ब्रिटनमध्ये एक व्यक्ती हृदयाविना दोन वर्षे बाह्य़ रक्तपंपाच्या मदतीने जिवंत राहिली. मॅथ्यू ग्रीन या विवाहित औषध सल्लागाराचीच ही कहाणी आहे. हृदयाविना जगणाऱ्या मॅथ्यूला अलिकडेच म्हणजे दोन महिन्यांपूर्वी दात्याचे हृदय मिळाले आहे.मॅथ्यूचे हृदय रोगग्रस्त झाल्याने काढून टाकण्यात आले आहे. तो दोन वर्षे बाहेरून रक्ताचे पंपिंग करण्यामुळे जगू शकला. केंब्रिजशायर येथे त्याच्यावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. लवकरच तो घरी परत जाईल असे डॉक्टरांनी सांगितले. आपण खूप नशीबवान आहोत, हृदय प्रत्यारोपणाने जणू काही तिसरा जन्मच लाभला आहे, अशी भावना मॅथ्यू याने व्यक्त केली. जुलै २०११ मध्ये त्यांच्या ह्रदयाचे दोन कप्पे निकामी झाले होते. त्याला ‘कार्डियोमायोपथी’ असे म्हणतात; यात हृदयाचे नियंत्रण करणाऱ्या विद्युत लहरींची लय बिघडते. पॅपवर्थ रूग्णालयात त्याचे हृदयच काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या रक्तवाहिन्या बाह्य़ पंपाला जोडून रक्ताचा प्रवाह सुरळित ठेवला होता. नंतर एक पंप ट्रॉलीवर ठेवून त्याचे हृदय चालवण्यात आले, त्यामुळे तो तीन तास घराबाहेर जाऊ शकत होता, पण अशा पंपावर अवलंबून राहता येणार नव्हते. मॅथ्यू हा ६ फूट ३ इंच उंचीचा असल्याने त्याला दाताही तशाच मजबूत हृदयाचा हवा होता. शेवटी गेल्या महिन्यात त्याचे नशीब उजळले व हवा तसा हृदयदाता मिळाला.
कर्करोगाचे नियंत्रण शक्य
एका जनुकाचे कार्य नियंत्रित करून स्तनाचा कर्करोग नियंत्रित करता येऊ शकेल असे एका संशोधनात दिसून आले आहे. द स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूजर्सी या संस्थेच्या रॉबर्ट वूड जॉन्सन मेडिकल स्कूलचे जैवरसायनशास्त्र व रेणवीय जीवशास्त्राचे प्रा. किरण छड्डा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हे संशोधन केले आहे. एचजीएमए २ या जनुकाचे कार्य नियंत्रणाखाली आणले तर स्तनाच्या कर्करोगाची जोखीम कमी होते असे दिसून आले. हा जनुक कर्करोगाच्या शरीरांतर्गत प्रसाराचे नियंत्रण करीत असतो, त्यामुळे त्याचे कार्य रोखणारी औषधे शोधून काढता येतील असे छड्डा यांचे म्हणणे आहे. निरोगी पेशीत एचएमजीए २ हा जनुक आविष्कृत होत नाही, त्याने कार्य सुरू केले तर निरोगी पेशी या मेटॅस्टॅटिक पेशी बनतात. कर्करोगाच्या गाठीच्या कडेच्या भागात या पेशी जास्त प्रमाणात सापडतात. उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगात असे दिसले की, ज्या उंदरात एचएमजीए २ हा जनुक कार्यान्वित नसतो त्यांच्यात स्तनाच्या कर्करोगाची शक्यता कमी असते. कॅन्सर रीसर्च या अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रीसर्च या संस्थेच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
जनुकांचे आविष्करण चालू-बंद करण्याचे तंत्र विकसित
पेशींवर प्रकाश टाकून जनुके चालू-बंद करण्याचे नवीन तंत्र वैज्ञानिकांनी विकसित केले असून त्यामुळे प्रत्येक जनुकाची शरीरातील नेमकी भूमिका समजणे सोपे जाणार आहे. मानवी शरीरातील पेशीत वीस हजार जनुके असली तरी प्रत्यक्षात त्यातील काही पेशींच्या गरजेनुसार जनुकेच एकावेळी कार्यान्वित असतात, त्यांच्यात एक मिनिट ते तासभराच्या अंतराने फरक होतो. ही जनुके नेमकी कशाकशाशी संबंधित आहेत हे शोधून काढणे हे आव्हानात्मक काम होते. आता त्यांचे चालू-बंद करण्यासाठी प्रकाशाचा वापर आपल्या आवश्यकतेनुसार करता येणार असल्याने त्यांची भूमिका तपासण्यात मोठी मदत होणार आहे. नवीन तंत्रज्ञान  मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व ब्रॉड इन्स्टिटय़ूट या संस्थेने विकसित केले आहे. त्यात कुठल्याही जनुकाचे आविष्करण हे पेशींवर प्रकाश टाकून चालू-बंद करता येणार आहे. ऑप्टोजेनेटिक्स या शाखेवर आधारित असे हे तंत्र असून त्यात प्रथिने प्रकाशाला प्रतिसाद देताना त्यांचे कार्य बदलतात. विशिष्ट लक्ष्य असलेला जनुक चालू किंवा बंद करण्यासाठी त्याचा वापर करता येतो. पेशींमध्ये जनुकांचे आविष्करण हे फार क्रियाशील असते व अतिशय कमी काळात ते घडून येते. आतापर्यंत त्याची पुनरावृत्ती करणे शक्य झाले नव्हते असे एमआयटीचे विद्यार्थी सिल्वाना कोनेरमन यांनी सांगितले. त्यामुळे जनुकीय आविष्करणाच्या नैसर्गिक वेगाची नक्कल करणे आवश्यक आहे असे कोनेरमन यांनी सांगितले. प्रत्येक जनुकाची नेमकी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आविष्करणाची नेमकी वेळ व कालावधी यांचे नियंत्रण जमणे गरजेचे आहे. एपिजेनेटिक पातळीवर जनुकांमध्ये होणारे बदल, प्रथिनांच्या रसायनांमध्ये होणारे बदल हे स्मृती व अध्ययन क्षमतेत मोठी भूमिका पार पाडत असतात. हार्वर्डच्या कोनेरमन व मार्क ब्रिगहॅम यांचे हे संशोधन नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
मलेरियाचा मुकाबला
ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी मलेरियास कारण ठरणारे परोपजीवी जंतू बी १ जीवनसत्त्वाचा वापर करून त्यांची संख्या वाढवू शकणार नाहीत अशा प्रकारचे औषध तयार केले आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे केविन सालिबा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह केलेले हे संशोधन नेचर कम्युनिकेशन या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. माणसाप्रमाणेच मलेरियाच्या परोपजीवी जंतूंना संख्या वाढवण्यासाठी बी १ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते थियामीन म्हणजे बी-१ जीवनसत्त्व पेशींमध्ये एका विशिष्ट पदार्थात रूपांतरित केले जाते व नंतर ते अनेक वितंचकांना चिकटून ऊर्जेची निर्मिती होते. सालिबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी थियामीनच्या चयापचयाचे मार्ग बंद करण्याची युक्ती शोधून काढली आहे. परोपजीवी जंतू ज्या मार्गाने हे बी १ जीवनसत्त्व मिळवतात त्या मार्गानाच लक्ष्य करण्याची व्यवस्था या नवीन औषधात केलेली आहे. त्यांनी या औषधात प्रोब ड्रगचा वापर केला आहे ते थियामाइन आहे असे वाटते पण त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करता येत नाही. यात परोपजीवी जंतू या औषधाला बी-१ म्हणजे थियामाइन जीवनसत्त्व समजतात. त्यातून कोफॅक्टर हा एक घटक तयार होतो तो वितंचकांना चिकटतो पण ऊर्जा निर्मिती मात्र होत नाही. त्यामुळे परोपजीवी जंतू या सापळ्यात पूर्णपणे फसतात. यात धोका असा की, मानवी शरीरात जर या तत्त्वावर आधारित औषध सोडले तर मानवी पेशीही फसतील व त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, त्यासाठी मानवी शरीरातील थियामाईन व परोपजीवी जंतूंमधील थियामाइन यांच्यातील बारीक भेदांचा वापर करून घ्यावा लागणार आहे. सध्या मलेरियाच्या विरोधात जी औषधे आहेत त्याच्या विरोधात परोपजीवी जंतूंमध्ये प्रतिकाराची ताकद निर्माण झाली आहे त्यामुळे नवीन औषधे शोधणे गरजेचे आहे. जगातील ३.३ अब्ज लोकांना मलेरियाचा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.