-राखी चव्हाण

दीर्घ प्रतीक्षेतील चित्ता प्रकल्पाचा मुहूर्त अखेर ठरला असून नामिबियातून ते भारतात पोहोचण्यास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. भारतात येण्यापूर्वी पाच मादी आणि तीन नर चित्त्यांचे लसीकरण करण्यात आले असून रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे. त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्यादेखील पार पडल्या आहेत. त्यांच्यासाठी विशेष विमान सज्ज झाले असून शुक्रवारी ते भारताच्या दिशेने प्रयाण करेल आणि १६ तासाच्या प्रवासानंतर ते शनिवारी भारतात दाखल होईल. भारतात मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात त्यांच्या आगमनाची जेवढी उत्सुकता आहे, तेवढेच काही प्रश्न देखील आहेत.

Senior minister Chhagan Bhujbal is again in discussion in the background of Lok Sabha elections delhi
दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह…
DD changes logo colours from red to orange
निवडणुकीच्या धामधुमीत दूरदर्शनची वृत्तवाहिनी भगवी
bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

जगभरातील चित्त्यांची स्थिती सध्या काय?

‘प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित ‘डिसअपिअरिंग स्पॉट्स : द ग्लोबल डिक्लाईन ऑफ चित्ता एसिनॉनिक्स ज्युबॅटस अँड व्हॉट इट मीन्स फॉर कन्झर्वेशन’ या अभ्यासानुसार जगभरात ७१०० पेक्षा कमी चित्ते आहेत. मात्र, चित्ता संवर्धन फाउंडेशनच्या मते ही संख्या थोडी जास्त असायला हवी. फाउंडेशनच्या अभ्यासानुसार जगभरात ७५०० पर्यंत चित्ता असावेत. आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) लाल यादीत चित्त्याला असुरक्षित प्रजातींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. आशियाई चित्ता आणि वायव्य आफ्रिकन चित्ता या गंभीर धोक्यात असलेल्या प्रजाती आहेत.

भारतात चित्ता स्थलांतरणासाठी कोणते निकष लावण्यात आले?

नामिबियाच्या अर्धशुष्क प्रदेशात चित्ता सुमारे १५०० किलोमीटर एवढ्या मोठ्या जागेचा वापर करतात. त्यामुळे भारतातील ज्या क्षेत्रात त्यांना सोडण्यात येणार आहे, त्या ठिकाणी त्यांना असणारे धोके आणि ते कमी करण्यासाठी योजना, चित्त्यांचा अधिवास असणाऱ्या जागेच्या अनुकूलतेचा अभ्यास, ते स्थिर व्हावेत म्हणून शिकार करण्यासाठी खाद्य आणि त्या पद्धतीचा अधिवास हे निकष आहेत. तसेच स्थलांतरित चित्त्यांचे मानवी धोक्यापासून संरक्षण, त्याच्या आणि इतर भक्षकांमधील संभाव्य स्पर्धेच्या प्रभावाचे व्यवस्थापन, मोठ्या अधिवासांची श्रेणी या निकषांचाही आधार या प्रकल्पादरम्यान घेण्यात आला.

आफ्रिकन चित्ते भारतातील हवामानाशी जुळवून घेतील का?

चित्ता हा हवामानाशी लवकर जुळवून घेणारा प्राणी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारताच्या काही भागात तो असल्याने येथील हवामानाशी तो जुळवून घेईल, अशी अभ्यासकांना आशा आहे. आफ्रिकेतील ज्या भागांमध्ये चित्ता आढळतात, तेथे तापमान दिवसा खूप उष्ण आणि रात्री थंड असे बदलते. त्यामुळे चित्ता या हंगामी बदलाशी सहज जुळवून घेतात. भारतासारखीच अतिवृष्टी आणि पावसाळी ऋतू तेथे असून त्याचा सामना ते करतात. खुल्या गवताळ वातावरणात ते राहतात आणि मध्यम वृक्षाच्छादित वनस्पती असलेल्या भागातही राहतात. उंच गवत व झुडपी क्षेत्राचाही त्यांना फायदा होतो. भारतात त्यांच्यासाठी शोधण्यात आलेला अधिवास याप्रकारचा असून ते येथे स्थिरावेल, असा विश्वास चित्ता संवर्धन फाउंडेशनला आहे.

स्थलांतरणाचे यश व चित्त्यांचे अस्तित्त्व जपण्यासाठी कोणते घटक विचारात घ्यावे?

चित्ता स्थलांतरणाच्या यशाचे मूल्यांकन करणे थोडे अवघड आहे. आतापर्यंत झालेल्या स्थलांतरणाचे परिणाम आणि त्याचा अभ्यास समोर आला नाही. जे आले, ते सकारात्मक आल्यामुळे अपयशापेक्षा यश अधिक प्रकाशित केले जाते, असाही एक विचार समोर आला. १९६५ ते २०१० दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ६४ ठिकाणी सुमारे ७२७ चित्त्यांचे स्थलांतरण करण्यात आले. त्यातील काही स्थलांतरण यशस्वी ठरले आणि तेच समोर आले. इतर प्रकल्पात सोडण्यात आलेल्या चित्त्यांची संख्या कमी असल्याने त्याचे दीर्घकालीन निरीक्षण करण्यात आले नाही. ते झाले असले तर आणखी वेगळे परिणाम दिसून आले असते. त्यामुळे यश आणि अपयश हे दोन्ही घटक स्थलांतरणादरम्यान विचारात घेणे आवश्यक आहे.

स्थलांतरणाचे नियम काय आहेत?

२०१०मध्ये चित्ता संवर्धन फाउंडेशनचे लॉरी मार्कर यांनी स्थलांतरणाची एक रूपरेषा तयार केली होती. त्यानुसार प्राण्यांना त्यांच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सुरुवातीला मोठे कुंपण असणाऱ्या भागात ठेवण्यात येईल. शास्त्रज्ञांना त्यांच्या हालचालीचा मागोवा घेता यावा व त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना सॅटेलाईन कॉलर लावण्यात येईल. येथे स्थिरावल्यानंतर राष्ट्रीय उद्यानात सोडण्यापूर्वी त्यांना एक महिना किंवा त्याहून अधिक काळ आणखी मोठ्या असलेल्या जागेत ठेवण्यात येईल. बाहेर सोडल्यानंतर त्यांच्या हालचालीवर संशोधक चमू लक्ष ठेवेल. चित्ता भरकटला तर त्याला परत आणले जाईल.

चित्ता प्रकल्पात चित्ता संवर्धन फाउंडेशनची भूमिका काय?

आफ्रिकन चित्ता भारतात सोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या संवर्धन तज्ज्ञांच्या समितीला चित्ता संवर्धन फाउंडेशन मदत करत आहे. हा चित्ता आता आंतरखंडीय प्रवासासाठी सज्ज झाला आहे. यावेळी फाउंडेशनची चमूही कुनो राष्ट्रीय उद्यानात येणार आहे. नामिबियामध्ये चित्ता संवर्धन फाउंडेशनने १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला स्थलांतरणावर संशोधन सुरू केले. फाउंडेशनने नामिबियाच्या इतर प्रदेशात आणि दक्षिण आफ्रिकेतील चित्त्याची संख्या वाढवण्यासाठी १०० हून अधिक नामिबियातील चित्त्याचे स्थलांतरण केले आहे.

भारतात चित्त्याचा प्रवेश कसा?

नामिबियाची राजधानी विंडहोक येथून शुक्रवारी बाेईंग ७४७-४०० या विमानातून भारताकडे कूच करतील. शनिवारी सकाळी ते जयपूरला पोहोचतील. तेथून त्यांना हेलिकॉप्टरमधून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नेण्यात येईल. या विमानात पिंजरे सुरक्षित ठेवण्यासाठी मुख्य कॅबिनमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे विमान १६ तासपर्यंत उडाण करण्यास सक्षम असलेले ‘अल्ट्रा लाँग रेंज जेट’ आहे. त्यामुळे ते इंधन भरण्यासाठी न थांबता नामिबियाहून थेट भारतात उड्डाण करेल.