कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने मानवी मेंदूत चिप बसवून वृद्धापकाळात होणाऱ्या पक्षाघात, लकवा, अल्झायमर यांसारख्या दुर्धर आजारांवर मात करता येईल का, यावर इलॉन मस्क यांच्या ‘न्यूरालिंक कंपनी’मध्ये संशोधन सुरू आहे. न्यूरालिंक कंपनीची स्थापना २०१६ मध्ये झाली. मस्क या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. शिवाय त्यांनी टेस्ला मोटर कंपनीमार्फत स्वयंचलित वाहने तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आहे. याचबरोबर ते एक्सएआयचेही संस्थापक आहेत. मानवाच्या कल्याणासाठी आणि सुरक्षेसाठी ना नफा-ना तोटा या तत्त्वावर २०१५ मध्ये ओपन एआय या कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन कंपनीची स्थापना (सहसंस्थापक) करण्यात आली. मस्क हे जागतिक स्तरावरील कुशल उद्याोजक आहेत. ते ‘स्पेस एक्स’चे संस्थापक, ‘एक्स कॉर्पोरेशन’चे मालक व कार्यकारी अध्यक्ष, ‘बोरिंग कंपनी’चे संस्थापक, ‘मस्क फाऊंडेशन’चे अध्यक्ष असून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

इलॉन रीव मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत २८ जून १९७१ रोजी झाला. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी स्वत: व्हिडीओ गेम विकसित करून विकला. दक्षिण आफ्रिकेत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १७व्या वर्षी ते उच्च शिक्षणासाठी कॅनडाला स्थलांतरित झाले आणि नंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र व अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रवेश घेतला, पण त्यांनी ती पूर्ण केली नाही.

जानेवारी २०२४ मध्ये ‘न्यूरालिंक कंपनी’मध्ये यंत्रमानवाच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता चिपचे मानवी मेंदूत यशस्वी प्रत्यारोपण केले गेले. यावरील पुढील संशोधनाने अकार्यक्षम झालेल्या अवयवांमध्ये संदेशवहनाचे कार्य पुनर्संचित करून दुर्धर व्याधींवर मात करण्याचे इलॉन मस्क यांचे उद्दिष्ट आहे. ही चिप मानवी मेंदूला संगणकाशी जोडते, त्यामुळे केवळ मेंदूतील विचारांनी फोन आणि संगणकासारखी अंकीय उपकरणे मानवाला नियंत्रित करता येतात.

इलॉन मस्क यांना विविध पुरस्कार आणि मानसन्मान प्राप्त झाले आहेत. त्यात टाइम मॅगझिनचा ‘पर्सन ऑफ द इयर २०२१’, फोर्ब्सचा ‘जगातील सर्वांत नावीन्यपूर्ण नेता २०१९’, एक्सेल स्पेस सोसायटीचा ‘रॉबर्ट ए. हेनलिन पुरस्कार २०११’, ‘एव्हिएशन वीक’ आणि ‘स्पेस टेक्नॉलॉजी लॅरीएट २०१०’, युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाकडून मानद डॉक्टरेट २०१९, रॉयल सोसायटीचे फेलो २०१८, इत्यादींचा समावेश आहे.

इलॉन मस्क आपल्या उद्याोगधंद्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत, तरीही त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक दुष्परिणामही दाखवून दिले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेत फार पुढे जाऊ नये असे त्यांचे आग्रही मत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुभदा वक्टे, मराठी विज्ञान परिषद