औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल यंदा वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्जाची संख्या कमालीची वाढली असून वाढत्या निकालाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एकूण १.१८ लाख जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी २१जून रोजी संध्याकाळपर्यंत ३.१८ लाख अर्ज आले असून यातील १.३ लाख विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज नक्की केले आहेत. ही आकडेवारी मागच्या वर्षीपेक्षा जास्त असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी स्पष्ट केले.
मागच्या वर्षी सुमारे अडीच लाख अर्ज आले होते. त्यापैकी दोन लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज नक्की केले होते. अर्ज भरण्याची मुदत २५ जूनपर्यंत असल्यामुळे यंदा अर्ज नक्की करणाऱ्यांची संख्या आणखी एक ते दीड लाखानी वाढेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. आयटीआयच्या प्रवेशासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना त्यांचा गुणवत्ता क्रमांक देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विषय निवडण्यासाठी मदत होईल. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास तो विद्यार्थी जवळच्या आयटीआयमध्ये गेल्यास त्याला मोफत मार्गदर्शनाची सोय केल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
अर्ज नक्की झालेल्या विद्यार्थ्यांना २९ जून ते ३ जुलै या कालावधीत शाखांचे पर्याय निवडायचे आहेत. यानंतर ५ जुलै रोजी प्रवेशाची यादी जाहीर केली जाईल. यानंतर विद्यार्थ्यांनी संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा असल्याचेही ते म्हणाले.