आकार, संस्कृती, लोकसंख्या आदी बाबतीत मेक्सिको या दक्षिण अमेरिकेतील देशाशी भारताशी तुलना शक्य नाही. पण, या देशातील एका लेखकाला पडलेला हा प्रश्न भारतापेक्षा फार वेगळा नाही. कारण, या देशातील मुलेच काय तर शिक्षकांनाही सध्या एकाच गोष्टीचा विसर पडला आहे. वाचनाचा. वाचन या एका रूचीच्या अभावी या देशाचा शिक्षणाचा जो काही खेळखंडोबा झाला त्याचा हा अनुभवातून मांडलेला लेखाजोखा. काही महिन्यांपूर्वी ‘असर’च्या अहवालातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण व्यवस्थेबाबत धोक्याच्या घंटेचा पहिला टोला पडलाच आहे. पण, वरचेवर होणारे शिक्षकांचे संप, मानव्य शाखांची होणारी वाताहत आदी प्रश्नांतूनही आपण मेक्सिकोच्या किती जवळ आहोत हे लक्षात येते.
पूर्वी शाळा सर्वासाठी नव्हती. वर्गात कडक शिस्त आणि अभ्यास यांचंच वातावरण असायचं. गुरुजींना मान असायचा. विद्यार्थ्यांना मारणं, त्यांचा कान पिरगाळणं अशा शिक्षा देण्याचा त्यांचा हक्क पालकांनाही मान्य असायचा. मात्र आजच्या तुलनेत त्या काळच्या शाळा मुलांना जास्त सन्मानाच्या जीवनाकडे नेण्याचा उद्देश बाळगत.
आज शाळेत जाणारी मुलं पूर्वीपेक्षा खूप जास्त आहेत, पण त्यांचं शिक्षण फारच कमी होतं. ती काहीच शिकत नाहीत. मेक्सिकोत एकीकडे साक्षर लोकांचं प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे निरक्षरांचा प्रत्यक्ष आकडा दोन वर्षांपूर्वीच्या आकडय़ांहून अधिक आहे. किमान साक्षरता- रस्त्यावरच्या पाटय़ा वाचण्याची किंवा बातम्या वाचण्याची क्षमता वाढतेय, पण प्रत्यक्ष पुस्तकाचं वाचन मात्र घडताना दिसत नाही. एकेकाळी मेक्सिको शिक्षणात समाधानकारक पातळी गाठलेला असा देश होता. मात्र युनेस्कोने काही वर्षांपूर्वी केलेल्या वाचनसवयींच्या पाहणीत त्याचा क्रमांक १०८ देशांमध्ये शेवटून दुसरा होता. म्हणूनच मेक्सिकोच्या शिक्षण व्यवस्थेला जाब विचारल्याशिवाय राहवत नाही. ‘मी मुलाला दिवसाचे सहा तास याप्रमाणे आठवडय़ाला पाच दिवस तुमच्याकडे सोपवतो; मग तो असा निरक्षर कसा राहतो?’
औद्योगिक विकासात प्रगती करणाऱ्या, इंजिनीअिरग पदवीधारकांत वाढ होत असलेल्या मेक्सिकोची सामाजिक, राजकीय आणि आíथक वाटचाल मात्र अडखळत होत आहे. कारण देशाचे इतके जास्त नागरिक वाचनच करीत नाहीत. देशाचे नवे अध्यक्ष एन्रिकी पेन्या नीटो यांनी पदावर येताच शिक्षणात सुधारणा करणाऱ्या कार्यक्रमाची घोषणा केली. अध्यक्षपदावर येताच सगळेच ती करतात. पण या कार्यक्रमाचं पहिलंच कलम काय होतं तर एल्बा एस्थर गॉíडल्योला गजाआड करणं. शिक्षक संघटनेचं गेली २३ र्वष नेतृत्व करताना तिनं २० कोटी डॉलरचा अपहार केल्याचा आरोप असल्यानं तिला शिक्षा झालीही. ते योग्यही आहे. पण शैक्षणिक सुधारणांच्या केंद्रस्थानी विद्यार्थी नसून शिक्षक असणं यात नवीन काही नाही. शिक्षणमंत्र्यांचं कामही नागरिकांना सुशिक्षित करणं हे राहिलेलं नसून शिक्षकांच्या समस्या हाताळणं हेच झालेलं दिसतं. देशात शिक्षकांच्या संघटनेइतके संप अन्य कोणतीही संघटना पुकारत नाही. दुर्दैवानं, आपली नोकरी विकत वा परंपरेने मिळवणाऱ्या या शिक्षकांमध्येही शिक्षणाचा अभावच दिसतो.
वोहाका  (Oaxaca)  मध्ये २००८ साली शिक्षकांच्या आंदोलनात मी एक तरी शिक्षक पुस्तक वाचताना दिसतो का ते शोधत होतो. आंदोलनात लाखो शिक्षक होते, पण एकही वाचताना दिसला नाही. कोणी संगीत ऐकत होतं, टीव्ही पाहत होतं, पत्ते खेळणं, खाणं चाललेलं होतं. गॉसिप मॅगझिन्सही आढळली.
या अनुभवामुळे मुलांचा वाचनाबाबतचा प्रतिसाद काय असणार याचा अंदाज होताच. वाचन सवयींच्या एका कार्यक्रमात मी मुलांना विचारलं की, तुमच्यापकी कोणाकोणाला वाचन आवडतं? १४ ते १५ वयोगटाच्या ३०० मुलांमध्ये फक्त एकाने हात वर केला. वाचनाबाबत उदासीन असलेल्यांपकी पाच जणांना पुढे बोलावून मी त्यांना त्यांच्या नावडीचं कारण सांगायला सांगितलं. पण काही चाचरली, काही कुरकुरली आणि अस्वस्थ झाली. पण सरळ वाक्यात म्हणणं मांडणं एकालाही शक्य झालं नाही. वैतागून मी त्यांना त्या सभागृहातून बाहेर जाऊन वाचन करण्यासाठी पुस्तक शोधा असं म्हटलं. तर यावर काळजीनं पुढे येत एक शिक्षक मला म्हणाले, अहो, आपल्या सत्राची अजून ४० मिनिटं बाकी आहेत.. मग त्यांनी मुलांना परत जागेवर बसवलं आणि स्वत:च एक गोष्ट सांगितली. ती शिशू वर्गातल्या मुलांना सांगितली जाणारी गोष्ट होती.    
अध्यक्ष व्हिन्सेंट फॉक्स यांनी २००२ मध्ये राष्ट्रीय वाचन कार्यक्रमाची आखणी केली होती. जॉर्ज कॅम्पॉज या लोकप्रिय सॉकरपटूला प्रवक्ता नेमलं. लाखो पुस्तकांच्या छपाईची ऑर्डर दिली आणि ग्रंथालयं उभारली. दुर्दैवाने शिक्षकांना नीट प्रशिक्षित केलं नाही आणि शाळांमध्ये मुलांना वाचनासाठी पुरेसा वेळ ठेवण्यात आला नाही. कार्यक्रम मुलांना नव्हे तर पुस्तकांना केंद्रिभूत मानून आखलेला होता. लाखो पुस्तकं वाचकाची वाट पाहात ग्रंथालयांऐवजी गोडाऊनमध्ये धूळ खात कचऱ्यासारखी पडलेली मी पाहिलीत.
काही वर्षांपूर्वी मी आमच्या नुओ ल्यून (Nuevo leon) राज्याच्या शिक्षणमंत्र्यांशी शालेय वाचनासंदर्भात बोललो. मला काय हवंय ते न समजून ते माझ्याकडे पाहात राहिले. ‘शाळेत शिकवतात मुलांना वाचायला,’ ते मला म्हणाले. ‘हो, पण ती वाचत नाहीत,’ मी उत्तरलो. कसं वाचावं ते ठाऊक असणं आणि प्रत्यक्ष वाचन करणं यांतला फरक मी स्पष्ट करून सांगितला. तसंच रस्त्यावरच्या पाटय़ा वाचणं आणि एखादा साहित्यिक उतारा वाचणं यांतला भेदही विशद केला. मुलांनी कादंबरीचं वाचन करायलाच पाहिजे असं का ते काही त्यांना कळलं नाही. ते म्हणाले, आपण त्यांना पेपर वाचायला शिकवायला पाहिजे.
माझी मुलगी १५ वर्षांची असताना तिच्या भाषावाङ्मय शिक्षकांनी कादंबऱ्या काढून टाकून इतिहास आणि जीवशास्त्राची पुस्तकं वाचायला सांगितलं. याद्वारे वाचन-शिक्षण दोन्ही एकाच वेळी साध्य होईल असं त्या म्हणाल्या. आपल्याकडच्या शाळांमध्ये मुलांनी जे शिकणं गरजेचं आहे ते शिकवण्यापेक्षा शिक्षकांना जे सोपं पडतं ते शिकवलं जातं. याच कारणामुळे – मेक्सिकोत आणि अन्य अनेक देशांमध्ये मानव्य शाखेचे, कला शाखेचे विषय बाजूला सारले जातात.
आपण शाळांचं रूपांतर कर्मचारी तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये केलं आहे. इथे बौद्धिक आव्हानाअभावीच मुलं एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेत जाऊ शकतात. वर्गातली उपस्थिती आणि शिक्षकाची मर्जी राखणं तेवढं केलं म्हणजे झालं. अशा परिस्थितीत माध्यमिक शाळेत ड्रायव्हर आणि वेटर निर्माण होणं हे स्वाभाविकच आहे. निधी वाढवून यावर तोडगा निघेल असं मानण्यात अर्थ नाही. मेक्सिको एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या पाच टक्के म्हणजे अमेरिकेतल्या प्रमाणाएवढाच खर्च शिक्षणावर करते. तसंच हा अध्यापनशास्त्रातील सिद्धांतांबाबतचा, तंत्रांविषयीचाही मुद्दा नाही. शिक्षणाचं यंत्र दुरुस्त करायचं नाहीय तर त्याची दिशा संपूर्णत: बदलण्याची गरज आहे. मुलांना वाचायला, वाचायला आणि वाचायला लावण्याची गरज आहे.
पण आपल्या नागरिकांना सुशिक्षित करण्याची मेक्सिकोच्या सरकारची इच्छा दिसत नाही. ग्रंथ माणसाच्या ठायी महत्त्वाकांक्षा, अपेक्षा उत्पन्न करतात आणि त्याच्या जगण्याला सन्मान मिळवून देतात हे आपण जाणतो. शिक्षणात आपल्याला फिनलंडइतकी पातळी गाठायची असेल तर जनतेच्या मनातच चीड दाटायला हवी. वेटर बनायच्या प्रशिक्षणाहून अधिक काही देणारं शिक्षण देणार का, असा सवाल लोकांनी करायला हवा आणि सरकारनंही तो स्वत:ला विचारायला हवा.
– मूळ लेखक : डेव्हिड तोस्कायना, ‘द लास्ट रीडर’ या कादंबरीचे लेखक.
(मूळ लेख ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये ५ मार्च रोजी प्रकाशित)
– अनुवाद :
 सुलेखा नलिनी नागेश, ‘प्रथम’
prasar@pratham.org mailto:prasar@pratham.org