काळ्या पाण्याची शिक्षा आपण ऐकली आहे. खडतर, सोसण्यास कठीण अशी ही शिक्षा, ब्रिटिशांच्या काळात राबविण्यात येत होती. हा इतिहास असला तरी आजचे काळे हे पाणी हे मात्र आरोग्यवर्धक असल्याचे सांगितले जात आहे. आज अनेक सेलिब्रेटी या ट्रेण्डी पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. कदाचित प्रश्न पडला असेल की, शिक्षा आणि त्याचा वापर यांमध्ये नेमका संबंध काय ? तर लक्षात घेण्याचा मुद्दा असा की काळे पाणी म्हणजे इथे शिक्षेविषयी चर्चा नाही, तर प्रत्यक्ष काळ्या रंगाच्या पाण्याविषयी आपण बोलत आहोत. सध्या चक्क काळ्या रंगाचे पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. या नव्या ट्रेण्डचा घेतलेला हा वेध.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काळे पाणी म्हणजे नेमकं काय आहे?

अल्कलाईन पाण्याला काळ पाणी असं म्हटलं जात आहे. या पाण्यात अनेक प्रकारची खनिजं (मिनरल्स) असल्यामुळे या पाण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पाण्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि फुलविक यासारख्या खनिजांचा समावेश होतो. या पाण्याचा पीएच (pH) स्तर आयोनायझेशन या प्रक्रियेद्वारे ८ ते ९ पेक्षा अधिक वाढवला जातो. त्यामुळेच हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या पाण्याच्या वापरामुळे पचनशक्ती, सहनशक्ती, वाढण्यास मदत होते. तसेच तारुण्य राखण्याच्या प्रक्रियेत हे पाणी फायदेशीर ठरते. हे पाणी ७० पेक्षा अनेक खनिजांनी समृद्ध आहे. या पाण्यात असणाऱ्या फुलविक अॅसिडमुळे या पाण्याला काळा रंग प्राप्त होतो. रंग काळा असला तरी पाण्याच्या चवीत मात्र फरक पडत नाही. या पाण्याची चव नेहमीच्या पाण्यासारखीच लागते. तरीही या पाण्याला काही प्रमाणात खनिज किंवा खडू सारखी चव येते, असा अनुभव हे पाणी नियमित पिणाऱ्यांनी नोंदविला आहे.

आणखी वाचा: व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)

रोजचं पाणी आणि काळं पाणी यात नेमका फरक काय?

मानवी शरीर ६० टक्क्यांहून अधिक पाण्याने तयार झाले आहे आणि आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि शरीरातील होमिओस्टॅसिस राखण्यासाठी आपल्याला पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. सामान्य पाण्याची पीएच पातळी ६ ते ७ असते आणि त्यात कोणतेही खनिज नसते. याउलट, अल्कधर्मी पाण्याचे पीएच ८ च्या वर असते. याशिवाय, त्यात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या विविध खनिजांचा समावेश केलेला असतो. तसेच अल्कलाईन पाण्यामधील लहान पाण्याचे रेणू पेशींद्वारे अधिक सहजपणे शोषले जातात त्यामुळे साध्या पाण्यापेक्षा शरीर जास्त हायड्रेटिंग ठेवण्यास मदत होते.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

अन्नपदार्थांमध्ये विविध पोषक घटक असतात, जे काही वेळा आपले शरीर प्रभावीपणे स्वीकारत नाही. काळ्या अल्कधर्मी पाण्यात आढळणारी नैसर्गिक खनिजे सर्व पोषक तत्त्वांचे शोषण आणि प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढवतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. अल्कधर्मी पाणी पोटातील आम्लता कमी करण्यास मदत करते. या पाण्याच्या सेवनाने आम्लता तसेच पेप्टिक अल्सर सारख्या रोगापासून संरक्षण मिळते, असे तज्ज्ञ सांगतात. मूलतः अल्कधर्मी काळे पाणी आतड्यात सहजपणे शोषले जाऊ शकते त्यामुळे विविध रोगांविरूद्ध प्रतिकारशक्ती प्रदान करण्याचे ते काम करते. असे असले तरी आपल्या रोजच्या सामान्य पाण्याचे महत्त्व कमी होत नाही. याविषयी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला अधिक माहिती देताना प्रसिद्ध आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत-पटवर्धन यांनी सांगितले की, ‘मुळात आपल्या शरीराला निसर्गतः पीएच (pH) सांभाळता येतो त्यामुळे आपलं शरीरंच आपसूक सारं काही सांभाळत. काळं पाणी हे काही औषध नाही. शरीरातील पीएच स्तर संतुलित राखण्यासाठी या पाण्याचे सेवन केले जाते. बाजारात मिळणारे हे पाणी अवाजवी महाग आहे. ज्यांना परवडत ते या पाण्याचा वापर करू शकतात, आहारतज्ज्ञ म्हणून आग्रह नाही. याउलट स्वयंपाक घरातील आपल्या रोजच्या वापरातील वस्तू वापरून रोजच्या पिण्याच्या पाण्याचा स्तरही राखता येतो. लिंबू, काकडी, पुदिना, तुळशीची पाने इत्यादी काही जिन्नस किमान १२ तास स्थिर पाण्यात ठेवून त्याचे सेवन केल्यास शरीरातील पीएच स्तर सुधारू शकतो. याशिवाय तांब्याच्या भांड्यातले पाणी पिणे, ३ ते ४ तासांसाठी फळांच्या फोडी पाण्यात ठेवून त्या पाण्याच्या सेवनाने पीएच स्तर सुधारू शकतो’. त्यामुळे काळं पाणी पिणे ही काही गरज नाही. आणि शरीरातील पीएचचा स्तर सुधारायचा असेल तर घरगुती पर्याय हा आहेच! मात्र सध्या अनेक सेलिब्रिटीमुळे काळेपाणी ट्रेण्डमध्ये आले आहे, हे खरे!

काळ्या पाण्याचे फायदे काय?

‘काळे पाणी आतड्यात चांगल्या बॅक्टेरियाची वाढ सुलभ करते त्यामुळे पचन सुधारते. क्षार युक्त काळे पाणी व्यायामामुळे होणाऱ्या निर्जलीकरणानंतर रक्तातील चिकटपणा कमी करू शकते. त्यामुळे व्यायामानंतर झालेली झीज जलद गतीने भरून निघण्यास मदत होते. काळया पाण्यातील विविध खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे जलद गतीने वाढणाऱ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखण्यास मदत होऊ शकते. मधुमेह असलेल्या लोकांना काळ्या पाण्याचा फायदा होऊ शकतो हे पाणी रक्तातील ग्लुकोजची पातळी राखण्यास मदत करू शकते. अल्कधर्मी पाण्याच्या सेवनाने झोपेची गुणवत्ता, ज्यामुळे तुमची मानसिक सतर्कता आणि क्रियाशीलता सुधारण्यास मदत होते. अल्कधर्मी पाणी तुमचे एकंदर आरोग्य सुधारते आणि फ्री रॅडिकल्सचे नुकसान टाळते. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि कोरोनरी हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. काळ्या पाण्यामुळे हाडांची घनता कमी होण्यास मदत होऊन हाडांच्या आरोग्याला फायदा होतो. एकूणच काळे पाणी त्याच्या अल्कधर्मी स्वभावामुळे पचन समस्या कमी करते’. हे डॉ अजय अग्रवाल ( संचालक आणि विभाग प्रमुख, अंतर्गत औषध, फोर्टिस नोएडा) यांनी द इंडियन एक्सप्रेस शी संवाद साधताना नमूद केले होते.

काळ्या पाण्याची गरज कोणाला आहे?

काळ्या पाण्याचा वापर आरोग्य पूरक म्हणून केला जाऊ शकतो जो वृद्धत्वाचा सामना करताना आणि खनिजांच्या कमतरतेचे निराकरण करताना पचन, सहनशक्ती, आणि सामान्य आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. या अल्कधर्मी पेयाच्या सर्वसमावेशक फायद्यांचा कोणालाही फायदा होऊ शकतो! परंतु खेळाडू, सेलिब्रिटी किंवा जीवनसत्व किंवा खनिजांची कमतरता असलेल्या लोकांसाठी ते उपयुक्त आहे. त्यामुळे अनेक खेळाडू, इन्फ्लुएन्सर्स, सेलिब्रिटी काळे पाणी पीत आहेत. हे नैसर्गिकरित्या निरोगी पेय म्हणून लोकप्रिय झाले आहे.

आणखी वाचा: मीठ आणि साखर यांना ‘पांढरं विष’ का म्हणतात? मधुमेह आणि रक्तदाबाशी नेमका संबंध काय?

साइड इफेक्ट्स आणि खबरदारी

या काळ्या पाण्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. उलट्या होणे, अतिसार, हृदयाच्या पेशींचे नुकसान, शारीरिक आणि मृत्रातील pH मध्ये बदल या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळेच तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय काळ्या पाण्याचा अतिरिक्त वापर करू नये. काळ पाणी हे जादुई नाही. त्यामुळेच त्याचे योग्य प्रमाणात सेवन हेच फायदेशीर ठरू शकते. याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत- पटवर्धन सांगतात ‘कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच, मग ते काळ पाणी का असेना, अतिरिक्त पाण्याच्या सेवनाने ओव्हर हायड्रेशन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

काळ पाणी खरंच गरजेचं आहे का?

काळ्या पाण्याचा वापर पीएच सुधारण्यासाठी केला जातो. शरीराचा पीएच संतुलित राहिल्यास पचनक्रिया सुधारते त्यामुळे अल्कलीजन्य पाणी प्यायलं पाहिजे हा आग्रह केला जातो. म्हणूनच पाण्यातील मूलद्रवे वाढवून पाणी अल्कलीजन्य केले जाते. परंतु पारंपरिकरित्या स्वयंपाक घरात वापरण्यात येणाऱ्या जिन्नसांना वापरून पाण्याचा स्तर सुधारता येतो. पल्लवी सावंत-पटवर्धन यांनी नमूद केल्याप्रमाणे ‘सेलिब्रिटी या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याने या पाण्याच्या वापराचा ट्रेण्ड तयार झाला आहे, अशा प्रकारचा कुठलाही ट्रेण्ड साधारण दोन ते अडीच वर्षे राहतोच. इथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, सेलिब्रेटी हे वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट करत असतात, त्यामुळे निर्माण होणारी पोषकतत्वांची कमतरता या पाण्याच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न ते करतात.’ त्यामुळेच या सारखे ट्रेण्ड फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is celebrity trendy black water how healthy is it to drink svs