गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये चेन्नईजवळील महाबलीपूरम् येथील शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीपासूनच (५ सप्टेंबर) या मंदिराची विद्युत रोषणाई पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
सहाव्या शतकातील चौल राजवटीच्या काळामध्ये उभारण्यात आलेल्या महाबलीपूरम् येथील शिवमंदिराचा देखावा साकार करणे हे खडतर शिवधनुष्य पेलण्यासारखेच काम होते. ज्यांना तमिळनाडू राज्यामध्ये जाऊन या मंदिराचे दर्शन घेता येणार नाही त्यांना पुण्यामध्ये या मंदिराचे वैभव पाहता यावे या उद्देशातून ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे, अशी माहिती हा देखावा साकारणारे कला दिग्दर्शक आणि प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी दिली.
महाबलीपूरम् मंदिराची प्रतिकृती प्रत्यक्षामध्ये ९० फूट लांबीची, ५० फूट रुंदीची आणि ८० फूट उंचीची असेल. संपूर्ण लाकडामध्ये काम करण्यात आले असून २० खांबावर हे मंदिर उभे राहणार आहे. मूळ मंदिरावर असलेल्या ३७५ शिल्पांच्या प्रतिकृती या देखाव्यामध्ये पाहावयास मिळणार आहेत. या मंदिरावर चार कळस असून चार बाजूंना तोंड करून बसलेले सिंह असतील. हे मंदिर समुद्रकिनारी असल्यामुळे ‘सँड स्टोन’ रंगामध्ये आहे. ती प्रचिती येण्यासाठी हा देखावा यलो ऑकर आणि ब्राऊनिश कॉफी या रंगांचे मिश्रण करून प्लायवूडमध्ये साकारला आहे. या मंदिराचे छत गजपृष्ठाकार म्हणजेच अर्धगोलाकार असेल. सव्वा लाख दिव्यांच्या विद्युत रोषणाईमध्ये महाबलीपूरम् मंदिर उजळून निघणार आहे. गुरुवारी (१ सप्टेंबर) हा देखावा उत्सव मंडपामध्ये उभा असेल आणि विद्युत रोषणाईची रंगीत तालीम घेतली जाणार आहे, असे खटावकर यांनी सांगितले. हिराबाग कोठी येथे गेल्या दोन महिन्यांपासून हा देखावा साकारण्याचे काम सुरू आहे. दररोज सकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ या काळामध्ये ४० कसबी कलाकार आणि कारागीर हे शिवमंदिर साकारण्यासाठी कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

nagpur tekdi ganpati mandir marathi news, tekdi ganpati mandir sprinkler marathi news
नागपूर: तळपत्या उन्हातही टेकडी गणपती मंदिर परिसर थंडा थंडा कुल कुल… स्प्रिंकलरमुळे भाविक गारेगार…
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?