इस्रायल आणि हमासदरम्यान गाझा पट्टीत सुरू असलेल्या युद्धाला जवळपास सात महिने झाले आहेत. दोन्ही बाजूंनी ३५ हजारांपेक्षा जास्त सामान्य लोकांचा बळी घेतल्यानंतर आणि ७८ हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाल्यानंतरही युद्ध थांबलेले नाही. ते थांबावे, किमान दीर्घकाळ युद्धविराम व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला अद्याप यश का येत नाही असा प्रश्न आहे.

युद्धविराम चर्चेची सद्यःस्थिती काय आहे?

युद्धविरामाच्या प्रस्तावावर शनिवारी इजिप्तमध्ये चर्चा झाली. त्या चर्चेत हमासचे शिष्टमंडळ सहभागी झाले, मात्र प्रस्तावाला सहमती न देताच ते परत गेले. प्रस्तावावर एकमत न होण्याबद्दल इस्रायल आणि हमास या दोन्ही बाजू एकमेकांवर दोषारोप करत आहेत. इस्रायली ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्ध थांबावे या मागणीचा हमासने रविवारी पुनरुच्चार केला. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना ही मागणी मंजूर नाही. राफामधील हमासचा शेवटचा तळ उद्ध्वस्त करेपर्यंत युद्ध थांबवणार नाही या भूमिकेवर इस्रायल ठाम आहे. इस्रायलने ४० दिवस युद्धविरामाची तयारी दर्शवली आहे. त्या दरम्यान हमासने ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यादरम्यान ताब्यात घेतलेल्या ओलिसांची सुटका करावी आणि त्या बदल्यात इस्रायलच्या तुरुंगातील मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाईल यावर इस्रायलची सहमती आहे. 

हेही वाचा >>> विश्लेषण : पीक कर्जवाटपात शेतकरी समाधानी आहेत?

प्रस्तावात कोणत्या तरतुदी?

युद्वविरामाचा प्रस्ताव गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार, युद्धविराम तीन टप्प्यांमध्ये केला जाईल. पहिला टप्पा ४० दिवसांचा असेल. त्यामध्ये काही ओलीस आणि काही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाईल. त्यानंतर गाझाच्या किनारपट्ट्याच्या भागातून इस्रायलचे सैन्य माघार घेईल. त्याद्वारे गाझाला मानवतावादी मदतीला प्रवेश दिला जाईल. तसेच विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांना आपापल्या घरी परतणे शक्य होईल. त्यानंतर सहा आठवड्यांच्या दुसऱ्या टप्प्यात कायमस्वरूपी शांतता नांदण्याच्या दृष्टीने समझोता केला जाईल. तिसऱ्या टप्प्यात उर्वरित ओलिसांची आणि अधिक कैद्यांची सुटका केली जाईल. गाझामध्ये पुनर्रचनेचा पाच वर्षांची योजना अंमलात आणली जाईल. तसेच हमासला पुन्हा लष्करी शस्त्रागार तयार करणार नाही असे आश्वासन द्यावे लागेल. 

दुसऱ्या युद्धविरामाची चर्चा कधीपासून?

पहिला युद्धविराम सुरू असतानाच त्याची मुदत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याला यश आले नाही. पुन्हा युद्ध सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या बाजूला इजिप्त आणि कतारने युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले. अमेरिकेनेही युद्ध थांबवण्यासाठी वारंवार आवाहन केले. त्याचवेळी इस्रायलला युद्धासाठी आवश्यक लष्करी साधनसामग्रीचा पुरवठाही सुरू ठेवला. फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा युद्वविरामासाठी ठोस चर्चेचे प्रस्ताव मांडले गेले. मात्र, आतापर्यंत तरी त्याला यश आलेले नाही.

हेही वाचा >>> “गाईंना मिठी मारु नका”; अमेरिकेत का देण्यात आले आहेत असे आदेश?

बायडेन प्रशासनावर कोणता दबाव?

अमेरिकेतील प्रतिष्ठित न्यूयॉर्क विद्यापीठासह विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांनी युद्धाच्या विरोधात आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, यामुळे बायडेन प्रशासनावर दबाव वाढला आहे. या निदर्शनांमुळे पश्चिम आशियाविषयी आपल्या धोरणांवर परिणाम होणार नाही असे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले आहे. मात्र, निवडणूक वर्षामध्ये कोणत्याही समाजघटकाची नाराजी ओढवून घेणे बायडेन यांना परवडणारे नाही, त्यामुळे त्यांनी गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला आहे.

पहिला युद्धविराम कधी?

इस्रायल आणि हमासदरम्यान पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव युद्धविराम मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात, युद्ध सुरू झाल्यानंतर ४८ दिवसांनी करण्यात आला होता. इजिप्त, कतार आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने करण्यात आलेला तो युद्धविराम केवळ एक आठवडा चालला. त्यादरम्यान हमासच्या ताब्यातील काही ओलिसांची सुटका करण्यात आली आणि त्याबदल्यात इस्रायलने काही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. त्यातील बहुसंख्य कैदी हे दगडफेकीसारख्या गुन्ह्यांसाठी इस्रायलने ताब्यात घेतलेली किशोरवयीन मुले आणि तरुण होते. त्या काळात गाझा पट्टीमध्ये युद्धग्रस्तांपर्यंत काही प्रमाणात मदत सामग्री आणि मर्यादित प्रमाणात इंधनाचा पुरवठा करण्यात आला होता.

सद्यःस्थिती काय आहे?

७ मे रोजी युद्धाला सात महिने पूर्ण होत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत ३४ हजार ६०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि जवळपास ७८ हजार जखमी झाले आहेत. गाझाच्या २३ लाख लोकसंख्येपैकी जवळपास १४ लाख लोक विस्थापित होऊन एकट्या राफा या दक्षिणेकडील शहरामध्ये एकवटले आहेत. हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात जवळपास १२०० जणांचा बळी गेला. त्याशिवाय २५३ जणांना ओलिस धरण्यात आले. त्यापैकी सुमारे १३० जणांची अजूनही काही खबरबात नाही.

nima.patil@expressindia.com