कोल्हापूर : कुरुंदवाड येथील जेवणामुळे मुलांना अन्न विषबाधा तसेच गडहिंग्लज महागाव येथे हनुमान जयंती उत्सवावेळी महाप्रसादावेळी नागरिकांना उलट्या, अतिसाराचा त्रास झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करु नये, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी मंगळवारी केल्या आहेत.
जिल्ह्यामध्ये सार्वजनिक व वैयक्तिक स्वरुपात मोठ्या प्रमाणात यात्रा, जत्रा, माही, निवासी शाळेतील जेवण व पारायण सप्ताह इ. कार्यक्रमाचे आयोजन एप्रिल व मे महिन्यामध्ये केले जाते. या कार्यक्रमांना नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे नागरिकांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. कुरुंदवाड येथील सैनिक पॅटर्न निवासी शाळेतील जेवणामुळे मुलांना अन्न विषबाधा झाली आहे. त्याचप्रमाणे परिते ता. करवीर येथे पारायण सप्ताहातील जेवणामुळे अन्न विषबाधा झाली होती.
हेही वाचा…चेतन नरकेंचं ठरलं; शाहू महाराजांना पाठिंबा, प्रचाराला सुरुवात
तसेच गडहिंग्लज येथील हनुमान जयंती निमित्त महागाव गावातील उत्सवावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी दुसऱ्या दिवशी नागरिकांना उलट्या व अतिसाराचा त्रास होऊ लागला. त्यानंतर आरोग्य विभागामार्फत महाप्रसाद घेतलेल्या नागरिकांना आरोग्य सेवा देऊन तात्काळ उपचार देऊन बरे झाले. या महाप्रसादावेळी नागरिकांनी दुग्धजन्य पदार्थापासुन बनवलेल्या खिरीचे सेवन केले होते असे दिसून आले.
सध्या हवामान विभागामार्फत उन्हाळ्याचे प्रमाण वाढ होत असल्याचे कळविण्यात आले आहे. या हवामान बदलामुळे दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होण्याचे प्रमाण जास्त असते व मोठ्या प्रमाणात केलेल्या महाप्रसादामध्ये पदार्थांची विशेष काळजी हव्या त्या प्रमाणात घेतली जाईलच असे सांगता येणे शक्य नाही. अशा पदार्थांचे वाटप करताना विशेष काळजी घेतली नसल्यामुळे अन्न विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते व तसे निदर्शनास येत असल्याचेही आरोग्य विभागामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.