हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. तसेच ‘सप्तपदी’ हा विवाह सोहळ्यातील महत्त्वाचा समारंभ आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. लखनौ येथील आशुतोष यादव नावाच्या व्यक्तिद्वारे दाखल एका पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी आशुतोष यादव यांच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, सत्र न्यायालयाने यादव यांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यानंतर यादव यांनी सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात पुनर्विचार दाखल केली होती. महत्त्वाचे म्हणजे सत्र न्यायालयात बोलताना त्यांच्या लग्नात कन्यादान आवश्यक असून हा सोहळा पार पडला नाही, असा दावा यादव यांनी केला होता.

हेही वाचा – स्वच्छ पर्यावरण जगण्याचा अधिकार! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा…

दरम्यान, यादव यांच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी कायद्यानुसार ‘सप्तपदी’ हा लग्नादरम्यान एक अत्यावश्यक समारंभ असून ‘कन्यादान’ हा आवश्यक समारंभ नाही, असे न्यायालयाने म्हटले. तसेच यादव यांची पुनर्विचारयाचिका रद्द केली.