चार दशकांच्या सामाजिक कार्यामध्ये भेटलेल्या आदिवासी समाजात कार्य करणाऱ्या अनेक स्त्रिया माझ्या मनावर विशेष ठसा उमटवून गेल्या. माणूस सामाजिक, आर्थिक, राजकीय रचनेचा व उत्क्रांतीच्या प्रवाहात निमूटपणे वाहणारा गुलाम असतो इथपासून ते तो या रचनांचा स्वामी वा विधाता नसला तरी पूर्णत: असाहाय्य वा हतबल असत नाही व या रचनांना धडका देत तो त्या बदलू शकतो इथपर्यंत बदललेली समाजशास्त्रांची समज या स्त्रियांच्या जगण्यात पाहायला मिळाली.

अनेक विधायक ग्रामीण प्रकल्पांचे एक मूळकर्ते मला मनस्विनीच्या या क्षेत्रातील प्रवेशाबाबत सांगत होते. म्हणाले, एक दिवस कचेरीत बसलो असताना एक पत्र आलं. मजकूर सरळसोट मुद्दय़ाला हात घालणारा होता. ‘मी मनस्विनी, शिक्षणाने आर्किटेक्ट. मागास खेडय़ात सामाजिक बदलाचं काम करायचं आहे. तुम्ही सुरुवातीचं मार्गदर्शन कराल? विश्वास ठेवा मी कोणावर ओझं होणार नाही.’ नंतरच्या दशकात परिघाबाहेरील व दुर्गम भागातील आदिवासींचे जंगल, जमीन, विस्थापन, वेठबिगारी, हे सारे प्रश्न धसाला लावीत मनस्विनीने देश हलवला. या सर्वच प्रश्नांची आमची सर्वाचीच बौद्धिक समज दिसामासाने खोल होत होती. चर्चा, वाचन, केस स्टडीज यांतून आम्ही बरंच शिकायचो, पण विचाराबरोबर हृदयाचे ठोके फक्त तिच्याकडे होते.- जे करायचं ते मनस्वीपणे- मी तिच्याकडे पाहून शिकलो.

एकटय़ाने दुर्गम खेडय़ापाडय़ात जाऊन रोज स्वत:ची शारीरिक, मानसिक कसोटी पाहण्याच्या या नवीन खेळाची मूळकर्ती एक मुलगी होती – रश्मी. महानगरातले ऐषारामाचे आयुष्य त्यागून खेडय़ातील खडतर आयमुष्य अंगीकारलेली रश्मी आमची हिरो होती. तिच्या प्रकल्पावर मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती जवळच्या गावाहून सायकलने परतत होती. धूळभरल्या वाटेने अंगावर धुळीचे लोट ओतले होते. परिश्रमाने श्वास चढलेला व कान आणि गाल लाल झाले होते. बाजूने सर्वोदयापासून दूर झालेल्या विद्रोहपूर्ण आदिवासी लढय़ाचे प्रदर्शक लाल बावटे होते. तिच्या साहसाच्या कथा आम्ही आधी ऐकल्याने आमचे उघडलेले जबडे बराच काळ उघडेच होते. विधायक प्रकल्पापासून सुरुवात करून रश्मीने अखेर संघर्षांची वाट पकडली होती. आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी भरलेलं सरकार हे आपल्याच विनाशासाठी व दमनासाठी तत्पर असतं हे सत्य रश्मीच्या कामातून लक्षात आलं.

आदर्शवादाने भारावून जाण्याचं वय असलं तरीही माझ्यावर बुद्धिप्रामाण्यवादाचा पगडापण होता. काही वर्षांनंतर तपशील कळत गेले. ते खेडे तिचे पूर्वजांचे गाव होते, महानगरापासून जवळ होते. घराणे एका क्षीण होत चाललेल्या राजकीय पक्षाशी संलग्न होते. वडील पूर्वीचे आमदार नवीन मतदारसंघाच्या शोधात होते. साहजिकच तिच्याविषयक उदात्तीकरण कमी होत गेलं. बंद पडलेली कार चालू करायला थोडासा धक्का पुरतो. एकदा सुरू झाली की पहिल्या धक्क्याचा विचार मनात येत नाही. अधिक धक्क्यांची गरजही संपते. माझंही तसंच झालं. रश्मीच्या कथेतला रोमँटिसिझम संपला होता, पण कौतुक शिल्लक होतं. एक दिवस रश्मीने आत्महत्या केल्याची बातमी आली. नाना प्रकारचे कयास बांधले गेले. वावडय़ा उठल्या. प्रत्येक वेळी रश्मीची आठवण आल्यानंतर तिच्या एकूण वैयक्तिक परिस्थितीबाबतची माझी व माझ्या सहकाऱ्यांची संवेदना व्यापक होत गेली. आम्ही प्रगल्भ होत गेलो. ती हरली होती की तिच्या वेगळ्या वाटेला सामावून घेण्यात हे जग हरलं होतं? काहीही असो, या वेगळ्या वाटेने निघालेल्या सर्वजणी माझ्या हिरो होत्या.

आगरी समाजातली पधी माझ्या प्रकल्पावरच्या कार्यकर्त्यांची पुतणी. तरुणपणापासून आमच्या सर्व कार्यक्रमांत सामील होणारी. सर्व घोषणांना खरे मानून चालणारी आणि त्या भाबडेपणाने आम्हाला आमच्या जबाबदारीची अधिकाधिक जाणीव करून देणारी. ग्रामीण काम करतानाच आम्ही तिची गाठ स्त्रीवादी मंचाबरोबर घालून दिली. तिचं लग्न झालं.. नवरा त्रास देतो म्हणून मुलगा चार वर्षांचा असताना पधी विभक्त झाली. मी तिला काही काळासाठी आयडियॉलॉजिकल मंचांपासून दूर होऊन स्वतंत्रपणे विचार करायचं सुचवलं. म्हटलं आमची भाषाच संघर्षांची, विद्रोहाची असते. तू शांत डोक्याने विचार कर. पधी ऐकेना. काही संघटनांनी तिची पोटगीची केस चालवायला घेतली. मोठय़ा ऊर्जेने पधी पोटगीच्या रणांगणात उतरली. आम्ही शक्य तितकी मदत केली. एक दिवस पधी म्हणाली, ‘‘मला केस पुढे न्यायची नाही. ही विसंगती नाही वाटत तुम्हाला? एका बाजूला मी माझं स्वातंत्र्य जागोजाग तोऱ्याने मिरवते. सांगते की मी माझ्या हिमतीवर जगणारी, शिक्षित स्वाभिमानी स्त्री आहे.. आणि दुसऱ्या बाजूला पोटगीसाठी लढते. माझ्या नवऱ्याने मला टाकलेली नव्हती, मी त्याला सोडून आले. माझ्या मुलाला संभाळायला मी समर्थ आहे. मला पोटगी नको.’’ या संदर्भात जणू तगडी पोटगी मिळावी याच हेतूने लग्न केलं असं वाटावं, अशा देशविदेशच्या पेज थ्रीवर चमकणाऱ्या अनेक स्त्रियांची मला आठवण आली. मुलानं शिकावं म्हणून पधीने रात्रंदिवस मेहनत केली.. त्याला शिक्षणात रस नसावा किंवा आम्ही आमच्या कामाच्या रगाडय़ात लक्ष देऊ शकलो नसू, दहावीनंतर त्याने शिक्षणाला रामराम ठोकला. पधीच्या चेहऱ्यावर याचे दु:ख उठले ते कायमचेच.

अ‍ॅन्टीट्रॅफिकिंग चळवळीच्या कॅनव्हासवर सातत्याने कसले ना कसले रंग उधळत राहून स्वत:ला सतत प्रसिद्धीच्या झोतात ठेवणारी अमराठी स्त्री राधा. सेक्स ट्रॅफिकिंगला विरोध करीत राधाने बरीच माया जमा केली होती. राधेचं वैशिष्टय़ होतं ती माया तिने कशी वापरली त्यात. स्वत:ला सातत्याने भारताबाहेर फिरत ठेवण्यावर खर्च केल्यावर त्यातला बराच पैसा राधेनं सरकारी कार्यक्रमांना स्पॉन्सर करण्यात वापरला. तिचा डोनर कम्युनिटीचा अभ्यास प्रात्यक्षिक होता. स्वयंसेवी क्षेत्र म्हणून लठ्ठ देणग्या मिळवायच्या आणि त्यातला बहुतेक भाग सरकारी अधिकाऱ्यांना परदेशवारीसाठी स्पॉन्सर करणे, शहरातील पंचतारांकित हॉटेलात दर पंधरा दिवसांनी काही ना काही कार्यक्रम घडवून आणणे व सरकारी अधिकाऱ्यांना मेजवान्या घालणे. या सगळ्याच्या बदल्यात मग सगळ्या महत्त्वाच्या कमिटय़ांवर आणि सन्मान पुरस्कारांसाठी उमेदवार निवडताना ते मिंधे अधिकारी राधेशिवाय कोणाचेच नाव घेत नसत.

राधेचं आणखी एक वैशिष्टय़ होतं. कोणताच आंतरराष्ट्रीय डोनर दोन वर्षांहून अधिक तिला उचलून धरीना. कारण तोपर्यंत राधेचा खोटेपणा खुला व्हायचा. वास्तव कळल्यानंतरदेखील आंतरराष्ट्रीय संघटनांचे स्थानिक अधिकारी गप्प बसत, कारण यांच्याच शिफारशीवर आंतरराष्ट्रीय बॉसेसनी तिला उचलून धरल्यावर आता त्यांना राधेचं सत्य सांगणे म्हणजे नोकरी घालवून बसण्यासारखं होतं.. राधेला हे नीट कळे. सेक्स ट्रॅफिकिंगचा विषय महत्त्वाचा बनू लागल्या लागल्या राधेने प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं की तिलादेखील पळवून धंद्याला लावलं होतं. माध्यमांवर बलात्काराच्या चर्चा वाढल्या वाढल्या राधेनं जाहीर केलं की तीदेखील बलात्काराची शिकार होती. दिल्लीची निर्भया केस पुढे आल्यावर तिने जाहीर केलं की तिच्यावर झाला तो गँगरेप होता. राधेला ओळखणारे म्हणू लागले आता मर्डरचा विषय लक्षवेधी झाला तर राधा म्हणेल माझापण दोन-तीनदा खून झाला होता.

आमच्या लालबत्ती विभागात आम्ही हेतुत: स्त्रियांच्या स्व-जाणिवेत बदल केले. आम्ही त्यांना वेश्या न म्हणता वेश्याव्यवसायग्रस्त महिला असं संबोधायला लागलो. समाजाचा दृष्टिकोन बदलण्यात याचा फायदा झाला. पुढे एक बेजबाबदार व नैतिकदृष्टय़ा घसरलेली स्त्री ही प्रतिमा टाकून एक जबाबदार व प्रेमळ माता म्हणून ती स्वत:कडे पाहायला शिकली. त्यानंतर एक जबाबदार स्त्री म्हणून व त्यानंतर समाजसुधारणेत स्वत:च योगदान करणारी जबाबदार नागरिक स्त्री असा तिने प्रवास केला. त्याविषयी पुढील शनिवारी.

डॉ. प्रवीण पाटकर

pppatkar@gmail.com

chaturang@expressindia.com

(या लेखातील व्यक्तींची नावे बदलली आहेत.)