नागपूर : राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचार, कौटुंबिक अत्याचार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. महिलांविरोधी गुन्ह्यांमध्ये उपराधानी तिसऱ्या क्रमांकावर असून नुकतेच एका प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार केल्यानंतर पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्यासाठी चेहऱ्यावर ॲसिड हल्ला करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकरासह तिघांवर गुन्हे दाखल केले.

या प्रकरणात समतानगर, भूमी ले आऊट येथील प्रतीक लक्ष्मण नगफासे, रितेश देशमुख व शुभम सावरकर हे आरोपी आहेत. तक्रार करणारी तरुणी एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता पदावर कार्यरत आहे. तिचे प्रतीकसोबत प्रेमसंबंध होते व ते काही महिने ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्येदेखील होते. प्रतीकने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तिने त्याच्याशी लग्न करण्याची मागणी घातली होती. मात्र त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यामुळे तिने त्याच्याविरोधात जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

हेही वाचा >>> अशी ही बनवाबनवी! विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणाऱ्या महिलेला दिल्लीतून अटक

पोलिसांनी एप्रिल महिन्यात त्याच्याविरोधात कलम ३७६ (२) व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. २१ जुलै रोजी ती सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास किराणा दुकानाकडे जात होती. कबीरनगर ते उप्पलवाडी पोस्ट ऑफिस या मार्गावर प्रतीक, रितेश व शुभम यांनी तिचा पाठलाग केला. तिघांनीही तिला शिवीगाळ केली. ‘तू माझ्यासोबत चांगले केलेले नाही. मी चांगल्या कामासाठी बाहेर जात आहे. त्यामुळे तू वाचली. परत आल्यावर तुझ्या तोंडावर ॲसिड फेकून तुझे आयुष्यच खराब करतो’ या शब्दांत तिला प्रतीकने धमकी दिली. या प्रकारामुळे संबंधित तरुणी घाबरली व दुचाकी वळवून थेट घराकडे गेली. तिने घरच्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ते सर्व तक्रार देण्यासाठी कपिलनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८, ३५१(३) व ३(५)अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> Buddhana Crime : भयंकरच… मुलाने मित्राच्या मदतीने केली वडिलांची हत्या, पुरलेल्या मृतदेहाच्या शर्टावरून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिडित तरुणी दहशतीत

प्रतीक याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्यासाठी बाध्य केले. यादरम्यान त्याने तिला पत्नीप्रमाणे ठेवले. मात्र, त्याच्या आयुष्यात आणखी एका तरुणीने प्रवेश केला. त्या दोघांचे नव्याने प्रेमप्रकरण सुरु झाले. त्यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच तिने प्रतीककडे लग्नाचा तगादा लावला. त्याने लग्न करण्यास नकार देऊन अन्य तरुणीशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिली होती. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रतीक खूप चिडला होता. त्यामुळे त्याने प्रेयसीचा चेहरा ॲसिड फेकून विद्रुप करण्याचा कट रचला.