्ध केली. बराच काळापासून चहलला फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे संघातील त्याच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे भारताच्या विश्वचषक मोहिमेतून चहलला स्थान आहे का हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन येणाऱ्या काळात चहलला संधी देते का याकडे सर्वांचे लक्ष असेल.

शमी, सिराजशिवाय भारताकडे तिसऱ्या गोलंदाजाचा पर्याय कोण?

मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांच्यावर भारताच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी आहे. भारताकडे अष्टपैलूंचे चांगले पर्याय उपलब्ध असल्याने गेल्या काही काळात हे दोघेही एकदिवसीय संघात सातत्याने खेळत आहेत. तसेच, भारताकडे हार्दिक पंड्याच्या रूपात एक पर्यायी मध्यमगती गोलंदाज आहे. असे असले तरीही तिसरा वेगवान गोलंदाजाचा पर्याय फारसा समाधानकारक दिसत नाही. जायबंदी झाल्याने बराच काळ संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमरा विश्वचषक स्पर्धेआधी पुनरागमन करण्याची शक्यता असली तरीही, त्याच्या लयीबाबत साशंकता असेल. दीपक चहर, प्रसिध कृष्णाही जायबंदी असल्याने तंदुरुस्त होण्यासाठी मेहनत घेत आहे. त्यातच भारताकडे उमरान मलिक व शार्दूल ठाकूरच्या रूपात दोन पर्याय आहेत. उमरानकडे गती आहे, तर शार्दूल निर्णायक क्षणी संघाला बळी मिळवून देण्यास सक्षम आहे. शार्दूल चांगली फलंदाजीही करतो. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने संधी दिली जाऊ शकते. शार्दूलला पहिल्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली, मात्र त्याला चमक दाखवता आली नाही

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How is india preparing for the odi world cup what errors were seen in the australia seriesprint exp scj
First published on: 27-03-2023 at 11:02 IST