पाऊस म्हणजे मजा हे जसे समीकरण आहे, तसेच पावसाळ्यात दूषित पाणी आणि त्यापासून बनवलेले दूषित अन्न पोटात गेल्यामुळे होणारे आजार यांचेही नाते आहे. पोट बिघडण्याची  वेगवेगळी लक्षणे आहेत. दूषित पाण्यामुळे जुलाब होण्यासारखे आजार झाल्यावर काय करावे, या आजारांना प्रतिबंध कसा करावा ते पाहूया-
दूषित पाणी आणि आजार मैलापाणी पाण्यात मिसळलेले दूषित पाणी प्यायले जाणे किंवा असे दूषित अन्न खाणे अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते. यातला लगेच होणारा आजार म्हणजे हगवण. ही हगवण ‘अमिबिक’- म्हणजे अमिबिया या सूक्ष्मजीवांमुळे होऊ शकते किंवा जंतूंमुळेही (बॅसिलरी) होऊ शकते.
याची लक्षणे सौम्य किंवा तीव्र अशी दोन्ही स्वरुपाची असू शकतात. सौम्य स्वरुपात पोट दुखते, एखादी उलटी होते, थोडे जुलाब होतात. काही जणांमध्ये त्याचे रुपांतर ‘गॅस्ट्रोएंटेरायटिस’ मध्ये होते आणि त्यातही उलटय़ा आणि जुलाब होतात. काही जणांना जुलाबांमधून आव पडते आणि रक्तस्त्रावही होऊ शकतो. आजाराची तीव्रता वाढली तर पुन:पुन्हा जुलाब होणे किंवा त्यातून सतत रक्त जाणे, अशी लक्षणे दिसू शकतात. शरीरातील पाणीदेखील कमी होते (डीहायड्रेशन). मूत्रपिंडावर विपरित परिणाम होण्यापर्यंत या आजाराची मजल जाऊ शकते.
कॉलरा आपल्याकडे फारसा दिसत नसला तरी काही जणांना दूषित पाण्यातून त्याची लागण होतेच. टायफॉईडचा ताप आणि ‘ए’ आणि ‘ई’ अशा दोन
प्रकारचे हिपेटायटिस (कावीळ) हे देखील दूषित पाण्यातूनच येणारे आजार.

पोट बिघडवणारा ‘ई-कोलाय’
दूषित पाणी आणि ‘ई-कोलाय’ या जीवाणूचे नातेच आहे. उघडय़ावरच्या अन्न आणि पाण्यात हा जीवाणू हटकून सापडतो. ई-कोलाय पोटात जाऊन विषारी द्रव्यांचे स्त्रवण करतात. जीवाणू तयार करत असलेल्या विषारी द्रव्यांचे प्रमाण आणि त्यांचा परिणाम यावर होणाऱ्या त्रासाची तीव्रता ठरते. ई-कोलायमुळे होणारी हगवण तीव्र रूप धारण करू शकते. वारंवार जुलाब होणे, आतडय़ातून रक्तस्त्राव होणे, आतडय़ाला जखमा (अल्सर) होणे असे त्रास होण्याची शक्यता असते. आजार वाढल्यामुळे डीहायड्रेशन आणि मूत्रपिंड खराब होणे या गोष्टी उद्भवण्याची शक्यता असून गंभीर लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना तातडीच्या रुग्णालयीन उपचारांची आवश्यकता भासते.
डॉ. संजीव कोलते, गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

पोट बिघडल्यावर
* पोट बिघडल्यावर जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होते. आजार सौम्य असताना डीहायड्रेशन होऊ नये यासाठी काही गोष्टी करता येतील. जुलाब होणाऱ्या व्यक्तीने ‘ओआरएस’ पावडर (ओरल रीहायड्रेशन सोल्युशन) किंवा मीठ, साखर घातलेले पाणी दर तासाला एक ग्लास तरी घ्यावे.
* खाण्याच्या पदार्थाना किंवा पिण्याच्या पाण्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. ही गोष्ट फार किरकोळ वाटू शकेल, पण हात स्वच्छ ठेवल्यामुळे पोट बिघडण्यासारख्या आजारांना प्रतिबंध करता येतो.
* जुलाब झालेल्या व्यक्तीने ‘सारक’ अन्न टाळावे. पालेभाज्या, कच्च्या भाज्या, कच्ची फळे या काळात टाळावीत. त्याऐवजी जुलाब वाढू नयेत यासाठी मदत करणारे अन्न घ्यावे. भात आणि मूग पचायला सोपा असतो. त्यामुळे मूगडाळ आणि तांदळाची खिचडी चांगली.
* जुलाब झालेल्या व्यक्तीसाठी गर असलेल्या भाज्या चांगल्या. बटाटा, दुधी भोपळा, सुरण, रताळी शिजवून घ्याव्यात. तसेच जास्त पिकलेली गरयुक्त फळे चांगली. केळी, चिकू, वाफवलेले सफरचंद चांगले.
* मसालेदार, कच्चे, तळलेले अन्न टाळावे
* आंबट दही-ताकापेक्षा अदमुरे दही आणि अशा दह्य़ाचे ताक घ्यावे.
* डीहायड्रेशन टाळण्यासाठी नारळाचे पाणी, लिंबू सरबत ही पेये देखील मदत करतात. फळांचे रस घ्यायचे असतील तरी ते स्वच्छ पद्धतीने तयार केलेले आणि गाळलेले हवेत. ज्यूसमध्ये अधिक चोथा असेल तर ते सारक ठरतात.
* भाजलेला (टोस्ट केलेला) ब्रेड खाता येईल.
* भाज्यांचे ‘क्लिअर सूप’ देखील जुलाब होत असताना घेता येईल. पालेभाज्या सारक असल्यामुळे त्या टाळण्यास सांगितले असले तरी पालेभाज्यांचा अर्क असलेले असलेले क्लिअर सूप पिता येईल.
* या प्रकारचा आहार घेतल्यास जुलाब वाढण्यास अटकाव होऊ शकेल आणि दुसरीकडे शरीराला आवश्यक असणारे पोषक पदार्थ मिळत राहतील.
* साधारणत: ८ ते १२ तासांत तब्येतीत काही सुधारणा दिसत नसेल तर डॉक्टरांना गाठावे. आजार वाढत असला तर एवढा वेळ देखील वाट पाहू नये, त्वरित डॉक्टरांकडे द्यावे.
* स्वत:च्या मनाने औषधे घेणे टाळावे, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते घ्यावे.
* जुलाब थांबतच नसले किंवा उलटय़ा सुरू झाल्या की डॉक्टरांचीच मदत घेतलेली बरी. उलटय़ा होत असतील तर आहार, पाणी, औषधे काहीच पोटात ठरत नाही. त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आहे.
डॉ. चंद्रशेखर फणसळकर, फिजिशियन

आजारांच्या प्रतिबंधासाठी-
* पावसाळा आणि रस्त्यावरचे चमचमीत खाणे हे समीकरणच आहे. भजी, वडापाव, भेळ, पाणीपुरी, चाट या गोष्टी खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही, पण हे पदार्थ दूषित असतील तर ते आजारांना निमंत्रणच देतात. त्यामुळे शक्यतो बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. घरच्या घरी आपण अधुनमधून का होईना, पण आरोग्यदायी पद्धतीने हे पदार्थ नक्कीच करु शकतो.
* बाहेरचे पाणी पिणे आणि बर्फ टाकलेली पेये पिणे टाळाच. बाहेर गेल्यावर शक्यतो सीलबंद शुद्ध पाणी पिण्यास प्राधान्य द्या, किंवा उकळलेले, गाळलेले पाणी बरोबर बाळगा. बाहेरची उघडय़ावरची सरबते, ज्यूस, ताक, लिंबू सरबत शक्यतो नकोच.
* आधी सोलून किंवा चिरुन उघडय़ावर ठेवलेल्या भाज्या किंवा फळे खाणे टाळा. कोबी, पालक, मेथी यांसारख्या भाज्यांना लागलेल्या मातीतल्या जंतूंमुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा या भाज्या धुवून घेण्याची काळजी घ्या. या मोसमात पेर, पीच, पपया, केळी ही फळे चांगली मिळू लागतात. फळेही खाण्यापूर्वी नीट धुवून घ्या.
डॉ. मंजुषा अगरवाल, फिजिशियन
(शब्दांकन- संपदा सोवनी)