चीन आणि तैवान या देशांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तैवानचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांचा शपथविधी झाल्यानंतर तीनच दिवसांनी तैवानच्या चारही बाजूंना चीनने सैन्यदलांच्या कवायती सुरू केल्या आहेत. चीनविरोधी असलेल्या लाई चिंग-ते यांच्या निवडीला विरोध म्हणून चीनने तैवानला ‘शिक्षा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने हा निर्णय का घेतला आणि तैवान त्यांना प्रत्युत्तर देणार का, याविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीन आणि तैवान यांच्यात तणाव कशासाठी?

तैवानमधील सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (डीपीपी) या पक्षाचे नेते लाई चिंग-ते यांनी जानेवारीमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. लाई चिंग-ते आणि त्यांचा पक्ष डीपीपी हे चीनचे कट्टर विरोधक मानले जातात. लाई आणि त्यांचे पूर्वसुरी त्साई इंग-वेन हे दोघेही सार्वभौमत्व समर्थक असलेल्या डीपीपी पक्षांचे असून, ज्याला चीन फुटीरतावादी मानते. तैवानमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक सुरू होण्यापूर्वीच चीनने लाई यांना फुटीरतावादी म्हणून घोषित केले होते. ‘लष्करी कारवाई टाळायची असेल तर तैवानच्या नागरिकांनी योग्य पर्याय निवडावा,’ अशी धमकीच निवडणुकीपूर्वी चीनने दिली होती. मात्र चीनच्या धमकीला न जुमानता तैवानी नागरिकांनी डीपीपी पक्ष आणि लाई चिंग-ते यांना निवडून दिले. डीपीपी पक्ष सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाला असून चीनसमर्थक असलेल्या केएमटी या पक्षाचा पराभव केला. लाई यांनी पाच दिवसांपूर्वी अध्यक्षपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर तीनच दिवसांनी संतापलेल्या चीनने लष्करी कवायती सुरू केल्या आहेत.

हेही वाचा…ऋषी सुनक यांनी मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा का केली? हरण्याच्या शक्यतेने अगतिकता की जुगारी खेळी?

लष्करी कवायती कशा सुरू केल्या?

लाई चिंग-ते यांच्या शपथविधीनंतर चीनने संताप व्यक्त केला आणि तैवानच्या चारही बाजूंना लष्करी कवायतीला सुरुवात केली. निवडणूक आयोजित करणे आणि नव्या अध्यक्षांचा शपथविधी हे ‘फुटीरतावादी कृत्य’ आहे. त्यामुळे तैवानला याची ‘शिक्षा’ म्हणून लष्करी कवायती सुरू करण्यात आल्याचे चीनकडून सांगण्यात आले. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) डझनभर लढाऊ विमानांच्या साहाय्याने थेट क्षेपणास्त्रे वाहून नेली. नौदल आणि रॉकेट सैन्यांच्या साहाय्याने ‘उच्च मूल्याच्या लष्करी लक्ष्यां’वर प्रतीकात्मक हल्ले केले, अशी माहिती चीनच्या माध्यमांनी दिली. चीनच्या डोंगफेंग बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचाही समावेश लष्करी कवायतीमध्ये आहे, अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे. मात्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र वापरले जात आहे की नाही याबाबत माहिती दिलेली नाही. ‘जॉइंट स्वोर्ड- २०२४ ए’ हा कोर्डवर्ड वापरून सुरू असलेल्या या कवायतींमध्ये लष्कर, नौदल, हवाई दल आणि रॉकेट दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे. तैवान सामुद्रधुनीच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्वेकडे या तुकड्या कार्यरत आहेत. चीनच्या मुख्य भूभागाच्या जवळ असलेल्या किनमेन, मात्सु, वुकीउ, डोंगयिन या बेटांभोवती या लष्करी कवायती सुरू आहेत.

चीनचे म्हणणे काय?

तैवानचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाई चिंग-ते यांनी तैपेई येथे शपथविधीनंतर केलेल्या भाषणाला प्रत्युत्तर म्हणून लष्करी कवायती केल्याचे चीनचे म्हणणे आहे. लाई यांच्या भाषणानंतर चीनने तैवानविरोधात बदला घेण्याचा इशारा दिला. पीपल्स लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते ली शी म्हणाले की, तैवानच्या फुटीरतावादी कृत्यासाठी कठोर शिक्षा, बाह्य शक्तींचा हस्तक्षेप, चिथावणीखोर भाषणामुळे कठोर इशारा म्हणून लष्करी कवायती करण्यात आल्या आहेत. लाई यांचे भाषण अत्यंत हानिकारक व चिथावणीखोर होते. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी या लष्करी कवायती आवश्यक असून त्या नियमांना धरून आहे.

हेही वाचा…रिझर्व्ह बँँकेनं केंद्राला दिला २.११ लाख कोटींचा लाभांश; एवढा नफा RBI कमावते कुठून?

तैवानने काय प्रत्युत्तर दिले?

चीनच्या लष्करी कवायती चुकीच्या असल्याचे तैवानने म्हटले आहे. तैवानने चीनवर अतार्किक चिथावणी, प्रादेशिक शांतता व स्थिरतेमध्ये व्यत्यय आणल्याचा आरोप केला. ‘‘सध्याचा लष्करी सराव केवळ तैवान सामुद्रधुनीत शांतता व स्थैर्य बिघडवत नाही तर चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्चस्ववादी स्वभावावर प्रकाश टाकतो,’’ असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. आमचे सैन्य दक्ष असून तैवानचे संरक्षण करू शकतील, असा विश्वास तैवानने व्यक्त केला. चीनच्या कुरापतखोरीनंतर सागरी, हवाई आणि भूदलांना सतर्क केले गेले आहे. तळ सुरक्षा मजबूत करण्यात आली असून हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्र दलांना संभाव्य लक्ष्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा…“‘कर्तारपूर’ १९७१ मध्येच भारतात आला असता”; मोदींच्या दाव्यातील गुरुद्वाराचा काय आहे इतिहास?

चीन आणि तैवान यांच्यात नेहमीच तणाव…

तैवान हे पूर्व आशियामध्ये स्थित एक बेट राष्ट्र असून चीनच्या आग्नेय किनाऱ्यापासून १०० मैल अंतरावर आहे. ३६,१९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या बेटावर चीनचा दावा आहे. तैवान हा चीनमधून वेगळा झालेला प्रांत असून दोन्ही देशांचे एकीकरण होणार असल्याचे चीनचे म्हणणे आहे. तैवान मात्र १९४९ पासून स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानतो. या देशाची स्वत:ची राज्यघटना असून लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार तिथे सरकार चालवते. चीन सध्या जगात दबदबा निर्माण करू पाहत आहे. चीनने जर तैवानवर ताबा मिळवला तर तो प्रशांत महासागरात दबदबा निर्माण करण्यात यशस्वी होईल, असे पाश्चिमात्य देशातील अनेक तज्ज्ञांना वाटते. सध्या जगातील १३ देश तैवानला स्वतंत्र देश मानतात. मात्र तैवानला स्वतंत्र ओळख मिळू नये यासाठी चीन सातत्याने प्रयत्नशील असतो. यापूर्वी अनेकदा तैवानला इशारा म्हणून चीनने या देशाच्या सीमेवर लष्करी कवायती केल्या आहेत. २०२१ मध्ये चीनने तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात त्यांचे लढाऊ विमान पाठवून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पलोसी यांनी २०२२ मध्ये तैवानचा दौरा केल्यानंतरही चीनने तैवानच्या सीमावर्ती भागांत लष्करी सराव केला.

sandeep.nalawade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rising tensions china launches military drills around taiwan following election of anti china president lai ching te print exp psg