FIFA World Cup 2018 : फुटबॉल वर्ल्डकपमध्ये लिओनेल मेसीच्या अर्जेंटिनाला क्रोएशियाने धक्का दिला. ड गटातील महत्त्वाच्या लढतीमध्ये क्रोएशियाने अर्जेंटिनावर ३- ०ने मात केली आहे. या विजयासह क्रोएशियाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले असून अर्जेंटिनाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले. क्रोएशियाने दक्षिण अमेरिकेतील टीमवर मात केल्याची ही पहिलीच वेळ असून कर्णधार लुका मॉड्रिच हा क्रोएशियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

दरम्यान, मेसीच्या आणि अर्जेंटिनाच्या इतर खेळाडूच्या खेळावर अनेक दिग्गज फुटबॉलपटूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या, तर काहींनी या खेळाडूंची चांगली कानउघाडणी केली.

पण केरळमध्ये राहणाऱ्या एका मुलाला हा पराभव जिव्हारी लागला. दिनू अलेक्स असे या ३० वर्षीय तरुणाचे नाव आहे. या पराभवामुळे निराश झालेल्या अलेक्सने या सामन्यानंतर तो केरळमधील आपल्या राहत्या घरातून निघून गेला. इतकेच नव्हे तर पोलिसांना त्याच्या घरातून आत्महत्येचे पत्र(सुसाईड नोट) सापडले आहे. अर्जेंटिनाचा पराभव पाहून मी खुप निराश झालो आहे. मला या पराभवामुळे प्रचंड दुःख झाले असून मी माझे आयुष्य संपवत आहे, असे त्या नोटमध्ये लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.