हल्ली व्यक्तींची कामाची ठिकाणे घरापासून खूप लांब अंतरावर असतात. अर्थातच दुचाकीवरील दररोजची किमान ५० ते १०० कि.मी.ची सक्तीची सफर अनेकांना चुकत नाही! त्यातच सध्या पावसामुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खड्डे..म्हणजे पाठ खिळखिळीच होण्याची लक्षणे!  सततच्या प्रवासाव्यतिरिक्त डेस्क जॉब आणि नियमित व्यायामाचा अभाव हीदेखील मणक्यांसाठी संकटेच आहेत. यावर उपाय एकच- पाठीच्या कण्याची काळजी आणि निगा अगदी तरुण वयापासूनच ठेवणे. तसे केले तरच उतार वयात होणाऱ्या मणक्यांच्या आजारावर प्रतिबंध घालता येईल.

मणक्यामध्ये गॅप निर्माण झाली आहे, चकती सरकली आहे, गादीची झीज होऊन नस दबली आहे, असे संवाद मध्यमवयीन शहरी मंडळींमध्ये नेहमी ऐकायला मिळतात. मणक्याच्या व्याधींची लक्षणे आणि अनुभव लोकांच्याच शब्दात मांडायचे म्हटले तर –
औषध चालू आहे तोपर्यंत ठीक, नंतर पुन्हा कंबर आणि पायातील दुखणं सुरू होतं. चालायला जातो, परंतु पहिल्यासारखं भरभर चालता येत नाही, पायात अशक्तपणा जाणवतो.
दहा वर्षांपासून पाठीचं दुखणं आहे. मध्ये सात-आठ महिने एकदम ‘ओ.के.’ असतो. आता पुन्हा पायात सारख्या मुंग्या आणि जडपणा आहे.     
उभी राहून स्वयंपाक करते, पण पाठीत अजिबात वाकता येत नाही, डाव्या पायातली कळ सगळं काही अशक्य करून सोडते.
आम्ही दोघे संध्याकाळी फिरायला जातो. दर १५ ते २० मिनिटांनंतर ‘ह्य़ां’ना थांबावं लागतं, पाय भरून येतात, पायात गोळे येतात, थोडय़ा विश्रांतीनंतर परत चालायचं असं सध्या चालू आहे.
उजव्या पायात कळ यायची, डॉक्टरांनी ‘डिस्क प्रोलॅप्स’चं ऑपरेशन करून घ्यायचा सल्ला दिला. भीतिपोटी ऑपरेशन केले नाही, हळूहळू पायातली कळ कमी झाली, पण आता पायाचा पंजा निकामी झाला. ‘फूटड्रॉप’ झाल्यावर ऑपरेशन करून फायदा नाही असं सर्वजण सांगतात, पायाला ‘स्प्लींट’ लावून कसबसं चाललंय.
परवा जड बोजा उचलताना पाठ लचकली आणि पायात शॉकसारखी कळ आली. पडून असतो तोवर ठीक, बसलो किंवा चाललो की दुखणं पूर्ववत सुरू. ऑपरेशन हा एकच मार्ग आहे, पण ऑपरेशननंतर पाय जातील अशी भीती वाटते. धाडस होत नाही.
तीन महिन्यांपूर्वीच पाठीच्या कण्याचे ऑपरेशन सुरळीत पार पडले. दुखणं पूर्ण गेलं. पहिल्यासारखं सर्व काम, धावपळ करतो.
मणक्याचे ऑपरेशन टाळता येते, फिजिओथेरपी वर्क्‍स!
मणक्याच्या भिन्न व्याधी आणि लोकांची त्याबद्दलची ही वर्णनं! प्रत्येक रुग्णाबाबतचे डॉक्टरांचे निदान वेगळे, सल्लाही वेगळा. हे चित्र पाहता नव्या रुग्णाच्या मनात गोंधळच उडण्याची शक्यता अधिक! हल्ली दोन किंवा तीन डॉक्टरांची ‘सेकंड ओपिनियन’ घेतलेले तरुण सर्जनच्या पुढय़ात सी. टी. स्कॅन, एमआरआयचे रिपोर्ट्स आणून टाकतात आणि मला माझी बॅक (पाठ) ‘फिक्स’ करून हवी आहे, अशी मागणी करतात!
पाठीचा कणा मनुष्याला इतर प्राण्यांच्या तुलनेत वेगळी खडी (उभी) प्रतिमा देतो. वर मानेपासून खाली माकडहाडापर्यंत नैसर्गिक बाक असलेला बांबूसदृश कणा तेहतीस मणक्यांनी गुंफलेला आहे. एकमेकांतील सांध्यांमुळे त्याला वाकण्याची सुविधा प्राप्त झालेली आहे. कण्याच्या भोवताली असलेले स्नायू त्याचा भक्कमपणा वाढवतात आणि त्याची हालचाल घडवतात. दोन मणक्यांमधील गादी (डिस्क) लवचिक आणि चिवट असून ती झटका किंवा दाब शोषण्याचे म्हणजे ‘शॉक अ‍ॅबसॉर्ब’ करण्याचे काम करते. मणका कॅल्शियमचा टणक, कडक ठोकळा असतो. यातल्या दोन ठोकळ्यांमधील गादी दबाव सहन करत हालचालीला वाव देते.
अशा मजबूत पाठीच्या कण्यामध्ये मज्जारज्जू आणि मज्जातंतू या अतिशय नाजूक असलेल्या चेतासंस्थेच्या घटकांचे वास्तव्य असते. अर्थातच त्यांना पूर्णपणे सुरक्षितता लाभलेली असते. मेंदूतल्या चेतापेशींमधून निघालेले चेतातंतू एखाद्या घोडय़ाच्या शेपटीसारखे पाठीच्या कण्यातून जाऊन पुढे थेट वेगवेगळ्या स्नायूंकडे, अवयवांकडे व त्वचेकडे पोहोचतात. हाता-पायाच्या स्नायूंची हालचाल घडवण्यासाठी मज्जातंतू मणक्यातून निघून संपूर्ण शरीरात मेंदूकडून येणारी चेतना वाहून नेतात. मणक्यातील गादी किंवा चकती आणि मणक्याबाहेर येणारे मज्जातंतू यांची  नैसर्गिक ठेवण अशी असते की गादीमध्ये उत्पन्न होणारे दोष नसांवर (नव्‍‌र्ह) दबाव आणू शकतात. नसेवरचा दबाव पायातील दुखणं, जळजळ, पक्षाघात, कळ मारणं अशा गोष्टींना कारणीभूत ठरू शकतो. चाळिशीनंतर पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होऊ लागते, परिणामी उठबस करणे, वाकणे या हालचाली संथ होतात. याबरोबरच स्नायूंची ताकद व आकारमानही कमी होऊन मणक्यावर येणारा ताण वाढतो व त्याची झीज सुरू होते.
सायाटिका, स्पाँडिलोसिस असे शास्त्रीय शब्द सध्या बऱ्यापैकी प्रचलित आहेत. पण बऱ्याच वेळा त्यांचा वापर चुकीच्या संदर्भात केला जातो.
मणक्यातील गादीची झीज व तत्सम आजार साधारणत: मध्यमवयीन व वृद्ध लोकांमध्ये आढळतात. तसेच तरुण वयोगटातील उंच व्यक्तींमध्येही हे आजार प्रकर्षांने आढळतात. बैठे काम, पाठीत बाक काढून बसणे, न पेलणारे वजन उचलणे किंवा सरकविणे, अपघातामध्ये मणक्याला होणारी इजा अशी या आजाराची काही ठळक कारणे आहेत. मांडीच्या व पोटरीच्या बाहेरील बाजूस विद्युतलहरी गेल्यासारखी कळ येणे, चालण्यामुळे व उभे राहिल्यामुळे त्याची तीव्रता वाढणे, आराम किंवा निजलेल्या स्थितीत वेदना शमणे ही लक्षणं म्हणजे ‘नसेचं ओरडणं’ असं म्हटलं जातं.
कमरेतील (लंबार) चौथ्या व पाचव्या मणक्यातील चकतीवर येणारा भार सर्वाधिक असल्यामुळे संबंधित ‘लंबार पाच’ व ‘सेक्रल एक’ या नसा लवकर खराब होतात. पायाच्या पंजाची ताकद कमी होणे, पायातील स्पर्शज्ञान कमी होणे, नसांवरील असह्य़ दबावामुळे लघवीचे नियंत्रण जाणे, असे याचे काही भयप्रद परिणामही प्रसंगी दिसून येऊ शकतात.
एमआरआय चाचणीत मणक्याच्या आजाराचे अचूक निदान करणे शक्य होते. काही वेळा एकापेक्षा जास्त चकत्या खराब झालेल्या असतात. काही रुग्णांना दुखणे जास्त असते पण त्यांच्या एमआरआयमध्ये सगळे काही व्यवस्थित असल्याचे दिसत असते. तर काही लोकांमध्ये उलट परिस्थिती असते. रुग्णाची लक्षणे व एमआरआयमध्ये दिसणारे बारकावे हे किती मिळते जुळते आहेत यावर पुढील उपचारांसंबंधी निर्णय घेता येतो.
चकतीची वयोमानानुसार होणारी झीज व नसेवर आलेला दबाव हलक्या प्रमाणात असल्यास रुग्णाला विश्रांतीची गरज असते. दुखणे असताना कोणताही व्यायाम करू नये. पाठीच्या मणक्यासभोवतीच्या स्नायूंना मजबूत ठेवणारे व्यायाम चाळिशीनंतर सगळ्यांनीच करावे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पाठीचे कमजोर स्नायू दुखण्यासंबंधीच्या आजारांना आमंत्रण देतात.
सध्या अशा प्रकारच्या दुखण्यांवर लेझर, ओझोन थेरपी, डिस्कमध्ये इंजेक्शन, मायक्रोडिस्केक्टॉमी, कृत्रिम चकती रोपण, मणक्याचे व्यायाम आदी आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. कण्यामध्ये स्क्रू व प्लेट लावून कणा अधिक भक्कम करण्याची गरजही काही रुग्णांत भासते. एंडोस्कोपी म्हणजे दुर्बिणीमार्फत केलेली शस्त्रक्रिया, यामध्ये छोटा छेद घेऊन ऑपरेशन केले जाते. कोणाला कुठले ऑपरेशन करायचे किंवा उपचारपद्धती वापरायची याचा निर्णय तज्ज्ञांमार्फतच घेणे उत्तम. कारण एका रुग्णाला ज्या उपचारांनी बरे वाटते तेच दुसऱ्या रुग्णास लागू पडतील असे नाही.
 मणक्याचे किंवा नसेसंबंधित ऑपरेशन म्हटले की अनेक प्रश्न उपस्थित होतात. ऑपरेशनची खरंच गरज आहे का, गोळ्या, औषधांनी बरे होणार नाही का, शस्त्रक्रियेमध्ये काय धोका आहे, पाय राहतील ना जागेवर! , जीवाला धोका किती आहे, जखम चिघळणे, इन्फेक्शनचे प्रमाण किती, भविष्यात धावपळ, दुचाकी चालवणे, व्यायाम शक्य आहे का, दुखणं पूर्ण जाईल का.. असे एक ना अनेक प्रश्न!  पण हल्ली या शस्त्रक्रिया खूप सुरक्षित झाल्या आहेत. दवाखान्यात ३ ते ४ दिवसांचा मुक्काम, पाठीच्या / कमरेच्या मध्यभागी ४ ते ५ टाक्यांचे ऑपरेशन, त्याच दिवशी उभे राहून चालणे, सर्व ठीक असल्यास तिसऱ्या दिवशी घरीदेखील सोडले जाते. सर्वसाधारणपणे दहाव्या दिवशी टाके काढले जातात. शक्य झाल्यास बिनटाक्याच्या पद्धतीने ऑपरेशन केले जाते. अर्थातच पाठीचा ‘मेंटेनन्स’ हाच आपला पहिला ‘ऑप्शन’ असावा! पाठीच्या कण्याची निगा तरूणपणीच व्यवस्थित राखल्यास भावी आयुष्यात शस्त्रक्रिया टाळणे नक्कीच शक्य होईल.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल