धनंजय रिसोडकर

फुटबॉल विश्वचषक हा पाचही खंडांचा खेळ असला तरी विश्वविजेतेपद हे सदैव केवळ युरोप आणि अमेरिका खंडातील देशांकडेच गेले आहे. त्यातही युरोपमधील देश हे आधीच दोन पावले पुढे आहेत. आतापर्यंतच्या २० विश्वचषकांपैकी ९ वेळा लॅटिन अमेरिकन देशांनी, तर ११ वेळा युरोपातील देशांनी बाजी मारली आहे. यंदाच्या विश्वचषकात उपांत्य फेरीतील चारही संघ हे युरोपातीलच उरल्याने यंदाचा विश्वचषक हा पुन्हा एकदा युरोपीयन देशांकडेच जाणार, हे निश्चित झाले आहे.

यंदाच्या विश्वचषकात अर्जेटिना आणि उरुग्वेनंतर ब्राझीलदेखील बाहेर पडल्याने लॅटिन अमेरिकन शैलीतील फुटबॉल खेळणारे सर्व प्रमुख संघ उपांत्य सामन्यांपूर्वीच हद्दपार झाले आहेत. उपांत्य सामन्यांमध्ये आता केवळ इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम आणि क्रोएशिया हे युरोपीयन संघच विजेतेपदाच्या स्पर्धेत उरले आहेत. त्यामुळे यंदाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात दोन भिन्न शैलींतील लढाई अनुभवण्याची फुटबॉलशौकिनांची संधी हुकणार आहे.

ढोबळमानाने फुटबॉल हा युरोपीयन शैली आणि लॅटिन अमेरिकन शैलीत खेळला जातो. १९३०च्या पहिल्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेपासून आतापर्यंत दोनच शैलींमध्ये हे द्वंद्व रंगले आहे. युरोपीयन शैलीत भक्कम बचावासह कोणताही मूर्खपणा न करता शांतचित्ताने योग्य संधीची वाट बघत खेळला जातो. प्रत्येक खेळाडूला एक विशिष्ट स्थान दिलेले असते. त्याने त्याच स्थानावर राहून खेळणे हा त्यातील नियम अतिशय कसोशीने पाळला जातो. जवळजवळच्या खेळाडूंनी एकमेकांकडे अत्यंत योग्य प्रकारे पास देणे तसेच जास्त काळ फुटबॉलचा ताबा राखत प्रतिस्पध्र्यावर दबाव निर्माण करणे आणि मग अचानकपणे शिस्तबद्ध गोल करत विजय मिळवणे, ही पद्धती मानली जाते. युरोपीयन खेळाडू हे सामान्यपणे दक्षिण अमेरिकन देशांतील खेळाडूंपेक्षा अधिक धष्टपुष्ट असल्याने त्याचा फायदादेखील या शैलीत घेतला जातो. एकुणात युरोपीयन शैली म्हणजे पुस्तकीय शैलीतील आदर्श फुटबॉल असतो. जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड हे देश प्रामुख्याने या शैलीचा अवलंब करतात. त्यामुळे या देशांचा बचाव हा बहुतांश वेळा त्यांच्या आक्रमणापेक्षा अधिक मजबूत असतो.

लॅटिन अमेरिकन शैलीतील फुटबॉल हा प्रामुख्याने हल्ले आणि प्रतिहल्ल्यांवर भर देणारा असतो. पुस्तकी खेळापेक्षा कौशल्य आणि मुक्तछंदात खेळण्यावर भर देणारी ही शैली आहे. पायात एकदा बॉल आला, की एकही क्षण वाया न घालवता त्याला खेळवत, झटपट पास देत थेट शत्रूच्या आतल्या गोटात घुसून त्याला चकित करणे म्हणजे लॅटिन अमेरिकन शैली मानली जाते. वेगात धावता-धावता दिले जाणारे पासेस आणि पुन्हा मोक्याच्या जागेवर पोहोचून केले जाणारे गोल हे विशेष नेत्रसुखद असतात. वेगवान धाव, चेंडूला खेळवणे आणि निर्णायक हल्ला हीच या शैलीची त्रिसूत्री आहे. या शैलीत आक्रमक, मध्यरक्षक आणि काही प्रसंगी तर बचावपटूदेखील अचानकपणे असे सुसाट हल्ले करतात. प्रामुख्याने ब्राझील, अर्जेटिना, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि उरुग्वे या देशांतील खेळाडूंमध्ये ही शैली रुजल्याचे आढळते. त्यामुळे या देशांचे आक्रमण हे त्यांच्या बचावापेक्षा अधिक सक्षम आणि या शैलीतील खेळाचे बाळकडू घेतलेलेच खेळाडू प्रामुख्याने जगविख्यात आक्रमक म्हणून नावारूपास आले आहेत. त्यात पेले, मॅराडोनापासून ते सध्याच्या मेसी, नेयमापर्यंतचे दाखले देता येतील. तसेच सध्यादेखील अनेक क्लबकडून खेळणारे प्रमुख आक्रमक हे बऱ्याचदा याच शैलीचे भोक्ते असल्याचे दिसते.  गेल्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यापासून दोन्ही भागांतील खेळाडू एकमेकांच्या देशांतील क्लब्जमधून अधिक प्रमाणात खेळू लागल्याने या शैलींमध्येदेखील सरमिसळ होऊ लागली. मधल्या काळात ‘टोटल फुटबॉल’ आणि ‘टिकी-टाका’चे नवीन प्रकार उदयाला आले असले तरी काही काळानंतर तेदेखील लयास गेले आहेत.

लॅटिन अमेरिकन शैलीला मुकणार

यापूर्वीच्या २० विश्वचषक स्पर्धापैकी चार वेळा उपांत्य फेरीत एकही लॅटिन अमेरिकन देश पोहोचू शकला नव्हता. १९३४, १९६६, १९८२ आणि २००६च्या विश्वचषकात हे घडले होते. हे चारही विश्वचषक अनुक्रमे इटली, इंग्लंड, स्पेन आणि जर्मनी या चारही युरोपीयन देशांमध्येच झाले होते, तर यंदाचा पाचवा विश्वचषकदेखील रशियात असून त्यातदेखील उपांत्य फेरीत एकही लॅटिन अमेरिकन संघ पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात पुन्हा लॅटीन अमेरिकन शैलीचा खेळ दिसू शकणार नाही.

dhananjay.risodkar@expressindia.com