उत्तर कोरिया क्षेपणास्त्र परीक्षणासाठी नेहमीच चर्चेत असते. एक उपग्रह अवकाशात पाठविण्याचा प्रयत्नही उत्तर कोरियाने नुकताच केला होता; मात्र त्यात त्यांना अपयश आले. हुकूमशाह किम जोंगबद्दल तर संपूर्ण जगाला माहीत आहे. मात्र, यंदा माथेफिरू किंग जोंग उनने असे काही केले आहे, की पुन्हा एकदा जगाचे लक्ष उत्तर कोरियाकडे वळले आहे. उत्तर कोरिया दक्षिण कोरियामध्ये कचरा आणि विष्ठेने भरलेले फुगे पाठवीत आहे; ज्याला ‘पू वॉरफेअर’ असे नाव देण्यात आले आहे.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात कायम तणाव पाहायला मिळतो. या शेजारी देशांमध्ये अत्यंत कटुता आहे. उत्तर कोरियाने यापूर्वी दक्षिण कोरियावर क्षेपणास्त्रही डागले होते. उत्तर कोरिया कायमच आपल्या शेजारी देशाविरोधात कुरापती करीत आला आहे. आता ‘पू वॉरफेअर’मुळे ही स्थिती पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. नेमके हे प्रकरण काय? उत्तर कोरिया असे का करीत आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

हेही वाचा : सख्ख्या शेजाऱ्यांकडून भारतीयांना कोट्यवधीचा गंडा; ऑनलाईन फसवणुकीचे हे प्रकार उघड

नेमके हे प्रकरण काय?

बुधवारी सकाळी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाकडे १५० हून अधिक फुगे तटबंदीच्या सीमेवर पाठविल्याचा आरोप दक्षिण कोरियाच्या लष्करप्रमुखांनी केला. उत्तर कोरियाने पाठविलेले फुगे प्रामुख्याने पांढरे आणि पारदर्शक होते, ते हलक्या वजनाच्या प्लास्टिकचे होते; ज्यामुळे ते अधिक काळ हवेत राहू शकत होते. दक्षिण कोरियाच्या सैन्याने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये या फुग्यांना प्लास्टिकच्या पिशव्या जोडल्या असल्याचे दिसले; ज्यात कचरा आणि इतर अनेक घातक वस्तू होत्या. या प्रकरणामुळे दक्षिण कोरियाने तिथल्या जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.

फुग्याच्या खाली बांधलेल्या पिशव्यांमध्ये काय आढळले?

कचरा : काही पिशव्यांमध्ये कागद, प्लास्टिकच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांचे आवरण यांसारखा कचरा आढळून आला. या कचर्‍यामुळे सीमावर्ती भागात सर्वत्र कचरा पसरला.

विष्ठा आणि लघवी : काही पिशव्यांमध्ये स्पष्टपणे मानवी विष्ठा आणि लघवी असल्याचे आढळून आले. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण कोरियाच्या लोकांना धमकावण्याची ही एक मनोवैज्ञानिक युक्ती मानले जात आहे.

घातक पदार्थ : काही फुग्यांमध्ये गडद रंगाची माती आणि बॅटरी आढळून आली; ज्यामुळे परिसरात रासायनिक धोका निर्माण होऊ शकतो.

प्रचार पत्रके : काही फुग्यांमध्ये दक्षिण कोरियाच्या सरकारचा निषेध करणारी आणि उत्तर कोरियाच्या विचारसरणीचा प्रचार करणारी पत्रके होती. दक्षिण कोरियाच्या सरकारची विश्वासार्हता कमी करण्यासाठी आणि लोकांमध्ये भीती पसरविण्यासाठी ही पत्रके तयार करण्यात आली होती.

उपाययोजना आणि तपास

हे फुगे अशा एका पद्धतीने सोडण्यात आले; ज्यामुळे ते उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवरील डिमिलिटराइज्ड झोन (डीएमझेड)मध्ये जाऊ शकतील. वार्‍याचा वेध घेऊन दक्षिण कोरियातील लोकसंख्या असलेल्या भागात हे फुगे पोहोचतील, याच पद्धतीने ते सोडण्यात आले. मंगळवारी दक्षिणेकडील राजधानी सोलच्या उत्तरेला आणि सीमावर्ती भागात राहणाऱ्या रहिवाशांना एक संदेश प्राप्त झाला की, बाहेरील क्रियाकलापांपासून दूर राहा आणि अज्ञात वस्तू आढळल्यास जवळच्या लष्करी तळावर किंवा कोणत्याही पोलीस चौकीत तक्रार करा. बुधवारपर्यंत १५० हून अधिक फुगे सापडले. काही फुगे जमिनीवर उतरले, तर काही हवेतच राहिले, असे वृत्त बीबीसीने दिले. दक्षिण कोरियाच्या सैन्यातील शोध यंत्रणा हवेत दिसणार्‍या या फुग्यांचा मागोवा घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

दक्षिण कोरियाची प्रतिक्रिया

दक्षिण कोरियाने त्यांच्या ‘मिलिट्री एक्स्प्लोजिव्ह ऑर्डनन्स, केमिकल और बायोलॉजिकल वॉरफेअर रेस्पॉन्स’ टीमला या वस्तूंच्या तपासणीसाठी कामाला लावले आहे. रहिवाशांना फुग्यांशी संपर्क टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि फुगे आढळून आल्यास, त्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्याचा आदेश देण्यात आला आहे. दक्षिण कोरियासह अनेक स्तरांवरून या कृत्याचा निषेध करण्यात येत आहे. दक्षिण कोरियाच्या सैन्यानेही या कृत्याचा निषेध केला आहे आणि असे म्हटले आहे, “आमच्या लोकांची सुरक्षितता धोक्यात आणण्यात आली आहे.” सैन्याने उत्तर कोरियाला अमानवीय आणि क्रूर कृती थांबविण्याचा इशाराही दिला आहे.

उत्तर कोरियाच्या ‘पू वॉरफेअर’मागील कारण काय?

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियातून येणार्‍या वस्तूंच्या विरोधात हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. दक्षिण कोरियाच्या राजकारणात प्रचारासाठी फुग्यांचा वापर हा वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. दक्षिण कोरिया औषधे, रेडिओ, खाद्यपदार्थ, के पॉप संगीत आणि दक्षिण कोरियाच्या बातम्या असणारे पेन ड्राइव्ह फुगे, ड्रोन व बाटल्यांद्वारे उत्तर कोरियाला पाठवायचा. या क्रियाकलापांमुळे वारंवार तणाव निर्माण झाला. डिसेंबर २०२० मध्ये दक्षिण कोरियाच्या संसदेने यावर बंदी घातली. उत्तर कोरियाला चिथावणी देणाऱ्या आणि सीमेजवळील रहिवाशांना धोका निर्माण करणाऱ्या कृतींना थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. परंतु, भाषण स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल या निर्णयावर टीकाही करण्यात आली.

अखेर दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावरील बंदी हटविली. या निर्णयामुळे उत्तर कोरियाला फुगे पाठविण्याची पद्धत पुन्हा सुरू झाली. उत्तर कोरियानेही अधूनमधून प्रचार पत्रके आणि कचऱ्याने भरलेले स्वतःचे फुगे सोडले. उदाहरणार्थ, २०१६ मध्ये उत्तर कोरियाने टॉयलेट पेपर, सिगारेटचा कचरा व इतर कचरा असलेले फुगे दक्षिणेकडे पाठविले होते.

उत्तर कोरियाच्या उप-संरक्षणमंत्र्यांनी अलीकडेच एक विधान केले की, सीमेजवळील भागात आणि दक्षिण कोरियाच्या इतर अनेक भागांमध्ये लवकरच कचरा जमा होईल. मग तो कचरा काढण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे त्यांना कळेल. जर कोणी उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करीत असेल, तर आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी विवेकानंद स्मारकामध्ये ४८ तास ध्यानात बसणार; या वास्तूचे काय आहे वेगळेपण?

दोन्ही देशांतील तणावात वाढ

नुकत्याच घडलेल्या फुग्यांच्या घटनेमुळे उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणाव वाढला आहे. अलीकडच्या काही महिन्यांत उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्र चाचण्या आणि लष्करी हालचाली वाढविल्या आहेत; ज्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये चिंता वाढली आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांव्यतिरिक्त गुप्तचर उपग्रहही सोडले आणि सीमेजवळ लष्करी कवायती सुरू केल्या आहेत; ज्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. दक्षिण कोरियानेही लष्करी सराव सुरू केला आहे आणि प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तैनात करण्यासह त्यांची संरक्षण क्षमता वाढवली आहे. अस्वच्छतेने भरलेले फुगे पाठवून उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाबद्दल आपला तिरस्कार दर्शविला आहे. मनोवैज्ञानिक युद्धाच्या या प्रकाराकडे मनोबल कमी करण्याचा आणि दक्षिण कोरियाच्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.