20 September 2020

News Flash

प्रवास हा सुखाचा

आयुष्य म्हणजे नुसतं जगणं

मी कुठे आहे व आजपर्यंत माझा मानसिक, बौद्धिक व सांस्कृतिक (किंवा मूल्याधिष्ठित) प्रवास कसा झाला हे पहाणे म्हणजे होलिस्टिक (किंवा समग्र) दृष्टिकोन. त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनाचं ‘मॉडेल’ अभ्यासावं लागेल. आयुष्य म्हणजे नुसतं जगणं, पण जीवन म्हणजे माणूस आणि प्राण्यामधला प्राण्याचा अंश कमीत कमी होऊन माणसाचा अंश जास्तीत जास्त होणे. जीवनाचं होलिस्टिक मॉडेल बनवायचं तर शरीर- मन- बुद्धी- संस्कार (मूल्य) यांचा एकत्रित व समतोल विचार करावं लागेल, त्यातूनच जीवनाचं गीत तयार होऊ शकेल. जीवनाचं सुरेल गीत करण्याचा हा मंत्र सांगणारे हे सदर दर पंधरवडय़ाने.

एकदा भगवान रमण महर्षीकडे एक तरुण आला आणि म्हणाला, ‘‘स्वामी, मला मोक्षाची इच्छा आहे. त्याकरिता कोणत्या मार्गाने जावे हे जाणण्याकरिता मी अधीर झालो आहे. मी खूप ग्रंथ अभ्यासले, अनेक ज्ञानी पंडितांशी संवाद केला, पण प्रत्येक जण वेगळा मार्ग सांगत आहे. माझा गोंधळ उडाला आहे. मी कोणत्या मार्गाने जाऊ?’’ प्रेमळपणे हसत भगवान म्हणाले, ‘‘ठीक आहे, तर मग तू आलास तसाच जा!’’ त्या तरुणाचा चेहरा पडला. काय बोलावं हेच कळेना. भगवान नंतर तिथून गेल्यावर तो इतर लोकांकडे अपेक्षेने पाहू लागला व म्हणाला, ‘‘मी इतक्या लांबून, मोठय़ा आशेने माझ्या प्रश्नाच्या उत्तराकरिता आलो. मला आलास तसा परत जा, असं सांगणं बरोबर आहे का सांगा? मला तर ही चेष्टाच वाटते.’’ तिथल्या एका वृद्धाने त्या तरुणाला सांगितले, ‘‘अरे, तुला अगदी योग्य उपदेश दिला आहे. तुला मोक्ष हवा म्हणजेच तू स्वत:ला बंधनात आहेस असं समजतोस. मग हे बंधन कुठून व कसं आलं, हे शोधून त्या मार्गाने तू तसाच परत गेलास तर मोक्षाकडे जाणार नाहीस का?’’
पारमार्थिक आयुष्याला लागू असलेलं हे उत्तर आपल्या रोजच्या व्यावहारिक आयुष्यालाही उपयोगी पडू शकेल. आयुष्यात आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात. त्यांचं वर्गीकरणही करता येईल. उदाहरणार्थ, आर्थिक प्रश्न, प्रतिष्ठेचा प्रश्न, कौटुंबिक, मुलांसंबंधी, कार्यालय-व्यवसायातले, नातेसंबंधांविषयीचे प्रश्न; पण हे सगळे काळजी किंवा ताण या एका शब्दात येतात. प्रश्न म्हटला की तो सोडवणं आलंच. याचा अर्थ मी प्रश्नाने बांधला गेलेला असतो. त्यातून सोडवणूक करायची म्हणजे ज्याच्यामुळे मी बांधला जातो त्याच्या उलट मार्गाने गेलो तरच सुटू शकेन. एखादा गुन्हा घडल्यावर गुन्हेगार शोधायला पोलिसांकडून हीच पद्धत वापरली जाते.
आता, आलं तसं परत जाणं म्हणजे मी परत लहान बाळ होणं नव्हे. ते केवळ शारीरिक परत जाणं होईल आणि अजून तरी ते शक्य झालेलं नाही. मग परत जायचं म्हणजे काय? तर, सध्या मी कुठे आहे व आजपर्यंत माझा मानसिक, बौद्धिक व सांस्कृतिक (किंवा मूल्याधिष्ठित) प्रवास कसा झाला या मार्गाकडे पाहायला लागेल. याला होलिस्टिक (किंवा समग्र) दृष्टिकोन म्हणता येईल. आपल्याला आपलं जीवनाचं ‘मॉडेल’ अभ्यासावं लागेल. आयुष्य म्हणजे नुसतं जगणं (लिव्हिंग) हे आपलं बायलॉजिकल मॉडेल जे सगळय़ांचं सारखंच असतं अणि हे वैद्यकशास्त्रालाही मान्य आहे; पण जीवन म्हणजे माणूस-प्राण्यामधला प्राण्याचा अंश कमीत कमी होऊन माणसाचा अंश जास्तीत जास्त होणे. हे मॉडेल ज्याचं त्यानंच बनवायचं आहे. नक्कलच करायची असेल तर शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, अब्दुल कलाम यांच्यासारखी इतर किती तरी आणि आपल्या आवडीची ‘मॉडेल्स’ अभ्यासायला हरकत नाही.
जीवनाचं होलिस्टिक मॉडेल बनवायचं तर शरीर- मन- बुद्धी- संस्कार (मूल्य) यांचा एकत्रित व समतोल विचार करावा लागतो, कारण ते एकमेकांना पूरक व एकमेकांवर परिणाम करणारे आहेत. याची सुरुवात मूल्यांपासून होते. ती मूल्ये बुद्धीने तपासून घेतलेली हवीत व मनाला आवडलेली असतील, तर लय- सूर- ताल- शब्द यांनी जसं संगीत बनतं तसंच जीवनाचं गीत होऊ शकतं. त्यात कुठेही ताण किंवा काळजीला वाव नसतो. यालाच इंटीग्रेटेड पर्सनॅलिटी म्हटलं जातं. जीवनातले निर्णय बुद्धिमूल्यांशी विचार करून घेईल. ग्यानबाची मेख इथेच आहे. आपण बुद्धीचा वापर करतो, असं म्हणतो; पण वास्तवात बऱ्याच वेळा मनाकडून निर्णय घेतले जातात. डॅनियल केन्हमन या नोबेल विजेत्याचं ‘थिंकिंग फास्ट अँड स्लो’ असं एक प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘आपले बरेचसे निर्णय आपण वस्तुनिष्ठतेच्या किंवा विवेकाच्या आधारावर न घेता (रिस्पॉन्स) ज्या गोष्टी आपल्या मनाला चटकन आठवतात (रिअ‍ॅक्शन किंवा स्लो थिंकिंग किंवा फास्ट थिंकिंग) त्यावर आधारित असतात. आपण स्वत:ला परखडपणे प्रश्न करण्याऐवजी आपल्या नेहमीच्या आठवणीतलं ‘ज्ञान’ वापरून निर्णय घेतो.’’ पीअर प्रेशर किंवा सोशल मीडियावर चालणारी वाक् युद्धं ही याची उत्तम उदाहरणं आहेत.
रणांगणामध्ये अर्जुनाच्याच विनंतीवरून श्रीकृष्णाने त्याचा रथ दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला. तेव्हा समोरचे ‘शत्रू सैन्य’ पाहून ‘स्वजन’ या कल्पनेने अर्जुन बांधला गेला व लढणार नाही म्हणून धनुष्यबाण टाकून खाली बसला. मनाला चटकन आठवणाऱ्या भावनिक गोष्टींवरून त्याने हा निर्णय  (रिअ‍ॅक्शन) घेतला; पण श्रीकृष्णाने गुरूच्या रूपाने त्याला वस्तुनिष्ठता व विवेक यांचा आधार घेऊन समोर ‘कौरव’ उभे आहेत. ही जाणीव (रिस्पॉन्स) करून दिली. मग अर्जुनाचा प्रश्न ‘सुटला’.
वर म्हटल्याप्रमाणे जीवनाचं मॉडेल हे मूल्यांपासून सुरू होते. बहुतेकांची मूल्यं ही मोठं म्हणजे चांगलं (बिग इज ब्युटिफूल) किंवा खूप म्हणजे चांगलं (मोअर इज बेटर) अशी असतात, जाहिरातदारांकडून उसनी घेतलेली असतात. शाळेतल्या गणितातल्या त्रराशिकासारखं छोटय़ा गाडीत एक आनंद, तर मोठय़ा गाडीत दोन व त्याहून मोठय़ा गाडीत तीन आनंद. बहुतेक बाबतीत आपली सुखाची किंवा आनंदाची कल्पना व ध्येयं ही अशीच सरळ (पण सोप्या नव्हे) रेषेवरून जाणारी. यात एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे ऑप्टिमम, योग्य काय ते. गाडी फारच हळू  किंवा फारच जोरात चालली, तर दोन्ही ठिकाणी गाडी गरम होण्याची, पेट्रोल जास्त जळण्याची व मुख्यत: अपघातांची म्हणजेच थोडक्यात ताण- काळजीची वाढण्याची शक्यता जास्त.
तेव्हा आपलं जीवनाचं मॉडेल हे लहान-मोठं किंवा कमी-जास्त या मोजपट्टीवर आधारित न करता अपूर्णतेतून पूर्णत्वाकडे या मोजपट्टीवर आधारित हवं. (लहान) मुंगीने मोठा (हत्ती) होणे म्हणजे प्रगती किंवा यश नाही, तर मुंगीने चांगली मुंगी किंवा परिपूर्ण मुंगी होणं म्हणजे पूर्णत्वाकडे जाणं हेच तिचं यश. हत्तीने उगीच हरणासारखी (झीरो) फिगर कमावली, तर ना तो स्वत: सुखी होणार ना तो सुंदर दिसणार. सगळय़ांनाच ताण. अपूर्णतेतून पूर्णत्वाकडे जातानाही कष्ट हे होणारच. काही प्रमाणात ताण असेल, पण तो प्रगतीला आवश्यक (eu-stress) असेल; पण अनावश्यक (dis-stress)नसेल.
प्रत्येकालाच आपल्या जीवनाचं मॉडेल हे जास्तीत जास्त यशस्वी असावं / करावं असं वाटतं. या मॉडेलमध्ये आरोग्याचा वाटा सिंहाचा आहे. आरोग्याला संपदा म्हटलेलं आहे. ही संकल्पना होलिस्टिक (समग्र) असून प्रत्येकालाच नैसर्गिकरीत्या मिळालेली आहे. ती जर कमी होत असेल तर तिचं कारणही आतच असलं पाहिजे. म्हणजे शरीर आरोग्यवान हवे असेल, तर मनाकडे पाहावे लागेल. (शरीर आणि मन यांचा जवळचा संबंध सर्वश्रुतच आहे). मनाच्या आरोग्यासाठी बुद्धीवर अवलंबून राहायला हवे. बुद्धीला निर्णय घ्यायला मदत हवी असेल तर (जीवन) मूल्यांकडे पाहावे लागेल. एका थोर तत्त्ववेत्त्याने म्हटल्याप्रमाणे हा सगळय़ात लांबचा, पण आनंदाचा प्रवास आहे. तो प्रवास आपण या सदरातून करणार आहोत दर पंधरा दिवसांनी.
health.myright@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2016 2:02 am

Web Title: what is human life
Just Now!
X