मेहता काका खूपच आश्चर्यचकित झाले होते. टी.व्ही.वर ज्या टूथपेस्टची ‘सर्वात चांगली आणि दातांचे संरक्षण करणारी टूथपेस्ट’ अशी जाहिरात केली जाते, तीच टूथपेस्ट वर्षांनुवर्षे वापरूनही, त्यांचे अनेक दात कसे काय किडले, याचे त्यांना कोडे पडले होते!
मिसेस कुलकर्णीही स्वत:वर खूप नाराज झाल्या होत्या. त्यांच्या आठ वर्षांच्या रोहनचे अनेक दात किडले होते. त्याच्या चेहऱ्याला चांगलीच सूज आली होती. ठणका लागून रोहन सारखा रडत होता. काहीही खाण्याचे टाळत होता.
शहा काकांनी तर, ‘आजच्या पिढीचे दातच कमकुवत आहेत,’ असा निष्कर्ष, ते स्वत: दाताचे डॉक्टर नसूनही (आणि त्यांच्या तोंडातील सर्वच्या सर्व दात वयाच्या पन्नाशीलाच काढायला लागलेले असूनही) जोरकसपणे काढला होता! दातांच्या प्रत्येक दवाखान्यात थोडय़ा फार फरकाने हे असेच प्रसंग घडत असणार!
पण या सर्व प्रश्नांचा थोडा सखोल विचार केला, तर खरंच कुणालाही आश्चर्य वाटावं आणि काळजी वाटावी असंच दातांच्या आजारांचं स्वरूप झाल्याचं लक्षात येईल. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की हे गांभीर्य, दातांचे आजार होईपर्यंत जाणवत नाही. अनेक दात किडल्यानंतर, अगदी असह्य़ ठणका सुरू झाल्यानंतर, चेहऱ्याला मोठी सूज आल्यानंतर किंवा दात हलायला लागल्यानंतरच बहुतेक जण जागे होतात.
आज खरोखरच ८० ते ९० टक्के लोकांचे दात किडलेले आढळतात. शाळा-शाळांतून केल्या जाणाऱ्या तपासणीतही लहान मुलांच्या दाताच्या बाबतीत हेच प्रमाण आढळते. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दात खराब होण्याची, किडण्याची काय कारणे असावीत, असा प्रश्न सर्वानाच सतावत राहतो.
खरं तर दात निरोगी ठेवण्यासाठी एक खूप सोपा असा ‘सुवर्ण नियम’ आहे. तो म्हणजे – रोज सकाळी झोपून उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी ब्रश-पेस्टने दात घासवेत आणि दिवसभरात काहीही खाल्ल्यावर भरपूर पाण्याने खळखळून स्वच्छ चुळा भराव्यात. या सवयी नियमितपणे पाळल्या आणि योग्य प्रकारचा आहार घेतला तर दात नक्की निरोगी राहतील!
पण अशा प्रकारे दातांची काळजी घ्यायला पाहिजे हीच गोष्ट अनेकांना माहीत नसते. दातांची योग्य निगा राखण्याचे अज्ञान किंवा अपुरे ज्ञान हे दात खराब होण्यामागचे एक मोठे कारण म्हणता येईल. त्याचप्रमाणे दातांविषयी, दातांवरील इलाजाविषयी असलेले गैरसमज आणि मनात दडलेली काल्पनिक-खोटी भीती हे देखील आणखी एक कारण आहे. या भीतीपोटीच बरेच जण दाढदुखी सहन करतात, पण योग्य वेळेत इलाज करून घ्यायला टाळाटाळ करतात.
आजकाल खूप जास्त प्रमाणात दात खराब होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आजच्या बदललेल्या खाण्या-पिण्याच्या सवयी. पूर्वी आपल्या आहारात जाडय़ा- भरडय़ा, कच्च्या आणि नैसर्गिक स्वरूपाच्या अन्नपदार्थाचा समावेश असे. शेतातून – मळ्यातून येणाऱ्या ताज्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, कुरकुरीत, टणक आणि धागेदार फळे आणि गाजर, काकडी, बोरे, कैरी, करवंदे, ऊस, मक्याची कणसे अशा रानमेव्याचाही समावेश अधिक असे.
कच्ची फळे, भाज्या, पालेभाज्या खाताना दातांच्या तोडणे, फाडणे, चघळणे, चावणे, भुगा करणे, फोडणे अशा विविध प्रकारच्या कणखर हालचाली होतात. शिवाय अशा कडक आणि धागेदार अन्नपदार्थाचे दाताच्या पृष्ठभागाशी घर्षण होऊन दात आपोआपच घासले जातात, स्वच्छ होतात. दातावर – दाढांवर अन्नाचे मऊ, चिकट कण शिल्लक राहात नाहीत आणि परिणामी दात किडण्याचे प्रमाण कमी होत जाते.
हल्ली मिक्सर – ग्राइंडर – कुकरसारख्या उपकरणांचा वापर करून तयार केलेले अन्नपदार्थ खूप मऊ असतात. इतके, की कित्येकदा असे पदार्थ खायला दातांची गरजही भासत नाही.
बदललेल्या आहार संस्कृतीत ‘जंक फूड’चा वाटा खूपच मोठा आहे. ‘विकिपिडिया’वर जंक फूडचे नेमके वर्णन केले आहे. मायकेल जेकबसन याने १९७२ मध्ये सर्वात प्रथम जंक फूड ही संज्ञा वापरली. ‘ज्या अन्नामध्ये खूप कमी पोषणमूल्ये असतात, आणि ज्यात चरबी, साखर व मीठ यांचे प्रमाण अधिक असते, म्हणजे प्रोटीन्स, जीवनसत्त्वे, खनिजपदार्थ खूप कमी प्रमाणात आणि कॅलरीज खूप अधिक प्रमाणात असतात, अशा अन्नाला जंक फूड म्हटले जाते. जंक फूड मध्ये अतिशुद्ध, प्रक्रियायुक्त पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे दात किडण्याला चांगलीच संधी मिळते. शिवाय चरबी, साखर आणि मिठाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे संपूर्ण आरोग्यांवरही जंक फूडचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पॅकबंद वेफर्स-चिप्स, अति तळलेले, नमकीन, चटपटीत फ्रेंच फ्राइज, मैदायुक्त बेकरी प्रॉडक्ट्स-केक, पेस्ट्रीज, पिझ्झा सारखे चिकट-चिवट पदार्थ, कँडी, सॉफ्टी सारखी डेझट्र्स आणि भरपूर साखरयुक्त शीतपेये इत्यादी पदार्थाचा जंक फूडमध्ये समावेश होतो. हे पदार्थ इतके खमंग, खुसखुशीत व स्वादिष्ट असतात, की ते केव्हा व्यक्तीच्या संपूर्ण आहाराचाच कब्जा घेतात आणि आपण केव्हा या पदार्थाच्या आहारी गेलो हे कळत नाही. हळूहळू जंक फूड – फास्ट फूड आणि सॉफ्ट ड्रिंक्स् यांचे आहारातील प्रमाण आणि खाण्याचे प्रसंग वाढत जातात आणि शरीराला आवश्यक चौरस आहार मिळेनासा होतो. मात्र जंक फूड मधील पदार्थाचा आपल्या चौरस आहारात रुचिपालट म्हणून चतुराईने आणि थोडय़ाच प्रमाणात समावेश केल्यास त्याचे फारसे दुष्परिणाम होणार नाहीत. जंक फूड मधील अतिशुद्ध, प्रक्रियायुक्त पिष्टमय पदार्थ जे खूप मऊ, चिकट आणि पिठूळ स्वरूपाचे असतात, ते दाढांच्या खडबडीत पृष्ठभागांवर किंवा दोन दाढांमध्ये चिकटून बसतात. वेळीच हे अन्नकण ब्रशने घासून वा चुळा भरून काढले गेले नाहीत, तर दात-दाढा किडण्याला आयतेच आमंत्रण मिळते. पण केवळ पाश्चात्य पद्धतीच्या अशा अन्नामुळेच दात खराब होतात असे म्हटले, तर ते खूपच एकांगी विधान होईल.
कोणताही मऊ, चिकट, अतिगोड, पिष्टमय पदार्थयुक्त आहार दात किडवण्याला कारणीभूत ठरतो हा महत्त्वाचा नियम लक्षात घेतला, तर आपल्या खास भारतीय मानल्या गेलेल्या आहारातील, अनेक अतिमऊ, पिठूळ, अतिगोड आणि चिकट अशा स्वरूपाच्या पिष्टमय पदार्थानीही दात किडू शकतात, हे सहज लक्षात येईल! उदाहरणार्थ पेढा, बर्फी, लाडू, नानकटाई, चिक्की, शिरा, पोहे, फरसाण, फाफडा, पापड इत्यादी. अशा खाद्यपदार्थाचा भुगा आणि बारीक-बारीक कण दातात, दाढांच्या पृष्ठभागावर, सांदीफटींत अडकून बसतात. ते वेळीच काढले गेले नाहीत, तर दात नक्कीच किडू शकतात.
प्रयोगादाखल ‘जंक फूड’मधील चिप्स वा फ्रेंच फ्राईज किंवा केक वा एखादे चॉकलेट किंवा भारतीय आहारातील पेढा, बर्फीचा तुकडा अथवा पापड किंवा पापडाची लाटी खाऊन पाहा. दोन्ही प्रकारच्या आहारातील अन्नपदार्थाचा थर दाढांच्या पृष्ठभागावर चिकटून राहिलेला आपल्याला आढळेल. आता प्रयोगातला दुसरा भाग. दाढांवर अन्नाचे कण चिकटलेले आढळल्यानंतर एखादे सफरचंद किंवा गाजर, मुळ्याचा तुकडा, खोबऱ्याचा तुकडा खाऊन पाहा. असे लक्षात येईल, की दाढांवर जमा झालेला मऊ-मऊ, चिकट, पिठुळ असा अन्नाचा थर नाहीसा झाला आहे आणि दाढा स्वच्छ झाल्या आहेत.(क्रमश:)

loksatta analysis elon musk visits china to deals self driving
एलॉन मस्क यांच्या चीन दौऱ्याच्या केंद्रस्थानी सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर… काय आहे ही प्रणाली? टेस्लासाठी चीन इतका महत्त्वाचा का?
Viral Video
Viral Video : पोलिस अधिकाऱ्याने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी घायाळ, व्हायरल होतोय व्हिडीओ
portfolio Demat accounts New investors stock market
बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….
ifs officer parveen kaswan shares video of forester extinguishing terrible forest fire goes viral
जंगलात लागली भयानक आग, झाडे झाली जळून खाक! आग शमविताना झाली वनकर्मचाऱ्यांची दमछाक, पाहा थरारक Video