सुरुवातीला आयर्नक्लॅड युद्धनौकांच्या पाण्यावरील भागालाच लोखंडी आवरण चढवलेले असे. त्याने त्यांचे शत्रूच्या तोफगोळ्यांपासून संरक्षण होत असे. पण क्रिमियन युद्धात (१८५४-५६) पाणसुरुंगांचा वापर होऊ लागला. त्याने युद्धनौकांच्या तळाकडील भागाचेही संरक्षण करणे गरजेचे बनू लागले. त्यासाठी आता नौकेच्या सर्व पृष्ठभागावर लोखंडी आवरण चढवले जाऊ लागले. याशिवाय पूर्ण युद्धनौकेची बांधणीच लाकडाऐवजी दातूने करण्यास सुरुवात झाली. प्रथम लोखंड किंवा पोलादाच्या उत्पादनाचा दर्जा फारसा चांगला नव्हता. ते बरेच ठिसूळ असे. पण नंतर उत्पादन तंत्रातील सुधारणेनंतर पोलादी नौका बनवणे शक्य होऊ लागले.

क्रिमियन युद्ध आणि त्यानंतर झालेले अमेरिकी गृहयुद्ध ही आधुनिक युद्धांची नांदी मानले जाते. या दोन्ही युद्धांत अनेक आधुनिक शस्त्रे आणि तंत्रे वापरात आली. तोपर्यंत आयर्नक्लॅड युद्धनौकांचा वापर वाढला होता. क्रिमियन युद्धात ब्रिटन आणि फ्रान्सच्या नौदलांनी काही आयर्नक्लॅड युद्धनौका तैनात केल्या होत्या. पण आयर्नक्लॅड युद्धनौकांचा पहिला संग्राम झाला तो अमेरिकी गृहयुद्धात १८६२ साली. दक्षिणेकडील कन्फेडरेट राज्यांनी सीएसएस व्हर्जिनिया प्रकारच्या अनेक आयर्नक्लॅड युद्धनौका बनवल्या होत्या. तर उत्तरेकडील युनियन राज्यांनी मॉनिटर प्रकारच्या युद्धनौका बनवल्या होत्या. मॉनिटर युद्धनौका बरीचशी पाण्याच्या पृष्ठभागाखाली असे आणि तिच्यावर गोलाकार फिरणाऱ्या टरेटवर ११ आणि १५ इंची डालग्रेन स्मूथ बोअर तोफा बसवल्या होत्या. तर व्हर्जिनियाचा पाण्यावरचा भाग पिरॅमिड किंवा रणगाडय़ाच्या टरेटप्रमाणे तिरपा आणि वर निमुळता होत जाणारा होता. त्यात तोफा बसवलेल्या होत्या.

९ मार्च १८६२ रोजी युनियन राज्यांनी केलेल्या नाकेबंदीला (ब्लॉकेड) भेदण्यासाठी कन्फेडरेटच्या व्हर्जिनिया युद्धनौकेने हॅम्प्टन रोड्स खाडीत यूएसएस कंबरलँड युद्धनौकेवर हल्ला करून तिला बुडवले. जेम्स नदी हॅम्प्टन रोड्स येथे कन्फडरेट युद्धनौकेच्या लढय़ामुळे युनियन सैन्याचा रिचमंड ही कन्फेडरेट राज्यांची राजधानी जिंकण्याची मोहीम थोडी मंदावली. युनियन नौदलाच्या मॉनिटर युद्धनौकेने कन्फेडरेटच्या व्हर्जिनिया युद्धनौकेवर डागलेले २४ तोफगोळे व्हर्जिनियावर आदळले. पण व्हर्जिनियाच्या तिरप्या चिलखतावरून ते बाजूला फेकले गेले. २४ वेळा मार बसूनही व्हर्जिनिया या हल्ल्यातून वाचली. मात्र ३१ जिसेंबर १८६२ रोजी ती नॉर्थ कॅरोलिनाजवळ बुडाली. तिच्या बुडालेल्या भागाचे काही अवशेष १९७३ साली शोधून पाण्यातून बाहेर काढले गेले. आता ते व्हर्जिनियातील न्यूपोर्ट येथे जतन केले आहेत.

 sachin.diwan@ expressindia.com