Microplastics in Human Testicles तुम्हाला प्लास्टिकच्या बाटलीतील किंवा प्लास्टिकच्या इतर कुठल्याही वस्तूतील मायक्रोप्लास्टिक्सची कल्पना तर असेलच. मात्र, फार कमी लोकांना हे माहीत आहे की हवेतही प्लास्टिकचे कण तरंगत असतात; जे आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या शरीरात जातात. गेल्या वर्षी युनायटेड नेशन्सच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले होते की, जगात दिवसागणिक प्लास्टिक प्रदूषण वाढत आहे. दरवर्षी ४३० दशलक्ष टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचे उत्पादन होत आहे. मायक्रोप्लास्टिक्स इकोसिस्टममधून तरंगतात आणि अन्न व पाण्याद्वारे मानवी शरीरात, तसेच प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतात, असे या अहवालात सांगण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता पुरुषांच्या अंडकोषामध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळून आल्यानंतर शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो, त्यामुळे शास्त्रज्ञांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. ‘टॉक्सिकोलॉजिकल सायन्सेस’ या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात नक्की काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

हेही वाचा : दूषित रक्तामुळे हजारो लोकांना एचआयव्ही; ब्रिटनमधला आरोग्य घोटाळा उघड

अभ्यासात नक्की काय?

न्यू मेक्सिको युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या एका गटाने हा अभ्यास केला. या गटाने अल्बुकर्क शहरातील खासगी पशुवैद्यकीय दवाखाने आणि प्राण्यांच्या आश्रयस्थानांमधील ४६ श्वानांच्या ऊतींचे (टिशू) नमुने तसेच वैद्यकीय तपासणीसाठी न्यू मेक्सिको कार्यालयाने प्रदान केलेले २३ मानवी ऊतींच्या नमुन्यांची तपासणी केली. सर्व विश्लेषित नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचा समावेश होता. या तपासणीत श्वानांमध्ये प्रति ग्रॅम १२२.६३ मायक्रोग्रॅम आणि पुरुषांमध्ये प्रति ग्रॅम ३२९.४४ मायक्रोग्रॅम मायक्रोप्लास्टिक आढळून आले.

या अभ्यासाचे नेतृत्व करणारे न्यू मेक्सिको विद्यापीठातील पर्यावरणीय आरोग्य शास्त्रज्ञ झिओझोंग यू यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले, “सुरुवातीला मला शंका होती की मायक्रोप्लास्टिक्स प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम करू शकतात. जेव्हा मला पहिल्यांदा श्वानांच्या ऊतींवर केलेल्या संशोधनाचे निकाल मिळाले, तेव्हा मला आश्चर्य वाटले, मात्र जेव्हा मानवी ऊतींवर केलेल्या संशोधनाचे निकाल मिळाले, तेव्हा धक्का बसला.”

प्रजनन क्षमतेवर परिणाम

श्वानांमधील शुक्राणूंची घटलेली संख्या आणि अंडकोषात आढळलेले पॉलीव्हिनाइल क्लोराईड (पॉलीथिलीन आणि पॉलीप्रोपीलीननंतर हे जगातील सर्वात जास्त प्रमाणात उत्पादित केले जाणारे कृत्रिम प्लास्टिक आहे) यांच्या नमुन्यांच्या आधारावर करण्यात आलेल्या अभ्यासात परस्परसंबंध दिसून आला. झिओझोंग यू यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले की, “प्लास्टिकमुळे फरक पडतो. पॉलीव्हिनाइल क्लोराईड शरीरात असे रसायने सोडू शकते, जे शुक्राणू उत्पादनात व्यत्यय आणतात.”

पॉलीव्हिनाइल क्लोराईड शरीरात असे रसायने सोडू शकते, जे शुक्राणू उत्पादनात व्यत्यय आणतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

झिओझोंग यू यांनी लिहिले, “हे निष्कर्ष श्वानांच्या आणि पुरुषांच्या अंडकोषामध्ये मायक्रोप्लास्टिक्सची व्यापक उपस्थिती दर्शवतात, ज्यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर संभाव्य दुष्परिणाम होतात.” हे प्लास्टिक पुरुषांच्या शुक्राणू उत्पादनावर कसा परिणाम करू शकते याची पुष्टी करण्यासाठी, अतिरिक्त संशोधन आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “आम्हाला लोकांना घाबरवायचे नाही, आम्ही वैज्ञानिकदृष्ट्या माहिती प्रदान करून लोकांना मायक्रोप्लास्टिक्सविषयी जागरूक करत आहोत. यामुळे मायक्रोप्लास्टिक्सचे दुष्परिणाम टाळण्यासाठी लोक आपल्या जीवनशैलीत बदल करू शकतात.”

पुरुष वंध्यत्वास कारणीभूत

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार, मायक्रोप्लास्टिक हे पुरुष वंध्यत्वाचे महत्त्वपूर्ण संभाव्य कारण म्हणून ओळखले गेले आहे. याव्यतिरिक्त, एका वेगळ्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासात असे नमूद केले आहे की, मायक्रोप्लास्टिक्सने उंदरांच्या प्रजननक्षमतेवर दुष्परिणाम केला आहे.

मायक्रोप्लास्टिक्सचे धोके

मायक्रोप्लास्टिक म्हणजे पाच मिलिमीटर (०.२ इंच) पेक्षा कमी लांबीचे कोणतेही प्लास्टिक. ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेशापासून ते पर्वत शिखरांपर्यंत मायक्रोप्लास्टिक्स इकोसिस्टममधून तरंगतात आणि पिण्याचे पाणी व अन्नाद्वारे शरीरात जातात. त्यांचा आकार इतका लहान असतो की ते सहजपणे पचनसंस्था आणि फुप्फुसांमध्ये जातात. हे मायक्रोप्लास्टिक्स थेट रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि तेथून मेंदू व हृदयासह इतर अवयवांमध्ये प्रवेश करतात. प्लास्टिकचे हे कण प्लेसेंटा ओलांडून गर्भातील मुलांच्या शरीरातदेखील जाऊ शकतात.

प्लास्टिकचे कण प्लेसेंटा ओलांडून गर्भातील मुलांच्या शरीरातदेखील जाऊ शकतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

या मायक्रोप्लास्टिक्समध्ये समाविष्ट असलेल्या रसायनांमुळे शरीराच्या सामान्य संप्रेरकांच्या उत्सर्जनात व्यत्यय निर्माण होतो, प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होतो आणि काही रसायनांमुळे कर्करोग होण्याची शक्यताही वाढते. यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्टमध्ये नोंदवलेल्या जून २०२३ च्या अभ्यासानुसार, सरासरी व्यक्ती प्रत्येक आठवड्यात समप्रमाणात हे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीरात घेतात. त्यामुळे मायक्रोप्लास्टिक्स प्रत्येकाच्या शरीरात सापडतील, हे नक्की.

गर्भनाळेतही प्लास्टिक

‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील संशोधनात प्रत्येक मानवी प्लेसेंटामध्ये (गर्भनाळ) बाटल्या आणि पिशव्यांमधील प्लास्टिक सापडले आहे. एका सामान्य पाण्याच्या बाटलीमध्ये एक चतुर्थांश दशलक्ष प्लास्टिक कण असल्याचे एका चिंताजनक अभ्यासातून समोर आले आहे.

शुक्राणूंच्या संख्येवर होणारा दुष्परिणाम

जगभरात शुक्राणूंची गुणवत्ता घसरत असल्याचे दिसून येत आहे. २०२२ मध्ये, जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठातील एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक हागाई लेव्हिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, १९७३ ते २०१८ दरम्यान शुक्राणूंची प्रति मिलीलीटर संख्या १०४ ते ४९ दशलक्ष प्रति वर्ष सरासरी १.२ टक्क्यांनी कमी झाली आहे.

हेही वाचा : रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा शोध नक्की कसा लागला? यूरोपियन युनियनचा कोपर्निकस ईएमएस प्रोग्राम काय आहे?

बीबीसीच्या म्हणण्यानुसार २००० पासून, घसरणीचा हा दर २.६ टक्क्यांहून अधिक झाला आहे. युनायटेड स्टेट्समधील शुक्राणूंची संख्या गेल्या ५० वर्षांत ५० टक्क्यांनी कमी झाली आहे, असे ‘न्यूजवीक’ने म्हटले आहे. संशोधकांना असे वाटते की, याला कुठे न कुठे मायक्रोप्लास्टिक्सदेखील कारणीभूत असू शकतात. विशेष म्हणजे, वंध्यत्वाच्या सर्व प्रकरणांपैकी अंदाजे अर्ध्या प्रकरणांमध्ये पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या असते. पुरुष लोकसंख्येच्या सात टक्के पुरुष या समस्येचा सामना करतात. परंतु, स्त्री वंध्यत्वापेक्षा त्याची चर्चा फारच कमी प्रमाणात केली जाते आणि वंध्यत्वाबाबत स्त्रियांनाच जबाबदार धरले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microplastics in human testicles affect fertility rac