भारतीय विवाह शतकानुशतके काही विधी परंपरेनुसार होत आले आहेत. त्यातील अनेक प्रथा-परंपरा पितृसत्ताक असल्याचे म्हटले जाते. कन्यादान हा विधीदेखील याच परंपरेचा एक भाग आहे. हा विधी केल्याशिवाय कोणताच हिंदू विवाह पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. कन्यादान खरंच आवश्यक आहे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, विशेषतः आजच्या पिढीच्या. या पिढीचा कन्यादानाला विरोध असल्याचे पाहायला मिळते. दान करण्यासाठी मुलगी म्हणजे वस्तू आहे का? यांसारखे प्रश्नदेखील विचारले जातात. मात्र, हिंदू धर्मीयांसाठी विवाहातील इतर विधींइतकाच हा विधीही महत्त्वाचा आहे. याच संबंधित एका प्रकरणावर निर्णय देताना, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सांगितले की, हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह सोहळ्यासाठी ‘कन्यादान’ हा विधी आवश्यक नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हिंदू विवाह कायद्यानुसार वैध विवाहासाठी केवळ ‘सप्तपदी’ हा विधी आवश्यक आहे. ‘कन्यादान’ विधीची गरज नाही”, असे न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने सांगितले. कन्यादान आणि सप्तपदी म्हणजे काय? हिंदू विवाहात या विधींचे महत्त्व काय? अलाहाबाद उच्च न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

सप्तपदी आणि कन्यादान

सप्तपदी म्हणजे लग्न समारंभात वधू-वरांनी पवित्र अग्नीभोवती घेतलेले सात फेरे. प्रत्येक फेर्‍याला एक अर्थ असतो. या दरम्यान नवीन जोडप्याकडून एकमेकांना सात वचने दिली जातात. त्यात आरोग्य, आनंद, कल्याण, एकमेकांची काळजी व आदर यांसारख्या वचनांचा समावेश असतो. सनातन धर्मात या सात फेर्‍यांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, सप्तपदीतील सात वचनांमुळे वधू-वर सात जन्म एकत्र राहतात.

सप्तपदी म्हणजे लग्न समारंभात वधू-वरांनी पवित्र अग्नीभोवती घेतलेले सात फेरे. (छायाचित्र संग्रहीत)

कन्यादान हा विधी वैदिक काळातील असल्याचे म्हटले जाते. विवाह सोहळ्यातील कन्यादान हा विधी अतिशय भावनिक असतो. संस्कृतमधील शाब्दिक भाषांतरानुसार’कन्या’ म्हणजे मुलगी आणि ‘दान’चा अर्थ काहीतरी देणे, असा होतो. कन्यादान वधूच्या कुटुंबाद्वारे केले जाते. त्यामध्ये पालक त्यांच्या मुलीला पवित्र अग्नीच्या साक्षीने वराला सोपवतात. वधूचे वडील मुलीचा उजवा हात वराच्या हातात ठेवतात. वडील वराला विनंती करतात की, त्याने मुलीला समान वागणूक द्यावी. एक प्रकारे या विधीद्वारे वडील आपल्या मुलीची जबाबदारी तिच्या पतीवर सोपवून, नवीन आयुष्यासाठी त्यांना आशीर्वाद देतात. वधूची आई जोडप्याच्या हातावर पाणी ओतते आणि नंतर फुले, फळे आणि सुपारी हातात ठेवते. पुजाऱ्याच्या मंत्रपठणानंतर हा विधी पूर्ण होतो. हा विधी संपेपर्यंत वधूची आई काहीही पिणे किंवा खाणे टाळते.

हेही वाचा : “हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

मनुस्मृतीत कन्यादानाची संकल्पना सांगितली आहे. त्यानुसार स्त्रीसाठी पुरुष पालकत्व आवश्यक आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, मुलीचे लग्न होईपर्यंत वडील तिचे पालक असतात आणि नंतर ते पालकत्वपतीकडे सोपवले जाते, असे म्हटले आहे.

कन्यादानावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

सत्र न्यायाधीशांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या आशुतोष यादव नामक व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. आशुतोष यादव याने सत्र न्यायालयासमोर असे सांगितले होते की, हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह सोहळ्यात कन्यादान समारंभ अनिवार्य आहे, जो त्याच्या विवाहात झाला नाही. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, सत्र न्यायालयाच्या आदेशात, फिर्यादीने दाखल केलेल्या विवाह प्रमाणपत्रात हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह सोहळा झाल्याचा उल्लेख आहे. परंतु, कन्यादान विधीची वस्तुस्थिती तपासली गेली नाही.

“हिंदू विवाह कायद्यानुसार वैध विवाहासाठी ‘सप्तपदी’ म्हणजेच सात फेरे आवश्यक आहेत. त्यासाठी ‘कन्यादान’ विधीची गरज नाही”, असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी सांगितले आणि आशुतोष यादव यांची पुनरीक्षण याचिका फेटाळली.

कन्यादान हा विधी वैदिक काळातील असल्याचे म्हटले जाते. (छायाचित्र संग्रहीत)

हिंदू विवाह कायदा

एन. आर. राघवाचारीर यांचा हिंदू कायदा, १९८७ मध्ये असे म्हटले आहे की, ‘कन्निकदान’ किंवा ‘कन्यादान’ ‘ब्रह्म स्वरूपातील’ हिंदू विवाहाचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु, ‘कन्यादान’ हा विधी वगळल्यास विवाह अवैध ठरणार नाही. ‘न्यूज १८’ मधील वृत्तानुसार, हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम ७(२) मध्ये याचा समावेश करण्यात आला आहे.

कन्यादानाचा वाद

अनेकांचे म्हणणे आहे की, कन्यादान विधी हा वैदिक युगातील आहे. पूर्वी मुलींची लग्ने अगदी लहान वयात होत असत आणि त्यांना पालकांची गरज असायची. परंतु, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक तज्ज्ञ या विधीला चुकीचे मानतात. अनेक सेलिब्रिटींनीही त्या विरुद्ध आवाज उठवला आहे. बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिने फेब्रुवारी २०२१ मध्ये तिच्या लग्नादरम्यान कन्यादान आणि पाठवणी हे दोन्ही विधी वगळले. केवळ सेलिब्रिटीच नाही, तर अनेक लोक आज पुरुषप्रधान परंपरांच्या विरोधात बोलत आहेत.

२०१९ मध्ये, एका वडिलांनी आपल्या मुलीचे कन्यादान करण्यास नकार दिल्यानंतर त्यांचा व्हिडीओ ‘एक्स’वर व्हायरल झाला. ते म्हणाले की, त्यांनी हा विधी पाळला नाही. कारण- त्यांची मुलगी म्हणजे वस्तू नाही. सप्टेंबर २०२१ मध्ये अभिनेत्री आलिया भट्टनेही एका जाहिरातीद्वारे कन्यादान विधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये विवाहबंधनात अडकलेल्या मुंबईस्थित आयटी विश्लेषक मेघना त्रिवेदी यांनी सांगितले की, ‘कन्यादान’ या विधीला आजच्या युगात काहीही अर्थ नाही, परंतु तरीही तो विधी पार पाडावा लागतो. पंजाबीशी लग्न केलेल्या त्रिवेदी या गुजराती आहेत. त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांनी पुजाऱ्याला दुसरा मार्ग शोधण्यास सांगितले, परंतु पुजार्‍याने ‘कन्यादान’ करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

हेही वाचा : स्वातंत्र्यसैनिक ते कुख्यात गुंड; एका कुटुंबाचा सुरस व चमत्कारिक प्रवास

काहींचे म्हणणे आहे की, या विधीबद्दल लोकांमध्ये गैरसमज आहेत. मार्च २०२२ मध्ये, आयुषी गुप्ता यांनी सांगितले की, कन्यादान हे मुलीचे दान नसून, लग्नाच्या वेळी आपल्या मुलीचा हात वराकडे सोपविण्याची ती एक पद्धत आहे. लग्नातील या विधीद्वारे वडील आपल्या मुलीची जबाबदारी तिच्या पतीवर सोपवतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is kanyadan relevant today what allahabad highcourt said rac