कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील १०० कोटी रस्ते प्रकल्पावरून नागरिकांत जोरदार टीका होत असताना नवा कोरा रस्ता उखडल्याचा प्रकार शुक्रवारी पुढे आला आहे. शाहू बँक सारख्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडल्याने त्यावरून महापालिका प्रशासनावर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली जात आहे.कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र या  कामाचे ‘ मलईदार ‘ प्रकरण टीकेचे कारण बनले आहे .

रस्ते कामात टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उघडपणे केला. होता तर याच कारणावरून मंत्री मुश्रीफ यांनी कालच महापालिका आयुक्त के. मंजू लक्ष्मी,  शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांचे कान टोचले होते. तर कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने रस्ते कामावरून महापालिकेत झालेल्या बैठकीत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली होती.

हेही वाचा >>>दिलशाद मुजावर यांना ‘अरुणोदय ‘ पुरस्कार मरणोत्तर जाहीर

यनंतर तरी कोल्हापुरातील रस्ते काम गतीने आणि दर्जेदार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र शाहू बँक जवळील संजय बेकरी समोर नव्यानेच करण्यात आलेला रस्ता उखडला आहे. या कामाला नुकतीच सुरुवात झाली होती. पण आता तो पुन्हा उजाड झाल्याने त्यावरून परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. अशाच पद्धतीने काम होणार असेल तर १०० कोटी रुपये पाण्यात जाण्याची भीती नागरिकातून व्यक्त केली जात आहे.