शेअर बाजाराने सोमवारी जोरदार सुरुवात केली, पण शेवटी किंचित घसरणीसह बंद झाला. बाजार लाल रंगात बंद झाला असला तरी व्यवहारादरम्यान बीएसई सेन्सेक्सने बरीच मोठी झेप घेतली आणि ७६ हजारांवर पोहोचला. सेन्सेक्सने प्रथमच हा आकडा गाठला आहे. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स दुपारच्या व्यवहारादरम्यान ५९९.२९ अंकांनी वाढून ७६,००९.६८ च्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला, तर NSE निफ्टीने १५३.७ अंकांची वाढ दर्शवून २३,११०.८० चा नवीन टप्पा गाठला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अगदी एक आठवडा अगोदरच हा विक्रम रचला आहे. इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्सही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विप्रो, एनटीपीसी, मारुती आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे शेअर्स काहीसे पिछाडीवर होते. शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) ९४४.८३ कोटी किमतीच्या इक्विटी काढून घेतल्या. BSE बेंचमार्क ७.६५ अंक म्हणजेच ०.०१ टक्क्यांनी घसरून ७५,४१०.३९ वर स्थिरावला. निफ्टीने शुक्रवारी पहिल्यांदा २३,००० चा टप्पा ओलांडला. काही तज्ज्ञांच्या मते, ही फक्त सुरुवात आहे. सेन्सेक्स लवकरच १ लाखाचा टप्पा पार करेल. पण शेअर बाजार नवनवीन उच्चांक का गाठत आहे? हे जाणून घेऊ यात.

शेअर बाजार नवा उच्चांक का गाठत आहे?

गुंतवणूकदार सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाबद्दल प्रचंड आशावादी असून, निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे, असंही तज्ज्ञ सांगतात. दुसरीकडे तेलाच्या किमतीत झालेल्या सामान्य घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासाला चालना मिळाली आहे, असंही मेहता इक्विटीजचे वरिष्ठ व्हीपी (संशोधन) प्रशांत तपासे यांनी मनी कंट्रोलला सांगितले.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २३२० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केलेत. सोल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग या आशियाई बाजारांनी सकारात्मक क्षेत्रात व्यापार केल्याने भारतीय शेअर बाजाराला मदत मिळाली आहे. वॉल स्ट्रीटचा शेअर्सदेखील शुक्रवारी वाढीसह बंद झाला. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.१३ टक्क्यांनी वाढून ८२.२३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. तज्ज्ञांना अल्पकालीन चढ-उतार दिसत आहेत.

हेही वाचाः ‘तृणमूल’विरोधातील जाहिरातींवरून सर्वोच्च न्यायालयाने भाजपावर का ओढले ताशेरे?

“निवडणुकीचे निकाल सध्याच्या बाजाराच्या अपेक्षेशी जुळले, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात निफ्टी ५० नवीन उच्चांक गाठेल, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवणूक करत राहण्याची आणि बाजारातील घसरणीचा फायदा घेण्यासाठी चांगली तरलता राखण्याची शिफारस करतो,” असेही ॲक्सिस सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख नीरज चदावार यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले. बिझनेस स्टँडर्डने भारताची आर्थिक वाढ, वाढते औद्योगिक उत्पादन, पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्च यासह अनेक घटक या शेअर बाजार वाढण्यासाठी जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.

डाऊ जोन्स आणि NASDAQ सर्वकालीन उच्चांक गाठत आहेत, यूएस फेड आणि इतर प्रमुख केंद्रीय बँकांकडून व्याजदरात कपात केली आहे आणि भारताच्या मजबूत GDP आकड्यांचाही सकारात्मक वाढ होण्यास हातभार लागला आहे, असंही रेलिगेअर ब्रोकिंगचे डॉ. रवी सिंग यांनी लाइव्हमिंट सांगितले. “सरकारच्या भांडवली खर्चाच्या पुढाकाराने आणि मजबूत उत्पादन हालचालींनी शेअर बाजाराला वाढण्यास हातभार लावला आहे.तसेच सार्वत्रिक निवडणुकीनंतर धोरणातील सातत्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सतत लक्ष केंद्रित केल्याने भारताचा आर्थिक विकास टिकून राहणे अपेक्षित आहे,” असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.

हेही वाचाः ‘या’ देशात घटस्फोट का घेता येत नाही? घटस्फोटाचा कायदा संमत होणार?

तज्ज्ञ काय म्हणतात?

२०२५ ते २०२९ दरम्यान सेन्सेक्स एक लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले. सेन्सेक्स पाच वर्षांत १ लाखापर्यंत पोहोचू शकतो, असेही बिझनेस स्टँडर्डने गुंतवणूक तज्ज्ञ मार्क मोबियस यांच्या हवाल्याने म्हटले आहे. “मला वाटतं पुढील पाच वर्षांत सेन्सेक्स सहज १ लाखापर्यंत जाईल. पण मार्गात काही सुधारणा होतील,” असेही मोबियसने मॉर्निंग स्टार इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स २०२३ मध्ये सांगितले. “शेअर बाजारासह इतर क्षेत्रांमध्ये थेट गुंतवणुकीत भरपूर दीर्घकालीन पैसा मिळणार आहे. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी भरपूर संधी आहेत. त्या संधीचा फायदा ते घेतील.” “भारताची आर्थिक वाढ प्रभावी आहे, ती जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे, विकासाच्या अंदाजानुसार लवकरच ती चीनलाही मागे टाकेल. या सर्व बाबींचा विचार केल्यास पुढील ५ वर्षांत सेन्सेक्स १ लाखाचा टप्पा ओलांडताना पाहायला मिळेल,” असंही सिंग यांनी लाइव्हमिंटला सांगितले.

शेअर बाजार ख्रिसमस २०२५ पर्यंत १ लाखाचा टप्पा गाठेल, असंही अल्केमी कॅपिटलचे संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी हिरेन वेद यांनी मनी कंट्रोलला सांगितले. “दिवाळी आणि ख्रिसमस २०२५ दरम्यान सेन्सेक्स १ लाखावर जाणे शक्य आहे. पुढील आर्थिक वर्षात, आयटी आणि बँका नेतृत्व करतील,” असंही वेद म्हणालेत. बिझनेस स्टँडर्डने मॉर्गन स्टॅन्लेचा उल्लेख करत बाजारात जास्त खरेदी राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. तसेच २०२४ च्या अखेरीस सेन्सेक्स ८६ हजारांपर्यंत पोहोचेल, असंही म्हटलंय. भारताचा कॉर्पोरेट क्षेत्राचा नफा गेल्या तीन दशकांमध्ये जवळपास १७ टक्क्यांनी वाढला आहे. पुढे १५ टक्के कॉर्पोरेट नफ्यात वाढ होण्याची अपेक्षा करणे वाजवी आहे. जर सध्याची P/E पातळी २५ x राखली गेली, तर हेदेखील सेन्सेक्सच्या १५ टक्क्यांच्या चक्रवाढीत म्हणजेच दर पाच वर्षांनी दुप्पट होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास २०२९ च्या आसपास सेन्सेक्सची पातळी १५०००० असेल,” असंही मोतीलाल ओस्वालच्या रामदेव अग्रवाल यांनी म्हटले आहे. बिझनेस स्टँडर्डने मॉर्गन स्टॅन्लेचा हवाला देऊन इशारा दिला आहे. जर भारतात त्रिशंकू सरकार अस्तित्वात आले तर २०२४ च्या अखेरीस सेन्सेक्स ५१००० पर्यंत खाली येऊ शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex hits 76000 when will it reach the milestone of one lakh vrd