बिहारने आपला एक मोठा राजकारणी गमावला आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे आठ महिने कर्करोगाशी लढा दिल्यानंतर १३ मे रोजी निधन झाले. ७२ वर्षीय वृद्ध मोदींना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये दाखल करण्यात आले आणि सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापासून ते राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) लालू प्रसाद यादव यांच्यापर्यंत राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. बिहारमधील भाजपाचा उदय आणि यशात सुशील मोदींच्या अमूल्य भूमिकेचेही पंतप्रधान मोदींनी स्मरण केले. आणीबाणीला कडाडून विरोध करत त्यांनी विद्यार्थी राजकारणात नाव कमावले. अतिशय कष्टाळू आणि मनमिळाऊ आमदार म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणाशी संबंधित प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती. प्रशासक म्हणूनही त्यांनी खूप कौतुकास्पद काम केले. जीएसटी मंजूर करण्यात त्यांची सक्रिय भूमिका नेहमीच स्मरणात राहील,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारणात प्रवेश

सुशील कुमार मोदी पाटणा विद्यापीठात वनस्पतिशास्त्रात बीएससी (ऑनर्स) करत असताना त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात प्रवेश केला. १९७३ मध्ये ते पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघाचे सरचिटणीस झाले. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील १९७४ च्या बिहार आंदोलनात मोदींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून जन्मलेले इतर दोन प्रसिद्ध राजकारणी म्हणजे जनता दल (युनायटेड) म्हणजेच जेडी(यू) नेते नितीश कुमार आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आहेत. मिंटच्या रिपोर्टनुसार, जेपी आंदोलन आणि आणीबाणीच्या काळात सुशील कुमार मोदींना पाच वेळा अटक करण्यात आली होती आणि १९ महिने ते तुरुंगात राहिले होते.

बिहारमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विद्यार्थ्यांची शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) प्रमुख नेते म्हणून मोदी राजकीय क्षेत्रात उतरण्यास इच्छुक नव्हते. माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनीच मोदींना राजकारणात उतरण्याचे महत्त्व पटवून सांगितले. मोदींच्या म्हणण्यानुसार, १९८६ मध्ये त्यांच्या लग्न समारंभात वाजपेयींनी त्यांना सांगितले की, विद्यार्थी राजकारण सोडून पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ता बनण्याची आता वेळ आली आहे, असे वृत्तसंस्था पीटीआयने म्हटले आहे. त्यानंतर सुशील मोदी यांनी राजकीय उडी घेतली आणि १९९० मध्ये भाजपाच्या तिकिटावर आता रद्द झालेल्या पाटणा मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीतून पदार्पण केले. त्यांनी या जागेवरून काँग्रेसचे विद्यमान आमदार अकील हैदर यांचा पराभव केला होता.

बिहारच्या राजकारणात सुशील मोदींचे महत्त्व

मोदींनी बिहारमधील लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. चारा घोटाळा प्रकरणातील पाच याचिकाकर्त्यांपैकी मोदी हे एक होते, ज्यात पाटणा उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अखेरीस ९९७ मध्ये यादव यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पाडले गेले आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांना सर्वोच्च पदासाठी उत्तराधिकारी केले. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपाने राबडी देवी सरकारच्या विरोधात १७ अनियमिततेची प्रकरणे उघड केली होती.

मोदींनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक पदे भूषवली. ते बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते, हे पद त्यांनी १९९६ ते २००४ या काळात भूषवले होते. २००४ मध्ये ते भागलपूरमधून लोकसभेवर निवडून गेले. राज्य विधानसभा निवडणुकीत आरजेडी-काँग्रेस आघाडीचा पराभव झाल्यानंतर वर्षभरानंतर ते बिहारमध्ये परतले होते. १९९० च्या दशकात बिहारमध्ये भाजपाच्या चढाईचे श्रेय मोदींना जाते आणि ते कैलाशपती मिश्रांनंतर राज्यातील पक्षाचे सर्वात वजनदार नेते मानले जात होते. २००३ ते २००५ दरम्यान त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम केले.

हेही वाचाः मुंबईत धुळीच्या वादळानंतर जनजीवन विस्कळीत; धुळीची वादळे कशी तयार होतात?

सुशील मोदी आणि नितीश कुमार यांची मैत्री

सुशील मोदी आणि नितीश कुमार यांच्यातील सौहार्द सर्वश्रुत आहे. २००५ मध्ये जेव्हा JD(U)-भाजपा युतीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, तेव्हा नितीश मुख्यमंत्री झाले आणि मोदींना त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करण्यात आले. सुशील मोदी यांनी ११ वर्षांहून अधिक काळ दोन कार्यकाळात बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले, पहिला कार्यकाळ नोव्हेंबर २००५ ते जून २०१३ पर्यंत होता आणि दुसरा कार्यकाळ जुलै २०१७ ते डिसेंबर २०२० पर्यंत होता. नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना मोदींनी इतर खात्यांसह वित्त खात्याची जबाबदारी सांभाळली. बिहारचे मुख्यमंत्री राज्याच्या आर्थिक घडामोडींचे श्रेय मोदींना देतात. जुलै २०११ मध्ये मोदींची GST लागू करण्यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या अधिकारप्राप्त समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. नितीश कुमार आणि सुशील मोदी यांच्यातील संबंध सर्वश्रुत आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, जेडी (यू) नेत्याने अनेकदा भाजपाने आपल्या माजी उपमुख्यमंत्र्यांना बाजूला केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, ज्यांना २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पद देण्यात आले नाही आणि राज्यसभेत पाठवण्यात आले. मोदींचा वरिष्ठ सभागृहातील कार्यकाळ नुकताच संपला होता. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपामधील काहींनी नितीश कुमारांना मोदींनी नेहमीच झुकते माप दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या वर्षी जेव्हा नितीश एनडीएमध्ये परतले, तेव्हा त्यांना मोदींना पुन्हा उपमुख्यमंत्री बनवायचे असल्याच्या बातम्या आल्या.

एप्रिलमध्ये भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने त्यांच्या कर्करोगाचे निदान जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून मी कर्करोगाशी झुंज देत आहे. लोकांना त्याबद्दल सांगण्याची वेळ आली होती. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. मी पंतप्रधानांना सर्व काही सांगितले आहे,” असेही त्यांनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले. सुशील मोदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना नितीश यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “हे माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. जेपींच्या आंदोलनात आम्ही एकत्र होतो. त्यांच्या निधनाने देशातील तसेच बिहारच्या राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे,” असे इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushil kumar modi passes away know his political journey vrd