ग्रामीण भागांतील शिक्षण विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती साधता यावी यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने स्पेनमधील सँटीएगो विद्यापीठाशी शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी सांमजस्य करार केला आहे. या करारामुळे प्रवरेतील विद्यार्थ्यांना युरोपातील शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
युरोपियन कमिशन प्रोग्रामचे संयोजक प्रा. डॉ. जॉकाबो फियेस आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र विखे यांनी या करारावर शुक्रवारी सह्या केल्या. जगात पाचव्या स्थानावर असलेल्या सँटीएगो डी कम्पोस्टेला या विद्यापीठाने ८० देशांतील १ हजार विद्यापीठांशी अशाच प्रकारचा सहकार्य करार केला आहे.
संशोधनासाठी निवड झालेल्यांना या विद्यापीठात एक ते तीन वर्षांपर्यंत रहाता येईल. पदवीसाठी प्रती महिना १ हजार युरो, पदव्युत्तर संशोधनासाठी १ हजार ५०० युरो, पोस्ट डॉक्टरेटसाठी १ हजार ८०० युरो, तर विभागासाठी २ हजार ५०० युरो शिष्यवृत्ती मिळणार आहे.