अनिकेत साठे

स्वदेशी बनावटीच्या आयएनएस अरिहंत अणुपाणबुडीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याच्या यशस्वी झालेल्या चाचणीमुळे भारताने पाण्यातूनदेखील अण्वस्त्र डागण्याची क्षमता प्राप्त केली आहे. जगात ही क्षमता धारण करणारे बोटावर मोजता येतील इतकेच देश असून त्यात आता भारताचाही समावेश झाला आहे. विस्तारलेली क्षमता किमान खात्रीशीर आण्विक प्ररोधनाचा (डिटरन्स) मार्ग प्रशस्त करणारी आहे.

Finance Ministry report predicts a comforting dip in inflation amid forecasted monsoon rains
महागाईत दिलासादायी उताराचा अंदाज; मोसमी पावसाच्या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाचा अहवाल
India Ballistic Missile Defence
विश्लेषण :‘आयर्न डोम’ मुळे इस्रायलचा बचाव… भारताकडे कोणती हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली?
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

चाचणी नेमकी काय होती?

अणुशक्तीवर चालणाऱ्या आयएनएस अरिहंत या नौदलाच्या पाणबुडीतून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी बंगालच्या उपसागरात घेण्यात आली. डागलेल्या क्षेपणास्त्राने अतिशय अचूकतेने लक्ष्याचा वेध घेतला. या वेळी पाणबुडीवरील शस्त्र परिचालन प्रणाली, तांत्रिक मापदंडांचे अवलोकन करण्यात आले. यशस्वीरीत्या पार पडलेली चाचणी क्षेपणास्त्रयुक्त अणुपाणबुडी कार्यक्रमास बळकटी देणार आहे.

चाचणीचे महत्त्व काय?

देशाने जमीन, हवेतून अण्वस्त्र डागण्याची क्षमता यापूर्वीच प्राप्त केलेली आहे. आयएनएस अरिहंतमुळे पाण्याखालून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमताही दृष्टिपथास आली. आण्विक पाणबुडीतून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता राखणारे अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन असे मोजकेच देश आहेत. या यादीत भारताला स्थान मिळाले. आण्विक प्ररोधनातील हा निर्णायक टप्पा ठरणार आहे.

अणुपाणबुडी योजना काय आहे?

अणुशक्तीवर चालणारी आणि अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता राखणारी आयएनएस अरिहंत ही स्वदेशी बनावटीची पहिलीच पाणबुडी आहे. चार वर्षांपूर्वी ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. अरिहंत वर्गातील दुसऱ्या अरिघाट पाणबुडीच्या सध्या सागरी चाचण्या सुरू असल्याचे सांगितले जाते.  भारताने या वर्गातील तिसरी पाणबुडीही तयार केल्याकडे मध्यंतरी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी, उपग्रह प्रतिमांच्या आधारे लक्ष वेधले होते. भारतीय नौदलाच्या ताफ्यात १५ पारंपरिक पाणबुडय़ा (डिझेल वा विजेवर चालणाऱ्या) आहेत. नव्याने आणखी काही दाखल होण्याच्या मार्गावर आहेत. अरिहंतमुळे भारताची जमीन, पाणी आणि हवा अशा तिन्ही माध्यमांतून अण्वस्त्रे डागण्याची यंत्रणा पूर्ण झाली. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रयुक्त अणुपाणबुडीची रचना, बांधणी व संचालन करू शकणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला. पाच दशकांपूर्वी अणुपाणबुडीच्या विकासाची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली होती. १९९८ मध्ये विशाखापट्टणम जहाजबांधणी केंद्रात प्रत्यक्ष काम सुरू झाले. लहान आकाराची अणुभट्टी तयार करण्याचे आव्हान पेलून ११ वर्षांनी ती आकारास आली. अनेक आव्हाने पार करीत हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहे.

स्वदेशी क्षेपणास्त्र विकास कसा?

संरक्षण मंत्रालयाने चाचणीत वापरलेल्या क्षेपणास्त्राचा पल्ला, अन्य तपशील स्पष्ट केलेला नाही. मात्र ते ‘के-१५’ (सागरिका) क्षेपणास्त्र असल्याचा अंदाज आहे. अडीच वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी २०२० मध्ये आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘के-चार’ क्षेपणास्त्रांची चाचणी झाली होती. तेव्हाच ही क्षेपणास्त्रे आयएनएस अरिहंतवर तैनात करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले गेले. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमात महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावावरून त्यास सांकेतिक नाव (के) देण्यात आले. संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठानने (डीआरडीओ) पाणबुडीतून डागता येणारे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. ‘के’ मालिकेत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा विकास प्रगतिपथावर आहे. त्या दृष्टीने पाणबुडीतून आण्विक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता वृिद्धगत होत आहे.

सभोवतालची स्थिती काय?

शेजारील चिनी नौदलाकडे अणुशक्तीवर चालणाऱ्या सध्या सहा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता राखणाऱ्या पाणबुडय़ा आहेत. याव्यतिरिक्त डिझेलवर आधारित ४६ पाणबुडय़ांचे ते संचालन करतात. चिनी नौदलाच्या आराखडय़ानुसार ६५ ते ७० पाणबुडय़ांची देखभाल दुरुस्तीचे नियोजन असून त्याअंतर्गत हा विभाग अधिक सक्षम करण्यात येणार आहे. दुसरीकडे पाकिस्तान नौदल डिझेल-इलेक्ट्रिकवर आधारित पाच पाणबुडय़ा आणि आकारमानाने लहान असणाऱ्या तीन पाणबुडय़ा चालवते. चीनच्या अणुऊर्जेवरील काही पाणबुडय़ा अण्वस्त्र डागण्यास सक्षम आहेत. उभय शेजाऱ्यांशी भारताचे असणारे संबंध लक्षात घेता क्षमतांचा विकास हा महत्त्वाचा ठरतो.

आण्विक प्ररोधन कसे साध्य होईल?

भारताने अण्वस्त्राबाबत प्रथम वापर नाही हे धोरण ठेवले आहे. म्हणजे भारत कधीही पहिल्यांदा अण्वस्त्राचा वापर करणार नाही. मात्र, कुणी तसा हल्ला केल्यास त्यास त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, ही भूमिका त्यामागे आहे. देशाच्या हिताला धक्का देणारी कृती एखाद्या राष्ट्राने केली तर त्यास संभाव्य प्रतिहल्ल्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे असते. प्रतिहल्ल्याच्या धाकामुळे, संबंधिताला त्याच्या मूळ धोरणात बदल करण्यास भाग पाडता येते. प्ररोधनाचा हाच अर्थ आहे. प्रत्यक्ष हल्ला न करता बळाचा धाक निर्माण करून अपेक्षित ध्येय गाठता येते. पाण्याखालून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राने प्रत्याघाताची क्षमता विस्तारणार आहे. युद्धात जमीन, हवा व पाणी या माध्यमातील किमान एक यंत्रणा वापरण्यास उपलब्ध असणे महत्त्वाचे ठरते. पाणबुडय़ा शत्रूच्या पहिल्या हल्ल्यात स्वत:चा बचाव करू शकतात. शिवाय प्रत्युत्तरादाखल हल्ला चढवू शकतात. यातून किमान खात्रीशीर आण्विक प्ररोधनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.

aniket.sathe@expressindia.com