आयपीएलमध्ये अनेकदा गोलंदाजांना एखाद्या षटकात चांगलाच मार पडतो. प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज एखाद्या षटकात गोलंदाजाची अशी काही धुलाई करतो की त्याला पुनरागमन करणं शक्य होत नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात वेस्ट इंडिजच्या शेल्डन कोट्रेलने याचा पुरेपूर अनुभव घेतला. सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगला मारा करणाऱ्या कोट्रेलच्या गोलंदाजीवर राहुल तेवतियाने हल्लाबोल चढवला आणि एकाच षटकात ५ षटकार ठोकले. तेवतियाच्या या खेळीमुळे राजस्थानने सामन्यात पुनरागमन करत बाजी मारली.

तेवतियाच्या या खेळीनंतर कोणत्याही गोलंदाजाचा आत्मविश्वास कमी होणं स्वाभाविक आहे. परंतू शेल्डन कोट्रेलने हार न मानता मुंबईविरुद्धच्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोट्रेलने पंजाबकडून डावाची सुरुवात केली. सलामीला फलंदाजी करणाऱ्या क्विंटन डी-कॉकला कोट्रेलने चांगलंच सतावलं. पाचव्या चेंडूवर कोट्रेलचा चेंडू डी-कॉकला समजलाच नाही आणि तो बोल्ड होऊन माघारी परतला. डी-कॉकचा बळी घेतल्यानंतर कोट्रेलने आपल्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये आनंद साजरा केला.पाहा हा व्हिडीओ…

महत्वाची गोष्ट म्हणजे कोट्रेलने पहिल्या षटकांत एकही धाव न देता मुंबईची महत्वाची विकेट घेतली. यानंतर मैदानावर आलेला सूर्यकुमार यादवही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. परंतू रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

अवश्य वाचा – IPL 2020 : ‘हिटमॅन’ने करुन दाखवलं ! आयपीएलमध्ये ओलांडला ५ हजार धावांचा टप्पा