कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी या आठवडय़ात बैठक होणार आहे. त्यानंतर या प्रश्नाची आगामी भूमिका स्पष्ट केली जाईल, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  येथील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळास खासदार संभाजीराजे यांनी अभिवादन केले. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात दौरा करून अधिकाधिक लोकांशी संपर्क साधला जाणार आहे. त्यांची भूमिका समजावून घेतली जाणार असल्याचे त्यांनी दौऱ्याला सुरुवात करताना सांगितले. ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले असल्याने या प्रश्नावर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार, आमदारांनी एकत्रित येऊन मार्ग काढला पाहिजे. लोकांना अजिबात गृहित धरता कामा नये. आजवर या प्रश्नी ५८ मोर्चे काढले आहेत. आणखी किती मोर्चे काढले पाहिजेत, आणखी पुन्हा रस्त्यावर का उतरायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. करोना संसर्ग वाढत असताना आंदोलन. उद्रेक असे शब्द उच्चारणे चुकीचे आहे.

संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे पोरखेळ – फडणवीस

नागपूर : विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर केलेली टीका हा पोरखेळ आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले.फडणवीस आज नागपुरात होते. विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त सदस्यांच्या संदर्भात संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. या संदर्भातील फाइल्स गायब झाल्या, त्या भुताने पळविल्या, असे राऊत म्हणाले होते. याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, नामनिर्देशित सदस्यांसदर्भात राजभवनच सांगू शकेल. हा विषय गंभीर असून तो न्यायप्रविष्ट आहे. त्या विषयाबाबत असे बोलणे पोरखेळ आहे. असे कोणी करू नये. राऊत काहीही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर उत्तर दिलेच पाहिजे, असे नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती संभाजी राजे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांच्याशी २८ ला भेटणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.