पापुआ न्यू गिनीमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनात ढिगाऱ्याखाली दबून २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. धोकादायक भूभागामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचे सरकारने सोमवारी सांगितले. त्यामुळे कोणीही जिवंत सापडण्याची फारशी आशा नसतानाही गावकऱ्यांनी एका जोडप्याला जिवंत बाहेर काढले आहेत. रहिवाशांनी जॉन्सन आणि जॅकलिन यांडम नावाच्या जोडप्याला चमत्कारिकरीत्या वाचवले. विशेष म्हणजे यांडम जोडप्यानं एनबीसी न्यूजकडे भावनाही व्यक्त केल्यात. आम्ही मृत्यूला स्वीकारले होते, खरं तर आम्ही एकत्र मरण्यास तयार होतो, परंतु सुदैवानं आम्ही बचावलो. आमच्या डोळ्यांसमोर पूर्णतः अंधार होता, असंही त्या जोडप्याने सांगितलं. आपत्तीच्या चार दिवसांनंतरही इंगा प्रांतातील ग्रामस्थ आणि बचाव पथके ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध घेत आहेत. ढिगाऱ्याखाली २ हजारांहून अधिक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली असली तरी जवळपास ६ मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेय. खरं तर हवामानाची बिकट स्थिती, खोल अन् अस्ताव्यस्त पसरलेला ढिगारा आणि इतर आव्हानांमुळे बचावकार्यातही अडचणी निर्माण होत आहेत.

ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन फावडे आणि कुदळ घेऊन बचावकार्य राबवले आणि सुमारे आठ तास अडकून पडल्यानंतर जॉन आणि त्याची पत्नी जॅकलिन यांडम यांना वाचवण्यात यश आले. त्या क्षणी आमचे प्राण वाचले याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. आम्ही मरणार आहोत, अशी आम्हाला भीती होती, पण मोठ्या खडकांनी आम्हाला ढिगाऱ्याखाली चिरडण्यापासून वाचवले,” असेही जॅकलिनने पीएनजीच्या एनबीसी न्यूजला सांगितले. “आम्ही जवळपास आठ तास अडकून पडलो होतो, नंतर आमची सुटका करण्यात आली. एका साक्षीदाराने RNZ पॅसिफिकला सांगितले की, यांडम्सच्या घराभोवती मोठे खडक पडले, ज्यामुळे त्यांना पुढील ढिगाऱ्यापासून संरक्षण मिळाले. जर हे जोडपे वेळेत सापडले नसते तर कदाचित ते उपासमारी किंवा डिहायड्रेशनला मृत्युमुखी पडले असते, असंही एका बचावपथकातील व्यक्तीने सांगितले. खरं तर यांडम दाम्पत्याला तीन मुले आहेत, त्यावेळी त्यांचे एकही मूल कौलोकममध्ये नव्हते, त्यामुळे ते स्वतःला भाग्यवान समजतात.

हेही वाचाः सेन्सेक्स ७६,००० वर पोहोचला; एक लाखाचा टप्पा कधी गाठणार?

बीबीसीच्या वृत्तानुसार, या दुःखद घटनेपूर्वी गावात जवळपास ३,८०० लोक राहत होते. आता लोकसंख्येचा मोठा भाग नष्ट झाला आहे. एका स्थानिक नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांना मदतीसाठी तात्काळ कोणी आले नाही आणि ते मदतीसाठी बराच काळ स्वतःवरच अवलंबून होते. बचाव कार्याच्या संथ गतीबद्दल समुदायाचे नेते चिंतेत होते. ढिगाऱ्याखाली अनेक मृतदेह अडकून दिवस झाले असल्याचंही त्यांनी सांगितले.

प्रांतातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, देशाच्या संरक्षण दलाच्या अंतर्गत शोध आणि बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखालून अनेकांना काढण्याचे प्रयत्न झाले आहेत. काही आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्था देखील गावात अन्न, पाणी आणि निवारा पोहोचवण्यासाठी मदत करीत आहेत. दुर्गम स्थानामुळे त्यांना बचावकार्य आणि अन्न पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. पापुआ न्यू गिनीमधील गावकऱ्यांनी बीबीसीला सांगितले की, बॉम्बस्फोटासारख्या आवाजाने हा मोठा भूस्खलन शुक्रवारी झालाय. “२ हजारांहून अधिक लोक जिवंत गाडले गेले आणि मोठा विनाश झाला”, असे देशाच्या राष्ट्रीय आपत्ती केंद्राने एका पत्रात लिहिले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी एएफपीला सांगितले की, प्राणघातक भूस्खलनामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून, ढिगाऱ्याखालून जिवंत व्यक्ती सापडणे कठीण आहे. खरं तर हे बचाव अभियान नव्हे, तर ते पुन्हा गाव वसवण्याचे अभियान आहे, असंही युनिसेफ पापुआ न्यू गिनीचे नील्स क्रायर यांनी सांगितले. उपग्रह चित्रांमध्ये विनाश आणि ढिगाऱ्यांचे डोंगर इमारतींना आच्छादलेले आणि दुर्गम खेड्यांमध्ये प्रवेश करण्यायोग्य रस्ते अवरोधित करण्याचा मार्ग दर्शवितात.

ऑस्ट्रेलियाचे मंत्री पॅट कॉनरॉय यांनी एबीसी न्यूज ब्रेकफास्टला सांगितले की, “मला सल्ला देण्यात आला आहे की, प्रवेश केवळ हेलिकॉप्टरद्वारे मिळू शकतो, त्यामुळे शोध आणि बचावाचे प्रयत्न खूप आव्हानात्मक आहेत. तसेच सततच्या पावसामुळे अतिरिक्त चिखल होण्याची चिंता वाढली आहे, ज्यामुळे बचाव कार्य आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. कॅनबेराने तांत्रिक तज्ज्ञ आणि २.५ दशलक्ष डॉलर प्रारंभिक मदत पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.