कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात संजय मंडलिक तर हातकणंगलेत धैर्यशील माने या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. याचे स्वागत करतानाच दोन्ही खासदारांना काँग्रेसच्या मैत्रीवरून शुक्रवारी भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी परखड मत व्यक्त केले. येथील भाजप कार्यालयात उमेदवार संजय मंडलिक यांचा उमेदवारी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, महानगर अध्यक्ष विजय जाधव, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

भाजपचे प्रदेश सचिव, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी परखड भाष्य केले. ते म्हणाले, जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी आम्ही अनेक वर्ष राबत आलो. एकतरी मतदारसंघ आम्हाला मिळावा अशी अपेक्षा होती; ती पूर्ण झाली नाही. यापुढील काळात इतरांची नव्हे तर आमची कामे झाली पाहिजेत. तसेच काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे गुणगान कोणीही गाता कामा नये.

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

मुश्रीफ जुनी मैत्री विसरा

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा संदर्भ घेऊन जाधव म्हणाले, जुनी मैत्री आता विसरा हे पालकमंत्र्यांना सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. गोकुळ, जिल्हा बँक, महापालिका येथे सोबत आणि दुसरीकडे विरोध हे चालणार नाही. आम्हालाही सोन्याचे दिवस यायला पाहिजेत.

हेही वाचा – बडे नेते माझ्यासोबत असल्याने बाजू उजवी; यश निश्चितपणे मिळणार; संजय मंडलिक यांचा दावा

हेही वाचा – “नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”

मानेंसाठी परखड संदेश

धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. समाज माध्यमातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करणारा संदेश अग्रेषित करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, खासदार धैर्यशील माने आपण काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील यांना दुखावून चालत नाही, असे केलेले ते विधान आम्ही अजून विसरलेलो नाही. आज भाजपची मदत घेऊन उद्या काँग्रेसच्या नेत्यांचे गुणगान गाणार असाल तर येथून पुढे हे चालणार नाही. तसे असेल तरच मते मागायला आमच्या दारात या, भाजप समर्थकांनी असा इशारा दिला आहे. यामुळे युतीअंतर्गत वाद समोर आला आहे.