अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेने पिण्याच्या पाण्यात असलेल्या सामान्य प्रकारच्या ‘पीएफएएस’ रसायनांवरील (फॉरएव्हर पार्टिकल्स) मर्यादा निश्चित केली. प्रथमच पिण्याच्या पाण्यावर ‘पीएफएएस’ची मर्यादा लादण्यात आली असून यांमुळे शुद्ध पाणी मिळविण्याचा नागरिकांचा हक्क अबाधित राहील, असे प्रशासनाला वाटते. ‘पीएफएएस’ म्हणजे काय, पर्यावरणाला हा घटक कसा धोकादायक आहे याविषयी…

‘पीएफएएस’ म्हणजे काय?

पॉलिफ्लोरोअल्किल अर्थात पीएफएएस हा रसायनांचा एक समूह आहे. १९४० पासून जगभरात त्याचा वापर केला जात आहे. पीएफएएस म्हणजे कार्बन आणि फ्लोरिनयुक्त संयुगाची मजबूत साखळी आहे, या साखळीला एखादा रासायनिक गट जोडलेला असतो. या घटकाचे वातावरणात सहजासहजी विघटन होत नाही. त्यामुळेच त्यांना ‘फॉरएव्हर पार्टिकल’ म्हटले जाते. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने ती चिंतानजक बाब आहे. जगात सुमारे १४ हजार पीएफएएस घटक आढळतात. या घटकाचा वापर शेतातील खते व रसायने, खाद्यपदार्थ पॅकेजिंग, वस्त्रनिर्मिती, रसायने, रंगनिर्मिती, इलेक्ट्रॅनिक्स, बांधकाम अशा उद्योगांमध्ये केला जातो. मात्र आता हवा, पाणी आणि मातीमध्येही हा घटक पसरलेला आहे. अन्न, हवा, पाणी यांच्या माध्यमातून मनुष्याच्या किंवा प्राण्यांच्या रक्तात हा घटक आढळू लागला असून त्याचा पर्यावरणासह मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.

हेही वाचा : Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?

‘पीएफएएस’संबंधी समस्या काय आहे?

पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की पीएफएएस उत्पादकांना पीएफएएसच्या आरोग्याच्या हानीबद्दल ते सार्वजनिक होण्यापूर्वीच माहीत होते. या रासायनिक घटकांचे विघटन सहजासहजी होत नसल्याने ते पर्यावरणाला खूपच धोकादायक आहे. ‘पीएफएएस’ विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक मानवी संपर्कात आल्यास त्याचे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच अनेक देशांनी अन्न व पाण्यामधील पीएफएएसची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेनेहीही दोन सामान्य प्रकारच्या पीएफएएससाठी प्रति ट्रिलियन चार भाग पिण्याच्या पाण्याची मर्यादा निर्धारित केली आहे. उत्पादनांच्या आयात किंवा निर्यातीत त्याची कमाल मर्यादा (एमआरएल) निश्चित करण्यात आली आहे. त्या मर्यादेपेक्षा ‘पीएफएएस’चे प्रमाण जास्त असेल तर आयात किंवा निर्यात करता येत नाही. आरोग्यतज्ज्ञांच्या मते पीएफएएसचे प्रमाण वाढल्यास मूत्रपिंडाचे आजार, नवजात बालकांचे कमी वजन, उच्च कोलेस्टेरॉल आदी विकार होतात. पीएफएएसचे प्रमाण वाढल्यास कर्करोगही होऊ शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

अमेरिकेत नवीन नियम काय सांगतो?

अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेने पीएफएएसचा पर्यावरणावर अधिक घातक परिणाम होऊ नये म्हणून त्याच्या प्रमाणावर मर्यादा घातली आहे. ‘पीएफओए’ आणि ‘पीएफओएस’ या दोन पीएफएएसवर मर्यादा घालण्यात आली आहे. कारण हे घटक अधिक धोकादायक असून अन्न-पाणी यांद्वारे जास्त प्रमाणात पसरतात. या दोन सामान्य प्रकारच्या पीएफएएससाठी प्रति ट्रिलियन चार भाग पिण्याच्या पाण्याची मर्यादा निर्धारित केली आहे. इतर काही उद्योगांमध्ये १० भाग प्रति ट्रिलियन मर्यादा घालण्यात आली आहे. पीएफएएसचे परिणाम तात्काळ जाणवत नसले तरी कालांतराने त्याचे परिणाम अधिक धोकदायक असल्याने त्याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण संस्थेच्या नियमावलीचे पालन केल्यास येत्या दशकात जवळपास १० हजार मृत्यू कमी हाेतील आणि शेकडो गंभीर आजार टळतील, असा विश्वास या संस्थेने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : विश्लेषण: दक्षिणेतून भाजपला ४५ जागा? लोकसभेसाठी तमिळनाडू, केरळमध्ये जोरदार वातावरणनिर्मिती…

विविध घटकांचे मत काय?

पीएफएएसवर मर्यादा आणणारी नियमावली फार पूर्वीपासूनच करायला हवी होती, असे मत पर्यावरण व सार्वजनिक आरोग्य समूहांनी व्यक्त केले आहे. पीएफओए आणि पीएफओएस यांसाठी मर्यादा निश्चित केल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र उद्योजकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. पीएफएएसवरील मर्यादा सौम्य असायला हवी होती, असे उद्योजक संघटनांकडून सांगण्यात आले. पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पीएफएएस आढळत असल्याने बायडेन प्रशासनाने पेयजलाविषयी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांकडून सांगण्यात आले. पीएफएएसचे धोके मोठे असून भविष्यात उपचार सुविधा स्थापित करण्यासाठी खूप खर्च येईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

sandeep.nalawade@expressindia.com