गणेशोत्सवाच्या कालावधीत होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तयार करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारी यंत्रणा आणि पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येते. मात्र अनेक मंडळांकडून याला गांभीर्याने घेतले जात नाही. मात्र काही मंडळे याला अपवाद आहेत. नवी मुंबई, ठाणे तसेच पनवेलमधील तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने निसर्गाचे भान ठेवून पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीची स्थापना करण्याला प्राधान्य दिलेले आहे. त्यासाठी उरण तालुक्यातील जासईमधील मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्टचे अधीक्षक व ज्येष्ठ शिल्पकार मोरेश्वर पवार यांच्या कारखान्यात वृत्तपत्राच्या रद्दीपासून तयार करण्यात आलेल्या सहा व बारा फुटी उंचीच्या गणेशमूर्ती तयार करण्यात आलेले आहेत. मागील वर्षी या कारखान्यात एकच मूर्ती बनविण्यात आलेली होती. या वर्षी आणखी दोन मूर्ती बनविण्यात आल्याने गणेश मंडळांमध्ये पर्यावरणासंदर्भात जनजागृती होऊ लागल्याचे हे चित्र आहे.
सण साजरे करीत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते काम करीत आहेत. या कामात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही सहभागी होत असली तरी त्यांची संख्या म्हणावी तशी समाधानकारक नाही. हे चित्र एकीकडे असताना वर्तमानपत्राच्या रद्दीपासून सहा किलो कागद वापरून सहा फुटांची, तर सात किलो कागदाचा वापर करून बारा फूट उंचीच्या गणेशमूर्ती जासई येथील कारखान्यात बनविण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी गव्हाचे पीठ तसेच मैद्याच्या पिठाची गोंद तयार करून या कागदांना आकार दिले जात आहेत. त्यामुळे मूर्तीचे विसर्जन करताना सहज हाताळता येतात तसेच या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर कागदाच्या त्याचप्रमाणे गव्हाच्या व मैद्याच्या पिठाचे विघटीकरण झाल्यानंतर तलावातील माशांना खाद्यही मिळत असून तळ्यातील पाणी स्वच्छ राहण्यास मदत होत असल्याची माहिती मूर्तिकार मनोहर पवार यांनी दिली आहे.
शाडू व प्लॅस्टरच्या मूर्तीपेक्षा अधिक महाग  
निसर्ग व पर्यावरणस्नेही मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कालावधी व त्यासाठी लागणारे रंग यामुळे कागदापासून तयार करण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीच्या किमती या शाडू तसेच प्लॅस्टरच्या मूर्तीपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे या पर्यावरणस्नेही मूर्तीना प्राधान्य देण्यासाठी कागदापासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तीना शासन पातळीवर देऊन त्यांच्या किमती कमी होतील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत जेएनपीटी सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष रवी घरत यांनी व्यक्त केले आहे.