अमेरिकेमध्ये सध्या गाईंना मिठी न मारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शरीर निरोगी आणि उत्तम राहण्यासाठी, तसेच मनालाही प्रसन्नता मिळण्यासाठी गाईला मिठी मारणे फायद्याचे ठरते, असे सांगणाऱ्या एका ‘वेलनेस ट्रेंड’मुळे अमेरिकेतील अनेक जण गाईला मिठी मारायचे. विशेष म्हणजे अशा गो-मिठीचे फायदे मिळविण्यासाठी अनेक जण शेतकऱ्यांकडे जात असल्यामुळे अमेरिकेतील कृषी पर्यटनालाही चालना मिळू लागली होती. मात्र, अमेरिकेतील टेक्सासमध्ये गाईंना मिठी मारल्यामुळे एका व्यक्तीच्या शरीरामध्ये बर्ड फ्लूचा विषाणू संक्रमित झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. गाईंना मिठी मारण्याचा असा ‘वेलनेस ट्रेंड’ धोक्याचा ठरू शकतो, अशी सूचना देण्यात आली आहे.

काय आहे हा गो-मिठीचा ‘वेलनेस ट्रेंड’?

गाईला मिठी मारल्याने आपल्याला अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे होऊ शकतात, अशी माहिती एका संशोधनाच्या माध्यमातून समोर आली होती. त्यानंतर गाईला मिठी मारण्याचा हा ‘वेलनेस ट्रेंड’ जगभरात पसरू लागला. या ट्रेंडनुसार गाईला मिठी मारल्याने अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते, तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासही मदत होते, असेही बोलले जात होते. गाईला मिठी मारल्यामुळे तणाव कमी होतो, प्रसन्नतेची वाढीस लागते, तसेच निसर्ग आणि प्राण्यांबरोबर जोडून घेतल्याचा सुखद भाव मनात निर्माण होतो. या सर्वांचा आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदा होत असल्याचा दावा या ट्रेंडमधून करण्यात येत होता. गाईंच्या जवळ गेल्यावर, तसेच त्यांना स्पर्श केल्यावर त्यांच्या शरीरातील उबदारपणा आपल्यालाही फायद्याचा ठरतो. गाईच्या अंगावरून हात फिरविल्याने मनाला एक वेगळाच आनंद आणि मन:शांती मिळते, असेही म्हटले जात होते. गाईंच्या शरीरात ऑक्सिटोसी नावाचे संप्रेरक असते. या संप्रेरकाचा फायदा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी होतो, असे हा ट्रेंड सांगतो.

हेही वाचा : दलाई लामांचा तो वादग्रस्त व्हिडिओ आणि चीनची ‘स्मीअर’ मोहीम; चीनला तिबेटच्या आध्यात्मिक नेत्याविषयी इतका द्वेष का?

अमेरिकेत गाईंना मिठी न मारण्याचे का केले आवाहन?

अमेरिकेतील नऊ राज्यांमधील दुभत्या जनावरांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू सापडले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. गाईंना मिठी न मारण्याचे आवाहन केल्यामुळे आता देशातील कृषी पर्यटनाचे भवितव्य टांगणीला लागले आहे. भारतातही गेल्या वर्षी १४ फ्रेब्रुवारीला केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाने व्हॅलेंटाईन डे हा ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, देशभरातून या निर्णयाला विरोध झाल्याने केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला होता.

“गो-मिठीसाठी हा योग्य काळ नाही”

अलीकडे जगभरात H5N1 विषाणूचा प्रसार गतीने वाढला आहे. या विषाणूमुळे पाळीव प्राण्यांसहित माणसाच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेतील नऊ राज्यांमधील दुभत्या जनावरांमध्येही बर्ड फ्लूचा विषाणू सापडला असल्याची माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) दिली आहे. त्याबरोबरच USDA ने राज्यातील कृषी विभागांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. “सर्व दुभत्या जनावरांवर लक्ष ठेवून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण सतर्क राहिले पाहिजे,” असे अमेरिकेतील कृषी विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

मिशिगन कृषी आणि ग्रामीण विकास विभागाचे संचालक टीम बोरिंग यांनी, राज्यातील एका दुभत्या जनावरांच्या कळपाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर काळजी घेण्याचे आवाहन केले. प्राण्यांच्या आणि माणसांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी सतर्कता बाळगण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. रॉयटर्सशी बोलताना ते म्हणाले, “सध्या प्राण्यांबरोबर माणसांचे आरोग्यही धोक्यात आहे. अशा वेळी गाईंना मिठी मारणे धोकादायक ठरू शकते. गाय आणि माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, हा काळ गो-मिठीसाठी योग्य नाही.”

बोरिंग यांनी कुक्कुटपालन, तसेच दुग्धव्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छतेची अधिक काळजी घेण्यासंदर्भात सर्व राज्यांच्या कृषी विभागांना अधिकृत सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये गो-मिठीसंदर्भात अधिकृतपणे काही भाष्य केलेले नाही; मात्र, त्यांनी माध्यमांशी बोलताना हा काळ गो-मिठीसाठी योग्य नसल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेतील २६,००० हून अधिक परवानाधारक डेअरी फार्ममधील जवळपास २० टक्के दुधाच्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला आहे. ही साथ आणखी पसरण्याची शक्यता असल्याने संशोधकांनीही या निर्णयाला समर्थन दिले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाईंमधून मानवी शरीरात विषाणूचे संक्रमण होण्याचा धोका तसा कमी आहे. मात्र, गो-मिठीसंदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचनांमुळे कृषी पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसतो आहे. अमेरिकेतील अनेक छोट्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या कृषी पर्यटनाचा आर्थिक फायदा होत होता. त्यामध्ये आता घट होताना दिसून येते आहे.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून दिल्लीचा कारभार कसा चालवतात?

अमेरिकेतील छोट्या शेतकऱ्यांवर परिणाम

काऊ कडलिंग, गोट योगा वा साऊंड बाथसारख्या ट्रेंड्समुळे अमेरिकेतील कृषी पर्यटनाला चालना मिळाली होती. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना भरपूर आर्थिक लाभ होत होता. USDA च्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये २८,६०० हून अधिक शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनातून १.२६ अब्ज डॉलर्स (१०५ कोटी रुपयांहून अधिक) कमावले होते. पाच वर्षांपूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत कृषी पर्यटनातील या कमाईमध्ये ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे लहान शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन हा आर्थिक वरदान ठरला आहे. शेतकरी गो-मिठीच्या एका तासाच्या सत्रासाठी पर्यटकांकडून ७५ डॉलर्स (६,२६० रुपये) घेतात. एखाद्या लहान कळपाचे आठवडाभराचे खाद्य यातून सहज विकत घेता येऊ शकते. अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक तोटा टाळण्यासाठी अद्यापही अशा कृषी पर्यटनासाठी आपले दरवाजे खुले ठेवले आहेत. त्यांनी खबरदारीच्या अनेक उपाययोजनाही वाढविल्या आहेत.