“मी जर १९७१ मध्ये पंतप्रधान असतो तर पाकिस्तानकडून कर्तारपूर साहिब गुरुद्वारा परत मिळवला असता”, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेमध्ये केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमधील कर्तारपूर साहिब गुरुद्वारा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत होते. १ जून रोजी म्हणजे सातव्या टप्प्यामध्ये पंजाबमध्ये मतदान पार पडणार आहे. भाजपाने पटियाला लोकसभा मतदारसंघातून पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांना उमेदवारी दिली आहे.

त्यांचा प्रचार करताना पंतप्रधान मोदींनी कर्तारपूर साहिब गुरुद्वाराशी शिखांचा असलेला भावनिक संबंध उलगडून सांगत असा दावा केला की, “१९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले त्यावेळी मी पंतप्रधान असतो तर आत्मसमर्पण करणाऱ्या ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना सोडवले असते; तसेच पाकिस्तानकडून कर्तारपूर साहिब गुरुद्वारा परत मिळवला असता.” पुढे ते म्हणाले की, “गेल्या ७० वर्षांपासून आपण कर्तारपूर साहिब गुरुद्वारा दुर्बिणीतून पाहत आहोत. १९७१ मध्ये हा गुरुद्वारा भारतात येऊ शकला असता. मी जर तेव्हा पंतप्रधान असतो तर ही गोष्ट नक्कीच घडवून आणली असती.” पुढे याबाबत त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला दोषी धरले. काँग्रेसवर टीका करत ते म्हणाले की, “काँग्रेसने ही गोष्ट केली नाही. मात्र, २०१९ मध्ये आमच्या सरकारने कर्तारपूर साहिब या ठिकाणी जाण्याचा मार्ग खुला केला, त्यामुळेच शीख बांधव या ठिकाणी जाऊ शकले.”

पंजाबमध्ये भाजपाविरोधात शेतकऱ्यांचा रोष आहे. त्यामुळे भाजपाला या ठिकाणी मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा पार्श्वभूमीवर शिखांची मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तारपूर साहिब गुरुद्वारा भारतात आणण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे. पण, हा गुरुद्वारा महत्त्वाचा का आहे? त्याचा इतिहास नेमका काय सांगतो?

हेही वाचा : नोटाला उमेदवार मानले जाते का? त्याबाबत दाखल नवीन याचिका काय आहे?

श्री कर्तारपूर साहिब गुरुद्वारा – शिखांसाठी जिव्हाळ्याचा विषय

श्री कर्तारपूर साहिब गुरुद्वारा कर्तारपूर गावामध्ये आहे. सध्या हे गाव पाकिस्तानमधील नारोवाल जिल्ह्यामध्ये येते. रावी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे गाव वसलेले आहे. भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून हे गाव फक्त साडेचार किलोमीटर अंतरावर आहे. हा गुरुद्वारा अत्यंत जुना असून १५७२ साली या गुरुद्वाराची निर्मिती करण्यात आली होती. महाराजा रणजित सिंग यांनी या गुरुद्वाऱ्याचा घुमट सोन्याने मढवला होता. पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांनी १९२५ मध्ये या गुरुद्वाराचे बांधकाम पूर्णत्वास नेले होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे ते आजोबा होते. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर हा गुरुद्वारा पाकिस्तानमध्ये गेला.

गुरु नानक देव यांचे दीर्घकाळ वास्तव्य

शिखांचे पहिले गुरु ‘गुरु नानक देव’ यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची १८ वर्षे याच ठिकाणी घालवली होती. त्यामुळेच कर्तारपूर हे ठिकाण शिखांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या या गुरुद्वाराशी असलेला शिखांचा संबंध अत्यंत जिव्हाळ्याचा मानला जातो. ‘द प्रिंट’ने दिलेल्या माहितीनुसार, गुरु नानक देव यांनी अनेक देशांचा प्रवास केल्यानंतर ते १५२१ मध्ये कर्तारपूर येथे आले होते. त्यावेळी या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या दुनी चंदने त्यांना रावी नदीच्या किनाऱ्यावर ही जमीन दिली. तब्बल १०० एकरमध्ये हा गुरुद्वारा पसरला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या माहितीनुसार, या गुरुद्वारामध्ये गुरु नानक देव, त्यांचे आई-वडील, पत्नी माता सुलाखनी आणि श्री चंद आणि लक्ष्मी चंद अशी दोन मुले अशा संपूर्ण कुटुंबाबरोबर रहायचे. अनेक देशांचा प्रवास केल्यानंतर १५२१ मध्ये गुरु नानक कर्तारपूरमध्ये आले, इथेच त्यांनी आपल्या आयुष्याची १८ वर्षे घालवली.

शीख धर्माचा उपदेश कर्तारपूरच्या भूमीतच!

लेखक आणि अमेरिकेचे माजी भारतीय राजदूत नवतेज शर्मा यांनी अशी माहिती दिली की, “गुरु नानक यांनी मुक्तीसाठी जो उपदेश केला होता, तो त्यांनी कर्तारपूरमध्येच आचरणात आणला होता. याच ठिकाणी गुरु नानक यांनी आपला प्रवासी पोशाख वापरणे बंद केले आणि ते एका साध्या शेतकऱ्याच्या पोशाखात वावरू लागले.” गुरु नानक यांनी कर्तारपूरमध्ये राहणे सुरू केल्यानंतर अनेकांसाठी ते धर्मस्थळ झाले. शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’ असून यामधील अनेक स्तोत्रे गुरू नानक यांनी कर्तारपूरमध्येच रचली होती. शीख धर्मियांमध्ये ‘गुरू का लंगर’ची परंपरा आहे. या परंपरेनुसार, गरीब-धनिक असा कोणताही भेदभाव न करता सर्व जण जमिनीवर बसून एकत्र जेवतात. आजही ही परंपरा पाळली जाते. संपूर्ण जगभरात शीख धर्मियांच्या गुरुद्वारामध्ये लंगरच्या माध्यमातून पोटाची भूक भागवली जाते. गुरू नानक यांनी ‘कथा’ आणि त्यांच्या रचनांची निर्मितीही इथेच केली होती. ‘स्व’च्या आधी सेवा ही संकल्पनाही त्यांनी येथेच मांडली.

कर्तारपूरमध्येच गुरू नानक यांचे निधन

इतिहास संशोधक, गुरु नानक देव विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि प्राध्यापक जे. एस. ग्रेवाल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना अशी माहिती दिली की, “कर्तारपूर येथेच गुरु नानकांनी शीख धर्माला आधार देणारे तीन ‘ग’ दिले. ते तीन ‘ग’ म्हणजे गुरुद्वारा, ग्रंथ आणि स्वत: गुरु होय.” त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून अंगद देव यांची घोषणाही इथेच केली होती. पुढे ग्रेवाल म्हणाले की, “त्यांनी अंगद यांना पाच कवड्या आणि एक नारळ अर्पण करून त्यांच्या आसनावर बसवले आणि नंतर त्यांना नमन केले. अशा प्रकारे गुरू शिष्य झाला आणि शिष्य गुरू झाला.” गुरू नानक यांचे २२ सप्टेंबर १५३९ रोजी कर्तारपूर येथे निधन झाले.

हेही वाचा : संशोधकाने सापांवर चाळीस हजार वेळा पाय का दिला? निष्कर्ष काय?

डेरा बाबा नानक गुरुद्वारा

श्री कर्तारपूर गुरुद्वारा या शीख धर्मियांसाठी महत्त्वाचे असलेल्या परिसरातील दोन मोठ्या गुरुद्वारांपैकी एक आहे. त्यातील दुसरा गुरुद्वारा भारतात आहे. या गुरुद्वाराचे नाव ‘डेरा बाबा नानक गुरुद्वारा’ असे आहे. हा गुरुद्वारा पंजाबमधील गुरुदासपूरमधील डेरा बाबा नानक शहरात आहे. हा गुरुद्वारा भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. हा गुरुद्वारा भारतातील रावी नदीच्या पूर्व तीरावर वसलेला आहे. गुरु नानक यांच्या अनुयायांनी त्यांच्या सन्मानार्थ हे शहर वसवले होते.

कर्तारपूर कॉरिडॉर

कर्तारपूर कॉरिडॉर या दोन्ही गुरुद्वारांना जोडणारा मार्ग आहे. डेरा बाबा नानक ते श्री कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या भारतीय भागामध्ये डेरा बाबा नानक ते आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत ४.१ किलोमीटरचा चौपदरी महामार्ग आहे. तसेच या दरम्यान अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंगदेखील (PTB) समाविष्ट आहे. या कॉरिडॉरच्या माध्यमातून भारतीय यात्रेकरूंना पाकिस्तानमधील श्री कर्तारपूर गुरुद्वाराला भेट देता येते.