अमेरिकेमध्ये आणखी एका भारतीयाची हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मिसुरीच्या सेंट लुईसमध्ये शास्त्रीय नृत्य कलाकार अमरनाथ घोष यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अमरनाथ घोष यांची मैत्रीण आणि ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी यांनी शुक्रवारी X वर यासंदर्भात माहिती शेअर केली. देवोलीना या पोस्टमध्ये लिहितात की, “माझा मित्र अमरनाथ घोष यांची मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेतील सेंट लुईस अकादमी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या आईचं ३ वर्षांपूर्वी निधन झालं असून, वडिलांचं छत्र बालपणीच हरपल्यामुळे तो त्याच्या कुटुंबात एकटाच होता. सध्याच्या परिस्थितीत त्याच्या कुटुंबात आम्हा मित्रांशिवाय इतर कोणीही नाही. तो मूळ कोलकाता येथील रहिवासी होता. तसेच अमरनाथ घोष हा देवोलिनाचा जवळचा मित्र असल्याने याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लक्ष घालावं, अशी विनंती त्यांनी पोस्टद्वारे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोष हे व्यावसायिक भरतनाट्यममध्ये पारंगत असून, कुचीपुडी नृत्य कलाकारही होते. नृत्यात मास्टर ऑफ फाइन आर्ट्स (MFA) करण्यासाठी ते सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठात गेले होते. विद्यापीठाच्या वेबसाइटवरील त्यांच्या प्रोफाइलनुसार, त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखनावर संशोधन केले होते. घोष हे चार नृत्य प्रकारांमध्ये निपुण (भरतनाट्यम, कुचीपुडी, मणिपुरी आणि कथ्थक) होते, चेन्नईच्या कुचीपुडी आर्ट अकादमी आणि कलाक्षेत्र कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समधून त्यांनी नृत्य शिक्षणाचे धडे गिरवले. ते कोलकाता येथे लहानाचे मोठे झाले, जिथे त्यांनी रवींद्र नृत्य आणि संगीताची शांतीनिकेतन शैली आत्मसाद केली. “त्यांनी रवींद्र टागोरांच्या कवितेची समृद्धता दक्षिणेकडे आणण्याचा प्रयत्न केला. तसेच तरुणांना आणि मुलांना टागोरांच्या सुंदर उद्बोधक कवितेच्या बळावर प्रेरित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचंही त्यांची वेबसाइट amarnathendra.com वर सांगितले आहे.

NDTV दिलेल्या माहितीनुसार, घोष यांनी पद्मश्री अडयार के लक्ष्मण आणि एमव्ही नरसिंहाचारी यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते. त्यांना नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सवातून नृत्य कनक मणि सन्मान तसेच नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून कुचीपुडीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली. टाइम्स नाऊनुसार, घोष यांनी भारत आणि जगभरात अनेक ठिकाणी व्याख्यान प्रात्यक्षिके आणि कला प्रशंसा कार्यशाळा भरवल्या आहेत. मुंबईस्थित अभिनेते भट्टाचार्जी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, घोष कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले, तर पीडित अमरनाथ घोष यांनी लहानपणीच वडिलांना गमावले आहे.

हत्या कशी झाली?

भट्टाचार्जी यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझा मित्र अमरनाथ घोष याची मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेतील सेंट लुईस अकादमी परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या आरोपीचे तपशील आणि सर्व काही अद्याप उघड झालेले नाही. अमरनाथ उत्तम डान्सर होता आणि त्याठिकाणी तो पीएचडीचं शिक्षण पूर्ण करत होता. संध्याकाळी बाहेर फिरायला गेल्यावर एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सध्या अमेरिकेतील काही मित्र त्याचा मृतदेह भारतात परत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.” “भारतीय दूतावासाने याप्रकरणी लक्ष द्यावे, निदान आम्हा सगळ्यांना या हत्येमागचं कारण तरी समजलं पाहिजे,” असं देवोलीनाने यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच अभिनेत्रीने यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना टॅग करत मदतीची मागणी केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुरी येथे राहणारे पीडित अमरनाथ घोष यांचे काका श्यामल घोष सांगतात की, “आम्हाला नवी दिल्लीतील माझ्या बहिणीकडून त्याच्या मृत्यूबद्दल फोनवरून माहिती समजली. मृत्यूचे नेमके काय कारण आहे, आम्हाला माहीत नाही. अधिक माहिती घेण्यासाठी मी सुरी पोलीस ठाण्यात गेल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरनाथ घोष यांचे सुरीमध्येच घर आहे.” कुचीपुडी नृत्यांगना आणि घोषची शिक्षिका वेम्पती यांनी सांगितले की, बुधवारी घोष बेपत्ता असल्याची तिला माहिती समजली, त्यांच्या अनेक वर्गमित्रांनी तिला फोन करून हे सांगितलं. २४ तासांनंतर विद्यार्थी पोलिसांकडे गेले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अमरनाथ घोष यांचा शेजारी असल्याचा दावा करणारा सनातनु दत्ता सांगतो की, मंगळवारी त्यांनी घोष यांच्याशी व्हॉट्सॲपवर संभाषण केले.

“कोणीही धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले नव्हते. गुरुवारी सकाळी मला त्याचा साथीदार प्रवीण पॉल याचा फोन आला. मृतदेहाशेजारी मोबाईल आणि पाकीट सापडल्याचे त्याने सांगितले. दादांच्या बोटांचे ठसे जुळले होते,” असे दत्ता म्हणाला. सुरीच्या नगरसेवक सुप्राणा रे म्हणाल्या, “आम्ही प्रशासनाला अधिक तपशील शोधण्यासाठी सांगितले आहे.” घोष यांच्या अंत्यसंस्कारासाठी निधी गोळा करण्यासाठी निधी संकलन सुरू करण्यात आले आहे. घोष यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रति शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने प्रामाणिक सहानुभूती व्यक्त केली, तसेच त्यांनी सांगितले की, “फॉरेन्सिक लॅब, पोलिसांबरोबर तपासासाठी संपर्कात आहोत. घोष यांच्या नातेवाईकांना सगळी मदत करीत आहोत. तसेच भारतीयाची गोळ्या घालून हत्या केल्याचं प्रकरण तपासासाठी सेंट लुईस पोलीस आणि विद्यापीठाकडे जोरदारपणे उचलून धरले आहे.”

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांचा मृत्यू

घोष यांचा मृत्यू हा अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांच्या मृत्यूच्या मालिकेतील एक आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून अमेरिकन भूमीवर भारतीय वंशाच्या व्यक्तींची हत्या झाल्याची अर्धा डझनहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. सुमारे एक आठवड्यापूर्वी एका किशोरवयीन भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या बातमीने राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले होते. इलिनॉय युनिव्हर्सिटीच्या अकुल धवन या विद्यार्थ्याचा जानेवारीमध्ये वेस्ट नेवाडा स्ट्रीटवर एका क्लबजवळ मृत्यू झाला, जिथे त्याला प्रवेश नाकारण्यात आला होता. २० फेब्रुवारी रोजी घटनेच्या एका महिन्यानंतर इलिनॉयमधील चॅम्पेन काउंटी कॉरोनर कार्यालयाने असे सांगितले की, १८ वर्षांच्या अकुलचा हायपोथर्मियामुळे मृत्यू झाला असून, त्यानं मद्य प्राशन केलेले होते, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

त्याआधी केरळमधील भारतीय वंशाचे कुटुंब कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले होते आणि पोलिसांनी या प्रकरणाचा खून अन् आत्महत्येच्या अनुषंगाने तपास केला होता. ३७ वर्षीय आनंद हेन्री हा एक माजी मेटा सॉफ्टवेअर अभियंता होता, स्वतःवर बंदूक चालवून आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नी एलिस बेंझिगर (36) आणि त्यांच्या चार वर्षांच्या जुळ्या मुलांची हत्या केल्याचा संशय आहे. दुसरीकडे पर्ड्यू विद्यापीठातील विद्यार्थी समीर कामथ हा ५ फेब्रुवारी रोजी वॉरेन काउंटीमध्ये मृतावस्थेत आढळला होता. अमेरिकेत बेपत्ता झालेल्या नील आचार्य यांच्या मृत्यूची खातरजमा गेल्या महिन्यात याच विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केली होती. सर्वात भयंकर मृत्यू विवेक सैनीचा होता. हरियाणाचा रहिवासी असलेल्या विवेकची १६ जानेवारी रोजी जॉर्जियाच्या लिथोनियामध्ये ५० वेळा हातोड्याचा वार करून हत्या करण्यात आली होती. व्हाईट हाऊसचे अधिकारी जॉन किर्बी यांनी गेल्या महिन्यात भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांचा निषेध केला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian dance artist shot dead in us who was amarnath ghosh vrd