कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे?
सरताना आणि सांग सलतील ना!
गुलाबाची फुलं दोन रोज राती
डोळ्यांवर मुसूमुसू पाणी सांग भरतील ना!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…संदीप खरेंच्या गीतातील हे कडवं बरंच काही सांगून जातं. कवितेचा अर्थ विरहप्रधान असला तरी, यातील प्रियकराने प्रेयसीच्या अश्रूंचा केलेला उल्लेख नव्या वैज्ञानिक संशोधनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणारा आहे. स्त्रियांचे भावनिक अश्रू पुरुषांमधील आक्रमकता कमी करतात असे निरीक्षण या संशोधनात नोंदविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नक्की हे संशोधन काय सांगू पाहाते हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

पुरुषांच्या आक्रमकतेला वेसण?

मानवी अश्रूत असलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण घटकामुळे पुरुषांमधील आक्रमकता कमी होण्यास मदत होते, असे हे नवे वैज्ञानिक संशोधन सांगते. असं का होत असावं याच स्पष्टीकरण देताना अभ्यासक नोंदवितात, ‘रडणाऱ्या बाळांना विविध प्रकारच्या वाईट गोष्टींपासून वाचवण्यासाठी अशा स्वरूपाचे अश्रू मानवामध्ये कालांतराने विकसित झाले असावेत…’, याशिवाय महिलांच्या भावनिक अश्रूंमुळे पुरुषांची आक्रमकता ४० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी झाली आणि मेंदूमध्ये तत्सम बदल घडून आले, असे या संगणकीकृत वैज्ञानिक चाचणीच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. इतकेच नव्हे तर या संशोधनात गुंतलेल्या संशोधकांनी, ‘सर्व मानवी अश्रूंचा समान परिमाण असण्याची’ही शक्यताही वर्तवली आहे.

अधिक वाचा: आता लसूणही महागला, दर किती काळ चढे राहणार,  वाचा…

अश्रू का वाहतात?

“स्त्रियांच्या अश्रूंमुळे पुरुषांच्या आक्रमकतेत झालेली घट अधिक प्रभावी होती, ती वास्तविक दिसते,” असे इस्त्रायलमधील वेझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील न्यूरोबायोलॉजीचे प्राध्यापक नोम सोबेल सांगतात. ” अश्रूंमध्ये असलेले काही वैशिष्ट्यपूर्ण घटक खरोखरच ही आक्रमकता कमी करतात. माणसाच्या रडण्याच्या प्रक्रियेवर संशोधन करताना विख्यात उत्क्रांतीतज्ज्ञ चार्ल्स डार्विनदेखील गोंधळून गेला होता. १८७२ साली ‘द एक्स्प्रेशन ऑफ इमोशन्स इन मॅन अॅण्ड अॅनिमल्स’मध्ये, स्वतः चार्ल्स डार्विन याने म्हटले आहे की, ‘बाहेरील घटकांच्या आघातामुळे मानवी डोळ्यांत अश्रू निर्माण होतात, जे उद्देशहीन असतात. परंतु, त्यानंतरच्या गेल्या १५० वर्षांत, संशोधकांनी असुरक्षितता आणि असहायता दर्शविण्यापासून ते डोळ्यांमधील जंतूंपासून सजीवांचे रक्षण करणाऱ्या पर्यंत अनेकविध कारणांसाठी अश्रू वाहू लागतात, असे संशोधकांनी त्यांच्या प्रयोगांमधून दाखवून दिले आहे.”

महिलांचाच प्रतिसाद सर्वाधिक

प्रा. सोबेल यांच्या प्रयोगशाळेत झालेल्या संशोधनात असे आढळून आले की, स्त्रियांचे अश्रू पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करतात. हे वर्तन किती प्रभावी ठरते, त्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न या संशोधनामध्ये करण्यात आला. प्राण्यांमध्ये ते अधिक सुस्पष्ट दिसते. उदाहरणार्थ, आक्रमकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घुशी (subordinate mole rats) स्वतःला अश्रूंनी झाकून घेतात. नवीन संशोधनात अभ्यासासाठी, डॉ. शनी अॅग्रॉन आणि इतर अभ्यासकांनी सोबेल यांच्या प्रयोगशाळेत दु:खद भावना असलेला चित्रपट पाहताना महिलांच्या चेहऱ्यावरून ओघळणारे अश्रू गोळा केले. या संशोधनासाठी केवळ महिलाच अपेक्षित आहेत याची जाहिरात केलेली नव्हती. परंतु जे अश्रूदाते पुढे आले, त्यात सर्व महिलाच होत्या, त्यापैकी सहा जणींची निवड करण्यात आली. कारण त्यांनी आवश्यक योग्यतेचे अश्रू प्रयोगासाठी उपलब्ध करून दिले.

पुरुषांवर प्रयोग

याशिवाय या प्रयोगात ३१ पुरुषांचाही समावेश करण्यात आला. पुरुषांच्या स्वभावाची चाचणी करण्यासाठी त्यांना एक आक्रमक खेळ संगणकावर खेळण्यास सांगितले, तत्पूर्वी त्यांना महिलांचे अश्रू हुंगायला दिले. त्यानंतर खेळादरम्यान मुद्दाम त्यांचे काही पॉईंटस्/ खेळासाठी आवश्यक गुण कमी करण्यात आले, जेणे करून त्यांचा त्रागा व्हावा, परंतु ‘प्लॉस बायोलॉजी’मध्ये संशोधकांनी नमूद केल्याप्रमाणे, पुरुषांनी महिलांच्या अश्रूंचा गंध घेतल्यानंतर त्यांचे आक्रमक वर्तन ४३.७% नी कमी झाल्याचे प्रयोगात लक्षात आले.

या पुरुषांच्या मेंदूचे स्कॅनरच्या माध्यमातून परीक्षण करण्यात आले. या परीक्षणातून एक मुख्य मुद्दा समोर आला, तो म्हणजे हुंगलेल्या अश्रूंमध्ये ‘सुगंध आणि आक्रमकता हाताळणाऱ्या मेंदूतील प्रदेशांशी संबंध प्रस्थापित करण्याची उत्तम गुणवत्ता असते, त्याचेच फलित म्हणून मेंदूत आक्रमकतेसाठी आवश्यक घडामोडी मंदावतात, असे सोबेल नमूद करतात. गंध- संवेदनशील न्यूरॉन्सवरील चार प्रकारचे रिसेप्टर्स मानवी अश्रूंद्वारे सक्रिय केले जातात, असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये, ड्यूक विद्यापीठाच्या संशोधक चमूला लक्षात आले. हे रिसेप्टर्स आक्रमकता आणि ओलसर पदार्थास प्रतिसाद देऊ शकतात.

अधिक वाचा: जगातील आठवे आश्चर्य अशी मान्यता लाभलेले अंगकोर वाट आहे तरी काय? या मंदिराचा हिंदू संस्कृतीशी काय संबंध?

सामाजिक परिणाम

अश्रूंमधील घटकांचा प्रौढांच्या सामाजिक संवादावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही, असे सोबेल कबूल करतात, परंतु अश्रूंची रचना असुरक्षित बालकांचे संरक्षण करण्यासाठी विकसित झालेली असावी, असे वैज्ञानिक गृहितक ते मांडतात. “कारण लहान मुले ‘माझ्याबद्दल आक्रमक होणे थांबवा’ असे व्यक्त होऊ शकत नाहीत. म्हणूनच कदाचित या अश्रूंची निर्मिती झाली असावी.”, ते सांगतात. अॅड विंगरहोट्स हे टिलबर्ग विद्यापीठात ‘भावना आणि तंदुरुस्ती’ या विषयाचे प्राध्यापक आहेत, या प्रयोगाबाबत ते सांगतात, “अश्रूंमुळे काही प्रमाणात आक्रमकता रोखली जात असेल तर ते अर्थपूर्णच आहे, कारण सामान्यतः लहान मुले खूप रडतात कारण त्यांना धोका जाणवतो, यामुळे त्यांना सुरक्षित जगण्यास मदत होते. असे असले तरी लिव्हरपूल जॉन मूर्स विद्यापीठातील मनोविकारतज्ज्ञ डॉ. मिन्ना लियॉन्स यांनी नमूद केल्याप्रमाणे आक्रमकता कमी होणे हे उल्लेखनीय असले तरी एखादा ठोस निष्कर्ष काढण्यापूर्वी मानवी वर्तनाची सखोलता पडताळणे गरजेचे आहे. “वास्तविक जीवनात, गोष्टी वेगळ्या पद्धतीनेही असू शकतात. कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीत अश्रू गुन्हेगाराची आक्रमकता कमी करण्यात काही प्रमाणात काम करू शकतात. या परिस्थितीत केमोसिग्नलिंग का काम करत नाही?” याचाही विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. “रडण्याचा सामाजिक संदर्भ मोठ्या प्रमाणात गुंतागुंतीचा आहे आणि मला शंका आहे की खरोखरच आक्रमकता कमी करणे हे अश्रूंच्या अनेक संभाव्य कार्यांपैकी एक आहे का?” सोबेल यांच्या प्रयोगशाळेला अश्रूंमधील सक्रिय घटक शोधायचा आहे. असे झाल्यास आक्रमक प्रवृत्ती कमी करण्यासाठीचे संभाव्य दरवाजे उघडतील, असा वैज्ञानिकांचा कयास आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Men become less aggressive when they smell womens tears svs
First published on: 25-12-2023 at 11:24 IST