श्रावण महिना संपत आला की आपल्या सर्वांनाच वेध लागतात ते गणपती बाप्पाचे. आपल्या सर्वांचे लाडके दैवत असलेल्या गणरायाच्या उत्सवाची सारेच आतुरतेने वाट पाहत असतात. घराच्या सजावटीपासून ते सार्वजनिक मंडळाच्या तयारीपर्यंत सारेच आपआपल्यापरिने बाप्पाच्या सेवेत मग्न होतात. या सगळ्या उत्साही वातावरणात सेलिब्रिटी तरी कसे काय मागे राहतील. आपल्या सर्वांसाठी ज्याप्रमाणे हा उत्सव म्हणजे पर्वणी असतो, त्याचप्रमाणे कलाकारांसाठीही हा सण फार महत्त्वपूर्ण असतो. कलेची देवता असणाऱ्या गणरायाचे अनेक सेलिब्रिटी अगदी उत्साहाने घरी स्वागत करतात. काही कलाकार मंडळी वेगवेगळ्या मंडळांमध्ये जाऊन बाप्पाची भक्तीभावाने पूजा करतात. अभिनेत्री किशोरी शहाणे- विज यांनीही त्यांच्या माहेरी येणाऱ्या गणपतीच्या आणि बालपणातील आठवणींना या निमित्ताने उजाळा दिला…

‘माझ्या माहेरी पाच दिवसांचा गणपती असायचा. पण गेल्या वर्षी बाबा वारले. त्यामुळे आम्ही गणपतीची प्रतिष्ठापणा करणं थांबवलं. पण गणेशोत्सवाच्या अनेक आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. गणपती येण्याच्या आसपासच आमच्या चाचणी परीक्षा असायच्या. तेव्हा मी प्रत्येकवेळा बाप्पाला काही ना काही देण्याची लाच द्यायचे आणि परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून प्रार्थना करायचे. प्रत्येकवेळा बाप्पाला द्यायची लाचही माझी ठरलेली असायची. मी पाच नारळांचा हार चढवेन अशी लाच त्याला द्यायचे आणि परीक्षेत चांगले गुण मिळून दे अशी प्रार्थना करायचे. हे अगदी कॉलेज संपेपर्यंत न चुकता मी करत होते. दुपारच्या वेळी बाप्पा शेजारी कोणी नाही हे पाहून मी त्याच्याशी मनसोक्त गप्पाही मारायचे.

गणेशोत्सवात म्हणावयाच्या आरत्यांचाही मी फार आधीपासून सराव करायचे. लहानपणापासूनच माझ्या सर्व आरत्या पाठ होत्या. घरच्या गणपती व्यतिरिक्त मी सार्वजनिक गणपतींनाही आवर्जून भेट देते. गणपतीची अजून एक जवळची आठवण म्हणजे माझ्या मुलाचा जन्म गणपतींच्या या दिवसांमध्येच झाला होता. रुग्णालयाच्या बाहेर सगळीकडे आरत्यांचे आणि मिरवणूकींचे आवाज येत होते आणि १७ सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. माझ्या मुलाचे नाव बॉबी असले तरी त्याचे पाळण्यातले नाव आम्ही गौरीश असं ठेवलं होतं. हा क्षण माझ्यासाठी खूपच जवळचा आहे.’

शब्दांकन- मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@loksatta.com