ब्राझील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अनुक्रमे साखळीत आणि उपउपांत्यपूर्व फेरीतून गाशा गुंडाळावा लागलेले क्रोएशिया आणि नायजेरिया हे संघ शनिवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असणारा क्रोएशिया यंदा अर्जेटिना, नायजेरिया यांच्यासारख्या मातब्बर संघाचा समावेश असलेल्या ‘ड’ गटात कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल.

१९९८च्या विश्वचषकात क्रोएशियाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र त्यानंतर त्यांना एकदाही त्याची पुनरावृत्ती करता आलेली नाही.  क्रोएशियाची मुख्य मदार कर्णधार लुका मॉड्रिच, इवान राकिटिक आणि मारिओ मँडझुकीक यांच्यावर आहे. विश्वचषकापूर्वी झालेल्या ब्राझीलविरुद्धच्या सराव सामन्यात त्यांना ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र सेनेगलला २-१ असे नमवून त्यांनी संघबांधणी करण्यावर भर दिला. खुद्द क्रोएशियाचे प्रशिक्षक झॅलट्को डॅलिक यांनी गटातील सर्वात आव्हानात्मक संघ म्हणून नायजेरियाला पसंती दिल्याने या लढतीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

दुसरीकडे नायजेरियाच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा असून त्यांचे खेळाडू सातत्याने विविध क्लब स्पर्धामध्ये खेळत असतात. आर्सेनलकडून खेळणारा अ‍ॅलेक्स इवोबी, चेल्सीचा विक्टर मोसेस हे नायजेरियाचे आधारस्तंभ आहेत. २०१४च्या विश्वचषकातील सामन्यात नायजेरियाने बलाढय़ अर्जेटिनालाही विजयासाठी झुंजवले होते. त्यामुळे त्यांना हलक्यात घेण्याची चूक कोणालाही महागात पडू शकते.