Dream11 IPL 2020 UAE MI vs KKR : सलामीच्या सामन्यात पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सने आज कोलकाताविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला. २०१४मध्ये युएईत झालेल्या ५ सामन्यांत आणि यंदा चेन्नई विरूद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता पण अखेर मुंबईने युएईत विजयाचं खात उघडलं. रोहित शर्माच्या तडाखेबाज ८० धावांच्या खेळीमुळे आणि मुंबईच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना कोलकातावर ४९ धावांनी विजय मिळवता आला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला.

सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने दमदार कामगिरी केली. रोहित शर्माने IPL 2020 च्या लिलावातील सर्वात महागड्या खेळाडू पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. तसेच कुलदीप यादवला षटकार लगावत रोहित शर्माने IPLकारकिर्दीतील २०० षटकार पूर्ण केले. रोहितने ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५४ चेंडूत ८० धावा कुटल्या. त्याचा सहकारी सूर्य़कुमार यादव याने रोहितचं तोंडभरून कौतुक केलं.

“रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याला मैदानाची मापं पाठ आहेत. तो जेव्हा वानखेडे मैदानावर खेळायला उतरतो तेव्हा तो फलंदाजीचं दडपण घेत नाही. अबुधाबीतही त्याने तसंच केलं. अबुधाबीच्या मैदानावरील सीमारेषा थोड्या लांब आहेत पण रोहितच्या फलंदाजीला त्याचा काही फरक पडला नाही. त्याने जराही दडपण न घेता नैसर्गिक खेळ केला आणि त्याचा परिणाम सगळ्यांच्या समोर आहे”, असे सूर्यकुमार यादव म्हणाला.